मनोज जोशी
नियमित आयुष्यात तुमचं प्रोफेशन कुठे ना कुठे तरी डोकावतंच. साधारणपणे 25-30 वर्षांपूर्वी विजय पाटकर दिग्दर्शित ‘हलकं फुलकं’ नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यावेळी ते खूप लोकप्रियही झालं होतं. या नाटकात विजय कदम, रसिका जोशी आणि नंदू गाडगीळ हे तीनच कलावंत होते. त्यापैकी नंदू गाडगीळ हा सूत्रधार. तर, विजय कदम यांनी या नाटकात सहा तर, रसिका जोशी यांनी पाच वेगवेगळी पात्रं रंगवली होती. दुर्दैवानं, आज हे दोन्ही कलावंत हयात नाही. सांगायचा मुद्दा हा की, या नाटकात रसिका यांनी केशकर्तनालयच्या मालकाच्या पत्नीची भूमिका केली होती. त्यात त्यांचा एक संवाद होता, ‘गप्पा काय दाढीच्या साबणाच्या फेसासारख्या असतात, जेवढ्या फेसाव्यात तेवढा फेस येतो…’ यामुळे तिचा कौटुंबिक व्यवसाय अधोरेखित झाला.
आता काही चित्रपटही प्रोफेशनवर आधारित आहेत आणि त्यांच्या नावावरूनही ते स्पष्ट होतं. उदाहरणच द्यायचं झालं तर, मराठीत ‘हमाल दे धमाल’ ‘पांडू हवालदार’ अन् हिंदीत ‘कुली’, ‘तांगेवाला’! पण अशी अनेक गाणी आहेत की, ती ऐकल्यानंतर ते ते प्रोफेशन डोळ्यासमोर उभे राहते. मराठी चित्रपटापासून सुरुवात करायची झाली तर, 1955 सालचा ‘साधी माणसं’ चित्रपटातील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे…’ हे गाणं कसं विसरता येईल. 1971 साली प्रदर्शित झालेल्या ‘चुडा तुझा सावित्रीचा’ या चित्रपटातील (फारसं लोकप्रिय झाले नसले तरी) ‘लावा भांड्याला कल्हई..’ या गाण्याची दखल घ्यावी लागेल.
‘हऱ्या नाऱ्या झिंदाबाद’मधील (1972) ’कशी नखऱ्यात चाललीया गिरणी…’, 1977 सालच्या ’बन्या बापू’ सिनेमातील ’ले लो भाई चिवडा ले लो…’ या गाण्यांचाही उल्लेख करावाच लागेल. ‘श्यामची आई’ (1953) या चित्रपटातील ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम…’ हे गाणं शिक्षकी पेशाचं आठवण करून देणारं आहे. 1975 सालचा दादा कोंडके अभिनीत तसेच सदिच्छा चित्र या बॅनरखाली दिग्दर्शित आणि निर्मित ‘पांडू हवालदार’ चित्रपटातील ’बाई मी केळेवाली मी सांगा…’ तसेच ’हमाल दे धमाल’ (1989) या सिनमेतील ’बजरंगाची कमाल हमाल दे धमाल…’ ही गाणी आहेतच.
हेही वाचा – सेम टू सेम!
मराठी मातीचे गायन सुरू असताना बळीराजाचे प्रतिनिधित्व गाण्यामध्ये दिसणारच! 1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालतं…’ हे गाणं सर्वांच्याच ओठांवर तेव्हाही होतं आणि आजही आहे. एकूणच ते अजरामर आहे. 1950 सालच्या ‘राम राम पाव्हनं’ या चित्रपटातील ‘माझ्या शेतात सोनंच पिकतंय…’ या गाण्याबरोबरच ‘साधी माणसं’ सिनेमातील ‘माळ्याच्या माळ्यामंदी पाटाचं पानी जातं…’ हे गाणंही लोकप्रिय गाण्यांपैकीच एक. तर, 2007मध्ये आलेल्या ‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या चित्रपटातील ‘भलरी दादा भलरी…’ हे गाणंही पिकपाण्यात रमलेल्या शेतकऱ्यांचं आहे. (असेच एक जुने लोकगीतही आहे.)
ही गाणी प्रातिनिधीक स्वरुपातील आहे. अशी आणखी गाणी मराठी चित्रपटांमध्ये आहेत. पुढील लेखात हिंदी चित्रपटांमधील अशी गाणी पाहुयात.
(क्रमश:)
हेही वाचा – थिंक पॉझिटिव्ह