तिची लॅपटॉपवर तंद्री लागली होती. दबकत दबकत त्याने तिच्या आजूबाजूने दोन-तीन फेऱ्या मारल्या. पण लक्षच नव्हतं तिचं… की लक्ष नाही असं दाखवत होती कोण जाणे! फेसबुकवर पोस्ट लिहिताना तिच्याशी बोललेलं तिला अजिबात आवडत नाही, लिंक तुटते म्हणे!
शेवटी धीर करून तो म्हणालाच, “तुला भूक नाही लागली?”
“लागलीय ना!”
“मला पण भूक लागलीय, जेवूया का आता?”
“किती वाजले?”
“आठ!”
“आठ?” ती किंचाळलीच… “अरे, दीक्षितप्रमाणे सात वाजता जेवतो ना आपण? आधी नाही का सांगायचं? तुझं वय झालं हं आता… सगळं विसरतोस. आता जेवायचं पण विसरायला लागलास का?”
“अगं, तुझं टायपिंग थांबलं की, बसू आपण म्हणून मी वाट बघत होतो. बरं, तू तुझी पोस्ट आटपून ये; तोपर्यंत मी टेबल मांडतो!”
हेही वाचा – आजच्या भाजीचा बेत…
थोडावेळ किचनमधून खुडबूड ऐकू येत होती.
“हळू रे, किती आवाज करतोहेस! आलेच मी शेवटचं वाक्य पूर्ण करून.”
पण तेवढ्यात तोच कमरेवर हात ठेवून तिच्यासमोर उभा… “काय जेवायचंय आज?”
“खिचडी!” लॅपटॉपवरून मानही वरती न करता ती म्हणाली.
“पण ओट्यावर, डायनिंग टेबलावर तर काहीच नाहीये!”
आता मात्र ती गोंधळून त्याच्याकडे बघतच बसली आणि मग किंचाळलीच, “अरे देवा, मी कूकर लावलाच नाही… विसरलेच!”
खुर्ची मागे सारून ती ताडकन उठली आणि किचनमध्ये धावली.
“तू खिचडी लावायला विसरलीस? अशी कशी विसरलीस?”
“अरे, पोस्ट लिहित होते ना; घड्याळाकडे लक्षच नाही.”
“लॅपटॉपच्या कोपऱ्यात तारीख आणि वेळ दाखवली जाते!”
तिने त्याच्या बोलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं.
“बरं झालं बाई, माझं अजून तुझ्यासारखं वय नाही झालेलं. नाहीतर तू माझ्या वयावर सगळं ढकलून मोकळा झाला असतास!” बोलता बोलता एकीकडे तिचे हात भराभर चालले होते.
“माझ्या पोटात शेकोटी पेटलीय. खिचडी होऊन पानात पडेपर्यंत अर्धा तास तरी लागेल. काहीतरी थोडसं तोंडात टाकतो तोपर्यंत! फ्रीजमध्ये काय काय आहे?”
खाऊचे डबे रिकामे झालेत ते त्याला माहिती होतं.
“फ्रीजमध्ये… फ्रीजमध्ये… अं… अं… कोबी, पालक, वांगी…!”
“वांगी…? वांगी खाणार आहे का मी आता?”
“वांगी? आत्ता? तू आता वांग्यांच नाव पण काढू नकोस हं! मी उद्या भरली वांगी करणार आहे!”
“अगं पण, मी कुठे म्हणतोय?”
“तुझं काही सांगता येत नाही हं! गेल्यावेळेला नाही का, द्राक्षं सगळी खाऊन टाकलीस… संपल्याचं मला सांगितलंस पण नाही. त्यामुळे मी खरेदीला गेले तेव्हा आणायची राहिली.”
“अगं पण, वांगी आणि द्राक्षं… तुलना तरी होतेय का?”
इतक्यात कूकरची शिट्टी झालीच.
“चल, आता पंधरा मिनिटांत जेवू. तू ताट घे पटकन. मी चटणी, लोणचं, कोशिंबीर वाढायला घेते आणि पुढच्या वेळी असा विसरू नकोस! अरे, दीक्षित पाळायचं म्हणजे फक्त दोन वेळा जेवायचं… असं नसतं रे! वेळा पण पाळायच्या असतात, लक्षात ठेव. नाहीतर म्हणशील, विसरलो!”
हेही वाचा – असेच कानावर पडलेले संवाद…
कूकरचं झाकण उघडल्यावर गरमागरम खिचडीचा असा सुगंध दरवळला… त्याच्या तृप्त चेहऱ्याकडे बघून, चळचळीत तुपाची धार खिचडीवर घालत ती खुशीत म्हणाली, “बघ, अशी वाफेची खिचडी मस्त लागते ना!”
त्याचं लक्ष होतं कुठे तिच्याकडे… स्वर्गसुखात तो मग्न होता!


