Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeअवांतरभेट सोज्वळतेशी...

भेट सोज्वळतेशी…

आराधना जोशी

2003चा एप्रिल महिना… अवघ्या काही दिवसांवर त्यावेळच्या अल्फा मराठी आणि आता झी मराठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहिनीवर दुपारी Live phone in program सुरू होणार होता. त्यासाठी कार्यक्रमाची EP अर्थात executive producer सुषमा पार्टेबरोबर कार्यक्रमाची रुपरेषा कशी असेल? कोणकोणते विषय घेता येतील? त्यासाठी कोणकोणते तज्ज्ञ बोलावता येतील? याबरोबरच कार्यक्रमाच्या Dry runs सुरू झाल्या होत्या. अचानक एका मिटिंगमध्ये सुषमाने आपण या कार्यक्रमाला सुलोचना दिदींना बोलावलं तर? असा प्रस्ताव मांडला. नुसता प्रस्ताव मांडून ती थांबली नाही तर, लगेच दिदींच्या घरी फोन करून कांचनताईंशी (सुलोचना दिदींची मुलगी) बोलून दिदींना भेटायची तारीख आणि वेळही नक्की केली.

त्याप्रमाणे सुषमा, मी आणि या कार्यक्रमाशी निगडीत आणखी काहीजणी ठरलेल्या वेळी दिदींच्या प्रभादेवीच्या घरी पोहोचलो. खरंतर, सकाळी 11ची वेळ म्हणजे रणरणत्या उन्हाची वेळ. घरात शिरताच दिदींकडे असणाऱ्या मदतनीस मावशींनी बसायला सांगून, चहा-पाणी वगैरेची चौकशी केली. दिदींना भेटायचं, याचं नाही म्हटलं तरी दडपणच आलं होतं. मात्र प्रतिथयश अभिनेत्रीच्या आपण घरी आलोय, असं अजिबात वाटतं नव्हतं. सिनेसृष्टीचा कोणताही भपका तिथे जाणवत नव्हता. तेवढ्यात हसतमुख चेहऱ्याच्या कांचनताई आल्या. आमची विचारपूस केली, कार्यक्रम नक्की काय आणि कसा असेल, याची चौकशी केली. ताई आमच्याशी बोलत असतानाच आतल्या खोलीतून दिदी आम्हाला भेटायला आल्या आणि त्या खोलीतलं वातावरण एकदम बदलूनच गेलं. एका ज्येष्ठ अभिनेत्रीला तुम्ही भेटताय, असं अजिबात जाणवू न देता दिदीही आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाल्या. त्यांचा चित्रपट प्रवास तर, आम्हाला बऱ्यापैकी माहिती होता; पण behind the camera घडलेले प्रसंग सांगून दिदींनी संपूर्ण वातावरणच बदलून टाकलं.

अल्फा मराठीवर नवीनच सुरू होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हायची त्यांची इच्छा होती, मात्र या कार्यक्रमाचा स्टुडिओ ज्या ठिकाणी होता, तिथपर्यंत दिदींना व्हीलचेअरवर बसवून नेणं शक्य होणार नव्हतं. या एकाच कारणासाठी सगळ्यांच्या मनात असूनही दिदी त्या कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत. पण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांनी आम्हाला शुभेच्छा मात्र दिल्या. माझी मोठी आत्या दिसायला काहीशी दिदींसारखीच होती. हे त्यांना सांगितल्यावर त्या मंदशा हसल्या. त्यांचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो. कार्यक्रम करता येणार नाही म्हणून आम्ही सगळेच काहीसे हिरमुसले होतो, पण त्यांना भेटता आलं याचाही आनंद होता.

ती भेट कायमची आठवणीत राहणारी होती.

toyashara@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!