भाग – 2
त्याच्या छातीत धडधड अजूनही सुरूच होती… प्रत्येक श्वास खोल, घाईघाईचा होता आणि शरीर घामाने डबडबलेले… त्या अनोळखी, पण आश्वासक व्यक्तीने ते जाणलं… आणि मग त्याने हळूहळू गुहेच्या प्रवेशद्वारावरचं मजबूत आच्छादन, जणू काळजीपूर्वक लपवलेला दरवाजा, अलगद बाजूला केला आणि गुहा उघडीली… थोडासा बाहेरचा प्रकाश दिसला… पण आता तोही झपाट्याने कमी होत चालला होता. सूर्य मागे सरकून अंधार आपली चादर पसरण्यास सिद्ध झाला होता.
युवक पटकन उठून उभा राहिला. चेहरा विचारांमध्ये हरवलेला… तो बाहेर पडून थांबला… समोर फक्त काळोख आणि गूढ झाडांची रांग. जंगल आता दिवसाच्या ओळखीचं नव्हतं, ते परकं, पण जिवंत वाटणाऱ्या अस्तित्वाने व्यापलेले होते.
“आता काय? इथून निघणार कसं? …आणि जाऊ तरी कुठे?” चेहऱ्यावर प्रश्नचिन्हांची गर्दी झाली होती…
तितक्यात त्याच्या विचारांची तगमग थांबली. मन एकदम शांत झालं, कारण लक्ष एका गोष्टीकडे वेधलं गेलं…
“आपल्याला वाचवलं तरी कोणी?”
हळूहळू त्याने मान वळवली, आणि समोर उभी असलेली ती आकृती नीट पाहण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्याला जाणवलं, ती व्यक्ती शरीराने अत्यंत ताकदवान होती… व्यायामाने कमावलेलं शरीर, स्नायूंनी भरलेला बांधेसूद अवयव, प्रत्येक हालचालीत एक शिस्त, एक भारदस्तपणा! चेहरा अस्पष्ट… कारण दाट दाढीत लपलेला होता आणि त्यावरही चिखलाचं आवरण… डोळे मात्र स्पष्टपणे दिसत होते… डोळ्यांत एक विचित्र सामर्थ्य होतं… जणू बरंच काही पाहिलेलं, आणि अजून बरंच काही सहन करायला तयार… संपूर्ण शरीर चिखलाने माखलेलं… जणू जंगलात मिसळून गेलेलं… माणूस नाही, तर स्वतः जंगलाचा एक भागच!
त्याच्या हातात एक साधा, पण मजबूत लाकडी दांडा होता. कपडे म्हणजे मातीने माखलेलं एक धोतर… तरीही हालचालींत एक प्रकारची आत्मविश्वासाची झलक! तो बोलला नव्हता, पण त्याचं अस्तित्व खूप काही सांगत होतं…
शीख युवक काही क्षण त्या मूक, चिखलाने माखलेल्या व्यक्तीकडे पाहातच राहिला… ती व्यक्ती अजूनही स्तब्ध उभी होती. तिचे डोळे थेट त्या शीख युवकावर खिळलेले, खोल, स्थिर आणि एकटक… कोणतीही भावना न दाखवता, पण जणू आतमध्ये काहीतरी तपासत होती. युवकाचं काळीज धडधडायला लागलं. जणू त्या नजरेतून काही भेदून पाहिलं जात होतं — त्याचा हेतू, त्याचा भूतकाळ, त्याच भय! एका संकटातून वाचलो, तर दुसरं संकट समोर उभं ठाकलं होतं!!
तो मागे वळून पाहतो, पण जंगलाच्या काळोखात आता कुठलाही मार्ग दिसत नव्हता. “पळून जाणार तरी कुठे?” हा प्रश्न त्याच्या मनात घुमत राहिला.
