Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeअवांतरसुपर मार्केट अन् सुपर खरेदी!

सुपर मार्केट अन् सुपर खरेदी!

साधारणत: 1990च्या दशकापर्यंत सुपर बाजाराचे लोण आपल्याकडील शहरांमधे पसरले नव्हते. मुळात त्यावेळी महिनाभराचा किराणा हा एखाद्या मोठ्या किराणा दुकानदाराकडूनच विकत घेतला जायचा. तो किराणा दुकानदार आपले सर्व वाणसामान वर्तमानपत्रांच्या कागदात बांधून घरपोच करत असे, तर काही लोक दर महिन्यात किराणा सामान जातीने दुकानात जाऊन, तिथे एक-दोन तास उभं राहून मगच घरी आणत असत. दर महिन्याला घरी आणलेला किराणा कागदांच्या पुड्या सोडून, त्यातील मोहरी, बडीशेप, जिरं यासारखे जिन्नस निवडून ते काचेच्या एकसारख्या बरण्यांमध्ये भरण्याचा कार्यक्रम घरोघरी चालत असे. काही घरांत गहू, तांदूळ, तूरडाळ यांचे कट्टे वर्षभरासाठी घेतले जायचे. हे धान्य भरण्याकरिता या घरांमध्ये लोखंडी कोठ्या असायच्या.

त्या काळात मध्यमवर्गीय लोक रेशनकार्डचे धान्यपण घरी आणत असत. गहू, तांदूळ, डाळ, साखर यासोबत रॉकेल देखील रेशनवर मिळायचे. तेव्हा किराणा दुकानात सामान आणायला तयारीनिशी जायला लागायचे. महिना संपायच्या चार-पाच दिवस आधी म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपर्यंत किराण्याच्या वहीत वाणसामानाची यादी लिहावी लागायची. त्याआधी कोणत्या वस्तू आवश्यक आहेत, कुठल्या आधीच्या महिन्यातील उरलेल्या आहेत आणि कुठल्या नवीन वस्तू आणायच्या आहेत… हे डबे पडताळून पाहिले जात असे आणि त्यानुसारच सामानाची यादी तयार होत असे. या सवयींमुळे बरोबर महिनाभर पुरेल इतकेचं  वाणसामान घरी येत असे, फार क्वचित वेळेस एखादी वस्तू विकत आणावी लागत असे. गृहिणींचा दरमहा किराणा सामानाच्या यादीचा आणि खर्चाचा ताळेबंद अचूक असायचा. विनाकारण कुठलीही जास्तीची वस्तू त्यात समाविष्ट नसायची.

आजकाल शहरांमध्ये तर सुपर मार्केट पेव फुटल्यासारखी उभी होत आहेत. भांडी घासण्याच्या साबणापासून अगदी आगपेटीपर्यंतच्या लहान-मोठ्या विविध कंपन्यांच्या वस्तू या सुपर मार्केटमध्ये मिळतात. गहू, तांदूळ यासारखे विविध प्रकारचे धान्य, कडधान्य, मोहरीपासून हिंग, मीठ, खाद्य तेलाचे विविध ब्रॅन्डच्या प्रकारापर्यंत, खोबरे किस ते खसखस, विविध खडे मसाले, गरम मसाल्यांचे ब्रॅण्डेड प्रकार, निरनिराळ्या कंपन्यांचा चहा, ब्राऊन शुगर, बारीक साखर ते जाड साखर, गुळाची पावडर ते चिक्कीच्या गुळापर्यंतचे विविध प्रकार, विविध प्रकारचे साबण – फेसवॅाश ते बॉडीवॅाश, कपडे धुण्याच्या पावडरी ते साबणाचे प्रकार, टॉयलेट क्लीनर, शॅम्पूचे विविध ब्रॅण्ड, पूजेचे सामान हे सर्व एकाच छताखाली जरी मिळत असले तरी कधीकधी याचा अतिरेक होतो, असं मला वाटत.

