अनिता बाळकृष्ण वैरागडे
मागील लेखांमध्ये विविध प्रकारची योगासने पाहिली होती. आता बघूया सूर्यनमस्कार कसे करायचे आणि त्याचे फायदे काय आहेत ते. सूर्यनमस्कार हा एक व्यायामाचा आणि उपासनेचा प्रकार आहे. याने माणसाच्या सर्व इंद्रियांना व्यायाम मिळून शरीरात सर्वत्र रक्ताचा पुरवठा होतो. श्वास घेण्याची क्रिया तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. आकुंचन-प्रसरणाच्या क्रिया सलग व सुलभ होत असल्याने हा व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार मानतात.
सूर्यनमस्कारमध्ये बारा आसने आहेत. चला तर मग त्या बारा आसनांची नावे आणि त्यांचे फायदे बघूया. प्रत्येक आसन करताना श्वासाची गती लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रणामासन
प्रणाम आसन म्हणजेच प्रार्थनेची पोझ. छातीसमोर दोन्ही हात जोडून उभे राहायचे. श्वासाची क्रिया सामान्य स्थितीत ठेवायची.
हस्त उत्तानासन
हस्त उत्तासन म्हणजेच नमस्कारासारखे हात जोडलेले ठेवून डोक्यावर न्यायचे आणि मागे शक्य तितपर्यंत जाऊ द्यायचे. श्वास आत घ्यायचा.
हस्त पादासन
कंबरेमध्ये वाकून हातांनी पायाला स्पर्श करायचा आणि श्वास बाहेर सोडायचा.
हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा
अश्व संचालनासन
म्हणजेच घोडा चालण्याची पोझ. डावा पाय मागे न्यायचा आणि उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा. छाती पुढे ठेवायची आणि तळहात जमिनीवर ठेवायचे. श्वास आत घ्यायचा.
दंडासन
दोन्ही पाय मागे करून शरीर सरळ ठेवायचे आणि श्वास बाहेर सोडायचा.
अष्टांग नमस्कार
म्हणजेच आठ अंगानी नमस्कार. गुडघे, छाती आणि हनवटी जमिनीला टेकवायचे हात जमिनीवर ठेवायचे आणि कंबर वर राहील, याची दक्षता घ्यायची. श्वासोच्छवास सामान्य गतीने सुरू ठेवायचा.
भुजंगासन
म्हणजेच कोब्रा पोझ. छाती पुढे उचलून मान मागे वर उचलायची. दोन्ही हात पुढे जमिनीवर ठेवायचे श्वास आत घ्यायचा.
अधोमुखासन
म्हणजेच डोंगरासारखी पोझ घ्यायची. हात आणि पाय जमिनीवर ठेवायचे आणि कंबर वर उचलून व्ही आकारासारखं आपलं शरीर करायचं. श्वास बाहेर सोडायचा.
अश्व संचालनासन
आता डावा पाय पुढे ठेवायचा आणि उजवा पाय मागे ठेवायचा. दोन्ही तळहात जमिनीवर ठेवयायचे. श्वास बाहेर सोडायचा.
हस्त पादासन
आता उजवा पायही दोन हातांच्या मधे आणून कंबरेत वाकून हातांनी पायाला स्पर्श करायचा. श्वास बाहेर सोडायचा.
हस्त उत्तानासन
हात डोक्यावरून उचलून मागे वाकवायचे. शक्य तिथपर्यंत जात असतील तिथपर्यंत न्याययचे. श्वास आत घ्यायचा.
हेही वाचा – Yoga is lifestyle : पाठदुखी दूर करणारी आसने
प्रणामासन
हात जोडून छातीसमोर ठेवायचा. श्वासोच्छवास सामान्यपणे सुरू ठेवायचा.
अशा बारा टप्प्यांत सूर्यनमस्काराचा एक राऊंड पूर्ण होतो. चांगल्या परिणामासाठी सूर्यनमस्काराचे कमीत कमी बारा राऊंड करणे आवश्यक आहे.
फायदे – स्नायू मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते, लवचिकता वाढते, एकाग्रता वाढते.
योगासनाचे असंख्य फायदे आहे. म्हणून आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये योग करणे अत्यंत आवश्यक आहे.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.