दुसरीकडे, जंगलातील प्राण्यांची आठवण झाली… बिबट्याच्या गुरगुरण्याचा भास, सापांची सरसर, अज्ञात झाडांमागे हालचाली… भीतीने त्याचं उरलंसुरलं धैर्यही गळून पडलं. हात थरथरू लागले, श्वास अनियमित झाला…
संपूर्ण वातावरण जणू त्याच्याभोवती फिरू लागलं — झाडं हलताहेत, आकाश फिरतंय आणि तो स्वतः त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी… असं काहीतरी आहे, जे समजण्याआधीच जड होत चाललं. त्या धकाधकीत… एका क्षणाला त्याच्या डोळ्यांपुढे काळोख दाटू लागला, पाय लटपटले… आणि तो सरळ खाली कोसळला. त्याची शुद्ध हरपली… पडताना त्याला फक्त इतकंच आठवलं — ती जोडी डोळ्यांची! जी अजूनही त्याच्यावर रोखून पाहात होती… मूक, पण अर्थपूर्ण… भयावह, पण कदाचित वाचवणारी…
हेही वाचा – तू भेटशी नव्याने…
किती वेळ गेला, काहीच ठाऊक नव्हतं. काळ जणू थांबलेला होता की पुढे निघून गेलेला, कोण जाणे? सगळं एका काळसर, अंधुक शून्यात विरलेलं…
पण त्या शांततेत अचानक थोडसं थंड पाणी तोंडाला स्पर्शून गेलं. पहिल्यांदा एक थेंब… मग दुसरा… ते थेंब तोंडावाटे झिरपले, गळ्याखाली उतरले… आणि त्या गुंगीत हरवलेल्या शरीराला हळूहळू जाग आली. पाण्याच्या हलक्या, सावधशीर शिडकाव्याने चेहरा ओलावला आणि गुंगीची धुंदी हलकी होत गेली. त्याच्या भुवया हलल्या, डोळे अलगद उघडले… झरझर चालणाऱ्या विचारांना अजून दिशा नव्हती, पण आता भान जागं होऊ लागलं होतं…
डोळे किलकिले करत त्याने वर पाहिलं… आणि समोर तीच व्यक्ती दिसली. ती उभी नव्हती, वाकून त्याच्याजवळ बसलेली होती. चेहऱ्यावर दाढी, शरीरावर चिखल… पण त्या नजरेत… भीती नव्हती, राग नव्हता — होती काळजी! शांत, स्थिर, आणि बोलकी काळजी…
एका क्षणाला युवकाच्या मनात विचार चमकला, “ही व्यक्ती माझा शत्रू नसावी…”
पूर्ण शुद्धीत येताच तो एकदम खडबडून जागा झाला. श्वास घाईघाईने चाललेला, चेहऱ्यावर गोंधळ आणि डोळ्यात अजूनही काळजीची छाया होती… त्याने आसपास पाहिलं — अजूनही तो जंगलातच, पण थोडी मोकळी जागा होती. समोर ती व्यक्ती, शांतपणे त्याच्याकडे पाहात बसलेली.
तो पटकन उठून बसला. ओशाळून, थोडा अपराधी भावनेने म्हणाला,
“सॉरी… मैंने आपको तकलीफ़ दी।”
त्याच्या आवाजात नम्रता होती, आणि थोडा संकोचही — अशा अनोळखी, पण मदतीला धावून आलेल्या व्यक्तीसमोर…
ती व्यक्ती हलकं स्मित करत म्हणाली. “कोई बात नहीं… आपको प्यास लगी होगी।”
त्याने पुन्हा हातातलं भांड पुढे केलं. त्यातलं पाणी थोडं मातकट होतं, पण गार आणि जंगलाच्या पोटातून आलेलं — जणू निसर्गाचा शुद्ध स्पर्श!
जंगलाच्या गूढ शांततेत काही वेळ तसाच गेला. त्यानंतर त्या व्यक्तीने जमिनीवर लाकडे गोळा करून एक छोटीशी चूल लावली. त्याच्या हालचालींत प्रचंड अनुभव दिसत होता… प्रत्येक कृती नेमकी, सावध आणि शांत.
त्याने चुलीवर एक मातीचं भांडं ठेवलं आणि त्यात काहीतरी उकळू लागलं. आसपासच्या झाडाझुडपांमधून मिळवलेली काही रानभाज्या, थोडी कंदमुळे आणि एका बांधलेल्या कपड्यातून काढलेलं मीठ… याचा संमिश्र सुवास हवेत पसरू लागला. थोड्या वेळानं त्याने ते शिजलेलं काहीसं त्या भांड्यातून दोन छोट्या मातीच्या वाट्यांत ओतलं आणि एक वाटी त्या शीख युवकासमोर ठेवली. ते दोघं एकमेकांकडे पाहात होते.
युवकाच्या मनात मात्र एक वेगळाच संघर्ष सुरू होता. “हे काय शिजवलं आहे? काही विषारी रानफळं तर नाहीत ना? आपल्याला मारायचाच हेतू असेल तर?”