सामानाची लिस्ट करून नेल्यानंतरही काही वेळेस विनाकारण जास्त सामान घरात आणलं जातं. मसाल्यांमध्ये खिचडी मसाले, शेवभाजी मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, वांगी मसाला इथपासून सुरू झालेले मसाल्यांचे प्रकार अगदी चाट मसाला येतो तरी संपतच नाही! गरम मसाले आणि गोडे मसाले तर लायनीत हात जोडून उभे असतात. त्यामुळे आजकाल घरगुती मसाले तयार होणे जवळपास बंदच झाले आहे. तिथे गेल्यावर जॅम, सॅास, बिस्किटांचे विविध प्रकार, स्नॅक्स डोळ्यासमोर दिसताच कितीही नाही म्हटलं तरी यातील एखाद-दुसरा खाद्यपदार्थ घरी आणलाच जातो.

आजकाल तर काय गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, थालीपीठाची भाजणी, उपवासाची भाजणी, नाचणी सत्व यासोबत उकडपेंडीचे तयार पीठ पण या सुपर मार्केटमधे विक्रीस उपलब्ध आहे. तसेच पोहे, उपमा यांचे इन्स्टंट प्रकार म्हणजे ‘रेडी टू इट’ असेही प्रकार विकत मिळतात. फक्त गरम पाणी टाकून वाफवून घ्यावे इतकंच! यामुळे गृहिणीचे कष्ट वाचतात हे खरं आहे, परंतु हे एखाद्या वेळेस खरेदी करून लगेच संपवलं तर बरं, असं मी म्हणेन; कारण ही पीठं कितीही भाजून ठेवा किंवा प्रिझर्व्हेटिव्ह घालून ठेवा, त्याची चव कधी ना कधी तरी उतरणारच! जसं भाकरीच पीठ जर जास्त जुनं झालं असेल तर त्या पीठाची भाकरी चांगली होतच नाही, कारण त्यामध्ये पहिल्यासारखा ताजेपणा आणि चिकटपणा रहात नाही. बाजरीचे पीठ जास्त जुनं झाले तर भाकरी कडवट लागते. तसंच तांदळाचं पीठ जास्त जुनं झाल तर त्याची एक विशिष्ट प्रकारची चव लागते किंवा त्याची भाकरी, उकड विसविशीत होते. आपण ते हौशेने घेऊन तर येतो, परंतु नंतर वापर न झाल्यामुळे ते फेकण्यात वाया जातं, हेही तितकेचं खरे आहे.

हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…

याशिवाय, तिथे इतरही अनेक वस्तू विक्रीस उपलब्ध असतात, जे आपण केवळ मोहामुळे खरेदी करतो. सुपर मार्केटमधल्या सामानाची यादी नकळत कधी वाढते ते आपल्याला त्या वेळेस लक्षातही येत नाही. अंदाजापेक्षा वाढलेल्या बिलाचा कागद जेव्हा समोर येतो, तेव्हा किमान दोनेक हजाराचे सामान जास्तीचे घेतले आहे, हे तुमच्या लक्षात येतं. पण ‘जाऊ दे, आता पुढील एक-दीड महिना तरी आपल्याला सामान आणावे लागणार नाही,’ अशी आपण आपल्या मनाची खोटी समजूत घालून निमूटपणे घरी येतो. सुपर मार्केटच्या बिलाची रक्कम खूप मोठी असली आणि किमान दोनेक हजारांनी तरी आपण गंडवले गेलो आहोत, हे लक्षात येऊनही नकळतपणे पुढच्या वेळेस आपली पावलं परत तिकडेच वळतात.

क्वालिटीच्या बाबतीत या सुपर मार्केटमधील माल अव्वल दर्जाचा असला तरी आजकालचे किराणा दुकानदार देखील तितकेचं स्मार्ट झाले आहेत. तेदेखील हे सर्व सामान अव्वल दर्जाचे आणि नीटनेटके पॅकिंग करून विक्रीसाठी ठेवतात. नेहमीचा किराणेवाला असला आणि त्याने खराब वाणसामान पाठवले तर, त्याला चार गोष्टी सुनवता येतात. तो ते सामान परतही घेतो. परंतु सुपर मार्केटमधे हा प्रकार सहसा कमी घडतो. काही सुपर मार्केटमध्ये एकदा पॅकिंग फोडलेला माल परत घेतला जात नाही किंवा थोड्याश्या कारणासाठी आपणही तिथे परत जाण्याची तसदी घेत नाही.

