नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… एक ऑडिशन आणि त्यावेळची ही आठवण!
एका हिंदी सीरियलच्या ऑडिशनसाठी मला कॉल आला. “लग्नाचा सीक्वेन्स आहे… छान साडी, ज्वेलरी, गजरे आणि मेकअप करून या…”, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांना ‘ओके’ म्हटलं आणि छान तयार होऊन ऑडिशनला गेले. ‘इनऑर्बिट मॉल’च्या (Inorbit Mall) पाठीमागे एका बिल्डिंगमध्ये त्यांचं ऑफिस होतं. ऑडिशन मस्त झाली. ऑफिसमधून बाहेर पडून खाली उतरले, तो चांगलाच अंधार झाला होता. आतासारखी तिथे डेव्हलपमेन्ट झाली नव्हती. संध्याकाळी 6-7 वाजता ऑफिसेस सुटली की, त्यानंतर रस्त्यावरील वर्दळही हळूहळू कमी होत असे. गाड्या, रिक्षा, माणसं… फारच तुरळक होती. मी खाली ऑटोची वाट पाहात होते अन् तीही छान नटून सजून! तिथल्या वॉचमन दादांना सांगितलं की, “मला रिक्षा मिळेपर्यंत कुठे जाऊन नका, इथेच उभे राहा.”
त्यांनी सुद्धा ऐकलं… पण तेवढ्यात ऑफिसमध्ये फोन खणखणला… ते दादा म्हणाले, “मॅडम तुम्ही थांबा, रिक्षा येईल. मी येतो जरा कॉल घेऊन.”
बराच वेळ झाला, पण रिक्षा येण्याचं काही नाव नव्हतं आणि मला अंधाराची भयंकर भीती वाटते. मी वेगळ्याच टेन्शनमध्ये होते. तेवढ्यात एक बाई आली आणि मला विचारती झाली, “आप actor हो ना?” ऐकून थोडं बरं वाटलं. जराशी रिलॅक्स झाली. सोबत मिळाली अन् तीही मला ओळखणारी!
हेही वाचा – गुरू अन् शिष्याची घट्ट ‘वीण’
तेवढ्यात तिनं विचारलं, “सगळ्या सासू अशाच असतात ना, नालायक आणि वाईट?” मी हसले. “काय बोलणार ना मी… लोकांचे स्वभाव असतात, त्याप्रमाणे वागतात…”
“तू पण तशीच आहेस, सुनेला छळणारी बाई!”
मी जरा गडबडलेच… ती म्हणाली, “शर्म नहीं आती, बहू को मार के आठ-दस दिन नहीं हुए और तू बनठन के घूम रही हो! बेशर्म कहीं की…”
अन् मला क्लिक झालं! ‘सावधान इंडिया’ची एक स्टोरी साधारण 8-10 दिवसांपूर्वी टेलिकास्ट झाली होती. ज्यात माझी सूनबाई आत्महत्या करते, असा सीन होता. मी ते आठवेपर्यंत समोर उभ्या असलेल्या त्या बाईने माझा गळा धरला. ती गळ्यावर प्रेशर देत होती, मी घाबरलेच होते… काही सुचत नव्हतं. ते वॉचमन दादा तर ऑफिसमध्ये जाऊन बसले होते. रस्त्यावर आम्ही दोघी सोडल्यास शुकशुकाट…
तेवढ्यात एक रिक्षा आली अन् कुठूनसा माझ्या अंगात एकदम जोर आला, मी त्या बाईला जोराने ढकलली आणि रिक्षात घुसलेच… ड्रायव्हरला म्हणाले, ‘रिक्षा भगाओ…’ मेन रोडवर येईपर्यंत मला शुद्धच नव्हती. छान वाऱ्यावर थोडी नॉर्मल झाले आणि घरचा पत्ता त्या रिक्षावाल्याला सांगितला.
हळूहळू लक्षात येत गेलं की, टीव्ही सीरियलचं स्तोमच किती वाढलंय… लोक किती इनव्हॉल्व्ह होतात! काही गोष्टी स्वत:च्या आयुष्याशी जोडून बघितल्या जातात अन् अशा काहीशा पद्धतीनं व्यक्त होतात…
हेही वाचा – दोन वेण्या अन् रीमा दिदी…