मनोज जोशी
सध्या बायोमॅट्रिक आणि टार्गेटच्या जमान्यात प्रत्येकाची फरफट सुरू आहे… प्रत्येकाची ‘दमलेल्या बाबाची कहाणी…’ आहे. पत्रकारितेत साधारणपणे 31-32 वर्षे आहे. ‘आपलं महानगर’चं भावंड असलेल्या ‘हमारा महानगर’पासून या वाटचालीला सुरुवात झाली. या वाटचालीत अनेक नोकऱ्या बदलल्या. ‘नवशक्ति’, ‘लोकमत’, ‘प्रहार’, ‘ईटीव्ही’ (चॅनल आणि वेबसाइट) आणि महानगर येथे दोन वेळा रुजू झालो होतो. त्यात सर्वाधिक काळ ‘लोकमत’मध्ये! सर्वात आधी 2002मध्ये लोकमत जॉइन केले आणि 2009मध्ये ते सोडले.
वृत्तपत्राचा जॉब हा कायम संध्याकाळचा. लोकमतचे ऑफिस आधी चिंचपोकळीला होते आणि घरातून मी साधारणपणे साडेतीन-चार वाजता निघत असे. घरी यायला साधारणपणे रात्रीचे एक-दीड वाजायचे. माझी पत्नी आराधना त्यावेळी अल्फा वाहिनीसाठी (आताचे झी) काम करत होती. ती सकाळी साडेआठच्या सुमारास घरातून बाहेर पडत असे. माझी सासुरवाडी बाजूलाच असल्याने ती लेकीला सोबत घेऊन जात असे आणि सासुरवाडी सोडत असे. दोन-एक तासाने माझ्या सासूबाई लेकीला घेऊन येत असे. नंतर ऑफिसला जायच्या आधी त्या तिला पुन्हा घेऊन जात असत. तेवढीच आमची भेट.
हेही वाचा – प्रोफेशनमधील प्रोफेशन
रात्री उशिरा घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यावर मी लेकीकडे जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत असे. लेक साधारणपणे सहा वर्षांची होती… नेहमीप्रमाणे रात्री ऑफिसमधून आल्यावर तिच्या डोक्यावरून हात फिरवत असताना, अचानक तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, “बाबा…”
चक्क ती जागी होती…! म्हणालो, “काय बेटा?”
तिने पलंगाच्या दुसऱ्या दिशेला बोट दाखवून सांगितले की, “तिथं काही तरी हलतंय!” मी जवळ जाऊन बघितले तर, एक प्लास्टिकची पिशवी होती, जी पंख्याच्या वाऱ्यामुळे हलत होती. त्या भीतीने बिचारी झोपली नव्हती. मी ती पिशवी बाजूला केली, त्यानंतर एकमेकांना “गुड नाइट” करून झाल्यावर मी खोलीच्या बाहेर पडलो. एवढ्या रात्री तिच्याशी बोलल्याने मी सुखावलो होतो.
त्यानंतर 2006मध्ये ‘लोकमत’चे ऑफिस सानपाड्याला शिफ्ट झाले. त्यामुळे 2009 सालापर्यंत मी सानपाड्याला जात होतो. विरार ते नवी मुंबई असा तो प्रवास होता. तीन गाड्या बदलून जात असे; येतानाही तशीच कसरत! जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी सुमारे अडीच तास!
हा प्रवास आणि मध्य रेल्वेचे कोलमडणारे वेळापत्रक ध्यानी घेऊन ही चार वर्षे मी ऑफिसमध्येच रात्री मुक्काम करत असे. सानपाड्यावरून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.02च्या गाडीने घरी यायला निघायचो. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत पोहोचण्याची धडपड असायची. माझी लेक तेव्हा दुसरी-तिसरीत होती. सकाळची शाळा होती… सात वाजता स्कूलबस यायची. बस्स, ते अर्धा तास भेटणे होते… जणू काही अर्ध्या तासाचा डेली-सोपच होता… ऑफिसला जाण्यासाठी मी दुपारी दोन वाजताची ट्रेन पकडत होतो आणि सव्वादोन वाजता लेकीची स्कूलबस यायची. शाळेतून आल्यावर लेक जवळच असलेल्या तिच्या आजी-आजोबांकडे जायची. तेव्हाची गोष्ट ही…
सानपाड्याला असताना माझी शनिवारी सुट्टी असायची. पण एक दिवशी मी रविवारीसुद्धा सुट्टी घेतली होती. जेवण झाल्यावर दुपारी हॉलमध्येच मस्त ताणून दिली होती. सायंकाळी सातच्या सुमारास जाग आली… टीव्हीवर संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रम सुरू होता. जाग आली अन् नेमके ‘दमलेल्या बाबाची कहाणी…’ गाणे सुरू झाले… मी उठून बसलो… डोळ्याला धारा लागल्या होत्या… आराधनाच्या ते लगेच लक्षात आले. ती माझ्या शेजारी येऊन बसली अन् माझ्या पाठीवर थोपटू लागली… तीही रडत होती. समोर बसलेली माझी लेक, एकदा माझ्याकडे तर, एकदा आईकडे पाहात राहिली… तिने निरागसपणे विचारले, ‘आई, बाबा का रडतोय?’ आम्ही दोघेही तिला समजावू शकलो नाही…
अखेर मी नोकरी बदलायचा निर्णय घेतला आणि पुन्हा ‘नवशक्ति’ जॉइन केले. आराधनानेही ‘अल्फा’ सोडून विरारमध्येच ‘विवा कॉलेज’ जॉइन केले… आणि आमचे डीएसके झाले… म्हणजे घराला घरपण आलं…
मधे एक वर्ष नाशिकचे सोडले तर, आम्हा तिघांच्या नात्याची वीण घट्ट होऊ लागली!
लेक आता डॉक्टर झाली आहे… मी नोकऱ्या बदलतोच आहे… पण रूटिन तेच आहे… गाण्याचेही तेच सूर आहेत… ‘दमलेल्या बाबाची कहाणी…’
हेही वाचा – फुंकर
एक न उलगडलेले कोडे
पुढे जाण्याच्या प्रयत्नात माणूस कुटुंबापासून तुटतो. आपल्या प्रगतीबरोबरच फॅमिलीच्या सुखासाठी माणूस पळपळ पळतो… फॅमिली मागे राहते… कुटुंबाबरोबर राहीले, तर आपण कुटुंबासाठी काही करीत नाही, असे मन खाते. काय करायचे?
‘रंगिला’मधलं गाणे आठवते? (फक्त पहिल्या चार ओळी) –
क्या करे, क्या न करे
कैसी मुश्किल हाय…
कोई तो बता दे
इसका हल ओ मेरे भाय…