पूर्वी तुटपुंज्या पगारतही काटकसर करून महिन्याकाठी पैसा वाचवण्याचे कसब गृहिणींकडे होते. वर्षभराचे धान्य, डाळी, तांदूळ बेगमीने पावसाळ्याआधी घरामध्ये साठवले जात असत. पापड, सांडगे, कुरडया, लोणची यासारखे पदार्थ कधीच बाहेरून विकत घेतले जात नसत. हे सर्व पदार्थ बाराही महिने बाजारात उपलब्ध असल्याने हल्ली ते घरोघरी केलेच जात नाहीत. घरगुती वाळवणी पदार्थांची, लोणच्यांची एक भली मोठी रेन्ज सुपर मार्केटमध्ये किंवा फूड बाजारमध्ये उपलब्ध असताना कोण कशाला कष्ट घेणार नाही का? आता तर ब्लिन्क इट, बिग बास्केट यासारख्या कंपन्या स्मार्टफोनच्या एका क्लिकवर तुमचे सामान तत्काळ घरी आणून देतात, तेपण extra chargesसह! हे आपल्याला कळतं, पण वळत नाही!

आजकालच्या धावपळीच्या जीवनात सुपर मार्केटसारखे पर्याय ही काळाची गरज आहे. सुपर मार्केटमध्ये सामान घेणे वाईट नाही. परंतु ते अवाजवी नको. काही वेळेस वाटतं की, आपण आपल्या गरजा अवास्तव वाढवून ठेवल्या आहेत. पैसा कसा, किती आणि कुठे वापरावा, हे आपल्या हातात आहे. काही वस्तू होलसेल मार्केट किंवा छोट्या-मोठ्या बाजारात देखील वाजवी दरात आणि उत्तम दर्जाच्या मिळू शकतात; परंतु त्याकरिता थोडे कष्ट मात्र घ्यावे लागतात. महिनाभराच्या सामानाचे मर्यादित नग आणि बजेट मॅनेज केले तर, आपल्याला पुष्कळसा अनावश्यक खर्च टाळता येतो. काळानुसार बदल स्वीकारायला हवेत, परंतु ते कुठपर्यंत आणि कसे तेपण लक्षात घेणे गरजेचचे आहे. शेवटी हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आणि व्यक्तिगत प्रश्न आहेत. बहुतेक सर्वचजण आपापल्या जबाबदाऱ्या नीट समजतात, हे काही वेगळे सांगायला नको.

हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!

मीपण सुपर मार्केटमधून किराणा आणते, परंतु काहीवेळा बऱ्याच वस्तू अवास्तव घेतल्या जातात, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हापासून मी आता सुपर मार्केटमध्ये थोडेबहुत सामान लागत असेल तरच जाते, नाहीतर सरळ किराणा दुकानदाराकडे घरातील आवश्यक वस्तूंची यादी देते. तो जास्तीत जास्त संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सामान घरपोच करतो. त्याच्या माणसाकडून मी लिस्टप्रमाणे सामान चेक करून घेते आणि काही खराब असेल तर, किंवा आपल्याला हवे असलेले सामान त्याने बदलवून पाठवले असेल तर ते परत करते. त्यामुळे माझा वेळही वाचतो आणि पैसाही, बिलामध्ये बराच फरक पडतो. शिवाय आपल्याला जे हवे ते सामान बजेटमध्ये उपलब्ध होते. अशा वेळेस काही जुन्या सवयीच बऱ्या असं वाटायला लागत!

माधवी जोशी माहुलकर
माधवी जोशी माहुलकर
एम.ए.(इंग्रजी) बी.एड. असून सध्या नागपूरमध्ये स्थायिक आहेत. लग्नाआधी चार वर्षे मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून अकोला येथे कार्यरत. तीन वर्षे शिक्षिका. वाचन, प्रवास करणे, वेगवेगळ्या विषयांवर लिखाण तसेच चर्चा करणे, गायन याची आवड. गायनात गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण. पती Additional S.P. Anti corruption Bureau Nagpur येथे कार्यरत.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!