स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे बनविण्याच्या टिप्स पाहुयात.
- साधी शेव किंवा लसूण शेव करताना शेव खुसखुशीत व्हावी म्हणून डाळीच्या पिठात थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे. चार वाट्या डाळीचे पीठ असेल तर एक वाटी साबुदाण्याचे पीठ पुरेसे होते. ही शेव नरम पडत नाही. साबुदाण्याचे पीठ घरीच करता येते. साबुदाणे एक वाटी घेऊन ते चांगले फुलेपर्यंत भाजावेत आणि मिक्सरवर त्याचे पीठ करावे.
- सुरळीच्या वड्या करताना प्रमाणापेक्षा थोडे जास्त पाणी अथवा ताक घ्यावे म्हणजे शेवटपर्यंत पीठ एकसारखे राहते (मंद आचेवर ठेवल्यावर पीठ पसरत असताना घट्ट होत जाते) आणि कढईला चिकटून न राहता शेवटपर्यंत वडीचे पीठ पसरता येते. त्याचप्रमाणे पीठ हे ताटांवर न थापता ते आपल्या गॅसच्या कट्ट्यावर स्वच्छ करून तेल लावून पसरावे. अतिशय पातळ नि व्यवस्थित पसरता येते व भांडीही फार खराब होत नाहीत. नाहीतर सहा ते आठ ताटे खराब होतात. त्याऐवजी हा अतिशय सोपा आणि स्वच्छ उपाय आहे.
हेही वाचा – Kitchen Tips : केळ्याचे वेफर्स, पपईची भजी, हरभऱ्याची तळलेली डाळ…
- केक करताना बेकिंग पावडर मैद्याबरोबर न चाळता सर्व मिश्रण तयार झाल्यावर, बेकिंग पावडरवर दोन-तीन चमचे गरम दूध घालावे आणि फेसाळ झाल्यावर मिसळावे. केक जाळीदार आणि हलका होतो.
- दहीवड्याकरिता वडे करताना वडे न तळता त्याच पिठाचे आप्पेपात्रातून आप्पे करून काढावेत आणि त्यांचेच दहीवडे करावेत. यामुळे दहीवड्यासाठी तळायचे तेल कमी लागते. कमी तेलकट खाणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
- बाजरीचे पीठ जास्त दिवस राहिल्यास ते कडू होते. तेव्हा थोडे पीठ राहिले असताना त्यात थोडी (दोन वाट्यास पाऊण वाटी) कणीक घालावी. त्यात कडकडीत तेल टाकून हे पीठ गुळाच्या पाण्यात घट्ट भिजवून त्यांचे शंकरपाळे तळावेत. अतिशय खुसखुशीत लागतात.
- तीन वाट्या भिजलेली मसुराची डाळ आणि एक वाटी भिजलेले हिरवे मूग मिक्सरमधून काढा. त्यात मीठ, हळद, तिखट, मोहन, कोथिंबीर, कांदा घाला. नंतर त्या पिठाची भजी तळा. भजी हलकी होतात.
हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसे, स्वादिष्ट चकली आणि दहिवडे, स्पाँजी ढोकळा
- कांदा भजी खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी कांदा अगदी बारीक चिरून, त्याला चवीप्रमाणे मीठ लावून ठेवावे. साधारण 15 मिनिटांनी त्याला पाणी सुटेल. या सुटलेल्या पाण्यात मावेल एवढेच डाळीचे पीठ भिजवावे. भिजवताना त्यात तिखट, कोथिंबीर, ओवा, आल्याचा कीस आणि किंचित पापडखार घालावा. तसेच, लहान गोळे करून भजी तळावीत. यामुळे भजी खमंग आणि कुरकुरीत होतात. तेलकट होत नाहीत. डाळीच्या पिठाऐवजी जर चकलीची भाजणी वापरली, तर एक वेगळीच चव येते.


