सुरेश महाबळ
आज गुरू पौर्णिमा… मला अनेक गुरुजनांचा सहवास आणि सेवा करण्याची संधी मिळाली. अशाच एका महान गुरूंची आठवण मी आज सांगणार आहे. शैक्षणिक तफावत असून सुद्धा माझ्या वाचनाची आवड लक्षात घेऊन अनेक विषयांवर त्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांनी पण माझी पाठ थोपटून माझ्याकडून अनेक पुस्तके स्वतःच्या संदर्भासाठी वापरली.
हे गुरू म्हणजे प्रा. म. मो. केळकर. अत्यंत स्वच्छ वर्तन, उंची जेमतेम पाच फूट, वर्ण गोरा, केस मागे फिरविलेले – त्यामुळे कपाळ मोठे दिसायचे. निळे डोळे समोरच्याचा वेध घेणारे. अंगावर कायम आवडता पेहराव म्हणजे झब्बा आणि पायजमा… ते एम. जे. कॉलेज, जळगाव येथे संस्कृत विभागाचे प्रमुख होते. जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबई येथील अनेक विद्वानांशी प्रत्यक्ष संपर्क होता. कॉलेजचे विद्यार्थी आणि जुने ज्येष्ठ अभ्यासूमंडळी विविध संदर्भांसाठी त्यांच्याकडे येत असत. आता ते हयात नाहीत.
बालवाडीपासून जुन्या 11वीपर्यंत त्यांचा मुलगा प्रमोद आणि मी सोबत शिकत होतो. 11वीनंतर आमचे रस्ते वेगळे झाले. प्रमोदचे Bits पिलानी येथील शिक्षणानंतर आयआयटी, अहमदाबाद येथे पुढील शिक्षण सुरू झाले. वयाने मोठे असले तरी, आमचे संबंध कृष्ण-सुदामासारखे होते. प्रमोद शिकत असताना ते 1975 ते 77 या कालावधीत मिसाअंतर्गत नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात होते. त्या वेळी प्रमोदच्या आईशी नेहमी आणि नित्यनेमाने भेट होत असे.
कालांतराने माझं लग्न झालं. मला दोन मुली आहेत. मोठी हर्षा आणि धाकटी मानसी. सरांना मी बाबा म्हणत असे आणि मुली त्यांना आजोबा. हर्षाच्या सातवीनंतर आणि मानसीच्या पाचवीनंतर त्या त्यांच्याकडे संस्कृत शिकण्यासाठी 6 वर्षं जात होत्या. तुझ्या मुली माझ्याकडेच संस्कृत शिकतील हा त्यांचा हट्ट होता, तो त्यांनी पूर्ण केला. संस्कृतसोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी यातील व्याकरणाच्या अत्यंत सुंदर खुबी, तसेच उच्चार, शब्दांचे आघात शिकविले, याची फलश्रुती म्हणजे संस्कृत विषयात हर्षाला 10वी बोर्डाचे बक्षीस मिळाले.
हेही वाचा – आमच्या मराठी शाळा
एका गुरू पौर्णिमेला माझी घरामध्ये चर्चा सुरू होती की, आज बाबांकडे जायला पाहिजे, वेळ साधारण सकाळी 8.30 से 9.00 वाजताची. पण अचानक बाबाच घरी आले. बाबा घरात आल्यानंतर आधी आम्ही दोघांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या आवडीचे पोहे आणि चहा असा बेत केला. साधारण एक तासाने मला सांगितले की, ‘तू कामावर जा. पण आधी मला रिक्षापर्यंत गाडीने सोड.’ हे फर्मान त्यांनी सोडले असले तरी मला ते मान्य नव्हते. कारण, त्यांना घरापर्यंत पोहचविणे माझे परम कर्तव्य होते. त्यानुसार त्यांना घरापर्यंत सोडण्यासाठी गाडीवर बसविले.
एकतर गुरू पौर्णिमा, सोबत गाडीवर बाबा… त्यामुळे रस्त्यामध्ये अनेक जुने विद्यार्थी गाडी थांबवायला सांगून भर गर्दीमधे सरांच्या पाया पडत होते. हे पाहून अनेक ज्येष्ठ नागरिकही आम्हाला थांबवत होते. सोबत साक्षात गुरू आणि मी सारथी… मला मात्र संकोचल्यासारखे झाले! पण गुरू म्हणून बाबांचा दबदबा बघितल्यावर, मानसपुत्र म्हणून अभिमानही वाटला.
माझ्या मुलींना त्यांचा सहवास आणि शिकण्याची संधी मिळाली, हे मी मुलींचे भाग्यच समजतो. आज गुरू पौर्णिमेनिमित्त त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
हेही वाचा – दमलेल्या बाबाची कहाणी…