अशा काहीशा विचारात त्याचं चेहरा साशंकतेने भरला होता. तो थोडा टंगळमंगळ करत, वाटीकडे पाहातच राहिला. त्याचं वागणं त्या व्यक्तीनं ताडलं. तो चेहऱ्यावर हलकंस हसू उमटलं… आणि त्यानं काहीच न बोलता स्वतःची वाटी उचलली आणि सहज तोंडाला लावून त्या गरम अन्नाचा घोट घेतला. ते पाहून शीख युवक थोडासा निश्चिंत झाला… “जाऊ दे, जे होईल ते होईल…” असं म्हणून त्यानं वाटी तोंडाला लावली.
हेही वाचा – मैं जिंदगी का साथ निभाता चला गया…
पण पहिल्याच घोटात गरम अन्नाने त्याचं तोंड खरंतर जरा भाजलं… आणि आपसूक त्याच्या तोंडून बाहेर पडलं, “आई गं!”
“मराठी आहेस?” असा प्रश्न त्या अज्ञात व्यक्तीने केला. अचानक विचारलेल्या या प्रश्नानं भान येताच तरुणाने गडबडून मान खाली घातली. तो कावराबावरा झाला… त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव होता, जणू आपण काही अयोग्य बोललो, असं त्याला वाटलं.
पण समोर बसलेल्या व्यक्तीने मात्र आणखी काही प्रतिक्रिया न देता शांतपणे पाहिलं. त्या डोळ्यांत माया होती, समज होती. एक क्षण गेला… मग तो माणूस हळूच हसला आणि म्हणाला, “घाबरू नकोस. आधी खाऊन घे. भूक लागलीच असेल… जंगलात एवढं जीव घेऊन पळत होतास. घे, खाऊन बरं वाटेल.”
त्या शब्दांत एक आश्वासन होतं की, तू इथे सुरक्षित आहेस! कुणी हानी पोहोचवणार नाही.
हे ऐकताच युवकाचा सगळा गोंधळ शांत झाला. त्याच्या तोंडावर एक हलकीशी निश्चिंती आली आणि मग त्याने पुन्हा ती वाटी उचलली. हळूहळू, पण आता आत्मविश्वासानं त्याने खाणं सुरू केलं. त्या गरम गरम पदार्थाची चव साधी होती, पण समाधान देणारी! त्यात रानातल्या ओल्या गंधाची, जंगलातल्या साधेपणाची आणि त्या व्यक्तीच्या मायेची चव होती…
जसजसे घास पोटात उतरू लागले, तसंच त्याच्या अंगातही थोडं बळ येऊ लागलं. श्वास हलका झाला, डोकं शांत झालं. त्या साध्या पण रुचकर अन्नानं त्याचं पोट खरंच भरलं. गरमपणानं थोडा घाम येत होता, पण मनातली घालमेल मात्र आता कुठे निवळली होती. त्याने वाटी बाजूला ठेवत, थोडं हसून त्या माणसाकडे पाहिलं आणि म्हणाला,
“हे खरंच छान होतं… पोट भरलं. खरंच खूप भूक लागली होती.”
त्याचं हे बोलणं ऐकताच ती व्यक्ती हलकंसं हसली. ते हसणं काहीसं विलक्षण होतं. ते हसू त्या दाट मिशा आणि वाढलेल्या दाढीत लपून जात होतं… पण डोळ्यांत मात्र स्पष्ट दिसत होतं…
ते हसू पाहून शीख युवकाचं मन पूर्णपणे शांत झालं. आतापर्यंत असलेल्या संशयाचं, भीतीचं आणि गोंधळाचं सावट आता पूर्णतः पुसून गेलं. ती व्यक्ती आता अनोळखी राहिली नव्हती… त्या माणसाकडून कोणताही धोका नाही, याची त्याला खात्री पटली होती. जंगलातला एकांत, त्या दिवसाचा थकवा आणि पोटातलं समाधान — या सगळ्यांनी मिळून त्याच्या मनातल्या वादळांना थांबवलं होतं… तो मोकळा श्वास घेत शांत बसला आणि पहिल्यांदाच, त्या व्यक्तीकडे पाहून त्याला वाटलं, “मी इथे काही काळ सुरक्षित आहे!”
क्रमश:


