माधवी जोशी माहुलकर
शॅलोट्स हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मिळणारा छोट्या आकाराच्या कांद्याचा प्रकार आहे. हे कांदे आकाराने अगदी लहान असल्यामुळे यांना भाजीवाल्यांकडे ‘बेबी ओनियन’ही म्हटले जाते. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात या कांद्याचा वापर न चिरता सांबार, भाजीत केला जातो. सलाड, सूप, सॅास, फ्राईड राइस, व्हिनेगर, साल्सा, ड्रेसिंग अशा अनेक पाककृतींमधे शॅलोट्स वापरले जातात. स्लाइस करून गरम तेलात कुरकुरीत तळून बर्गर, स्ट्यू किंवा सलाडवर टॉपिंग म्हणून याचा वापर करतात. अंड्याचे पदार्थ, पास्ता सॅास तसेच साऊथ इंडियन बिसीबेळे भातामध्ये शॅलोट्सचा वापर करतात. कांद्यापेक्षा थोडे सौम्य आणि किंचित गोड असलेले हे शॅलोट्स थोडीफार लसणाची चव बाळगून असतात. उष्ण आणि दमट हवामान या कांद्यांना पोषक असते. शॅलोट कांद्यांचे मूळ मध्य आशिया आहे, परंतु व्यापार-उदीमामुळे ते आता जगभर पसरले आहेत. भारतीय, थाई, फ्रेन्च पाककृतींमध्ये त्यांचा प्रामुख्याने वापर होतो. जास्त चिरफाड न करता हे कांदे वापरता येतात, पटकन शिजतात. चवीलाही उग्र नसतात. याचे लोणचे तर अप्रतिम आणि चवदार होते, शिवाय, मुरतेही पटकन!
साहित्य
- शॅलोट – वाटीभर
- लोणचे मसाला – 4 टेबलस्पून
- तेल – दीड पळी
- तिखट – 2 ते 3 चमचे
- मीठ – चवीनुसार
- एका लिंबाचा रस
- मोहरी – 1 लहान चमचा
- जिरे – 1 लहान चमचा
- हळद – 1 चमचा
- मेथीदाणे – 5-6
- लवंग – 3-4
- काळीमिरी दाणे – 3-4
- हिंग – 1 चमचा
हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!
कृती
- प्रथम शॅलोट्स कांदे स्वच्छ धुऊन सुकवून घ्यावे. हे काम सात-आठ तास आधी केले तर उत्तम!
- लोणचे करण्याआधी चाकूने शॅलोट्सला मध्यभागी एकेक चिरा द्यावा, जेणेकरून लोणचे मसाला त्यामध्ये मुरेल.
- नंतर एका बाऊलमधे शॅलोट्स घेऊन त्यावर दोन चमचे लोणचे मसाला, दोन चमचे तिखट, मीठ आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून बाजूला ठेवावे.
- एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडल्यावर हिंग टाकून लगेच तेलात मेथीदाणे, लवंग आणि काळीमिरी टाकून गॅस बंद करावा.
- तेल कोमट झाल्यावर त्यात हळद आणि दोन चमचे लोणचे मसाला, एक चमचा तिखट टाकून तेल पूर्णपणे थंड होऊ द्यावे.
- तेल थंड होईपर्यंत शॅलोट्सला थोडे पाणी सुटले असेल. अर्ध्या पाऊण तासाने तेल पूर्णपणे थंड झाल्यावर ते शॅलोट्सच्या लोणचे मसाला घातलेल्या बाऊलमध्ये टाकावे आणि मिक्स करावे.
- स्वाद आणि चवीचा सुंदर मिलाप असलेले लोणचे मसाल्यात घोळलेले शॅलोटस जेवणाची रंगत वाढवतात.
- पोळीसोबत किंवा भातामध्ये कालवून अथवा खिचडी सोबत हे शॅलोट्सचे लोणचे एक वेगळाच ट्विस्ट आणते.
एकूण कालावधी – 15 मिनिटे
हेही वाचा – Recipe : पोळीचे चटकदार खस्ते!
टिप्स
- हे लोणचे तात्पुरते करायचे असल्यास 15 दिवस फ्रीजमधे छान राहते. फक्त शॅलोट्स फ्रेश पाहिजेत, काळे झालेले किंवा आतून खराब असलेले नको. ते व्यवस्थित तपासून घ्यावे.
- लोणचे जास्त वेळ टिकवण्याकरिता त्यात प्रिझर्व्हेटिव्ह टाकण्याऐवजी जर सहज शॅलोट्स उपलब्ध होत असतील तर असे चटकन तात्पुरते लोणचे उपयोगात आणणे कधीही चांगले!
- उन्हाळ्यात कैरीचा किस टाकून हे लोणचे अजूनच छान करता येते!
- पोळी, थालिपीठ, पराठे याशिवाय भात, खिचडी, पुलाव यासोबत हे लोणचे तोंडीलावणे म्हणून वापरले जाते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


