मागील लेखात आपण योगाभ्यासातील दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य प्राप्ती तसेच संवर्धन याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण कपालभाती अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत.
कपालभाती म्हणजे काय?
कपालभाती म्हणजे श्वसनमार्ग शुद्धिकरण प्रक्रिया आहे. कपाल म्हणजे कवटी आणि भाती म्हणजे चमकणे. कपालमध्ये मोठा आणि लहान मेंदू इत्यादी कवटी अंतर्गत येणाऱ्या सर्व इंद्रियांचा समावेश होतो. कपालभाती केल्याने ही इंद्रिये प्रकाशमान होऊन अधिकाधिक कार्यक्षम होतात.
कपालभाती कशी करावी?
बैठक स्थितीतील पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन अथवा सहजासन घेऊन ताठ बसावे. डोळे बंद करून दोन्ही हातांची द्रोणमुद्रा करून हात गुडघ्यांवर ठेवावेत. संथ श्वसन करत रहावे. तद्नंतर, दीर्घ श्वास घेऊन सावकाश श्वास सोडत जावे. श्वास सोडत असताना शेवटच्या क्षणी पोट जोरात आत खेचून घ्यावे आणि त्याच वेळेस जोरात धक्क्याने श्वास सोडायचा, ही झाली एक आवृत्ती. अशा रीतीने पोट आत, तेव्हाच श्वास बाहेर, ही क्रिया हळूहळू आणि नंतर जलद गतीने करून आवृत्त्या मोजायच्या.
हेही वाचा – योगाभ्यासातील प्रार्थनेतून निरामय मानसिक आरोग्य
एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने केलेल्या आवृत्त्यांचे एक आवर्तन होते. कपालभातीच्या दोन आवर्तनांमध्ये एक मिनिट संथ श्वसन करणे आवश्यक आहे.
कपालभाती क्रियेत प्रयत्नपूर्वक केलेला रेचकच महत्त्वाचा आहे. श्वास घेण्यासाठी काहीच करायचे नाही, कारण श्वास नैसर्गिकरीत्या आपसूकच घेतला जातो. कपालभाती एक नाकपुडी बंद करून दुसर्या नाकपुडीने करण्याची देखील पद्धत आहे.
कपालभातीचे प्रकार
आवृत्तीच्या संख्येनुसार कपालभातीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत :
- दीर्घ कपालभाती
- मध्यम कपालभाती
- जलद कपालभाती
कपालभातीचे मानसिक आरोग्य लाभ
साधकास कपालभाती अभ्यासातून पुढील मानसिक आरोग्य लाभ मिळतात :
- मानसिक ताणतणाव कमी होण्यास साहाय्य लाभते.
- मानसिक थकवा जाऊन उत्साह वाढतो.
- गाढ झोप लागते.
- उत्तम मानसिक विश्रांती मिळते.
- विविध प्रकारच्या मानसिक व्याधी-विकारांवर नियमित कपालभाती हा प्रभावशाली आणि उपयुक्त उपाय आहे.
हेही वाचा – दीर्घ श्वसन अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
कपालभातीसंबंधित काही महत्त्वाचे मुद्दे
दैनंदिन योग साधना करताना प्राणायामापूर्वी कपालभाती करावी, म्हणजे प्राणायामाचा अभ्यास सुकर आणि परिणामकारक होतो. कपालभाती अभ्यास यथाशक्ती क्षमतेनुसार करावा. योगाभ्यासातील कपालभाती अभ्यासाची कृती तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.
योगाभ्यासातील अशाच एका समाविष्ट विषयाच्या अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.
नम्र निवेदन
गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर 🙏/👌/👍 / 👏 / तत्सम चिन्हाने व्हॉट्सॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.


