आपल्या आवडत्या पुस्तकांची यादी वयानुसार बदलत असते. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी पुस्तकं आवडत असतात. बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी मी पंधरा – सोळा वर्षाची असताना वाचली असेन… कदाचित आधीच! तेव्हापासून आजपर्यंत माझं सर्वात आवडतं पुस्तक तेच राहिलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांची पुस्तकं मात्र दर दोन-तीन वर्षांनी बदलत राहिली, पण बनगरवाडीने मला भुरळ घातली होती. वाचल्यावर लगेच मला ती आवडली होती आणि बाबांना मी तसं म्हटलंही… तेव्हा त्यांनी, ‘कादंबरीत काय वाचायचं, हा लेखक समर्थ कसा…’ हे समजावून सांगितलं आणि मग तर ती मनातून हृदयात जाऊन बसली. व्यंकटेश माडगूळकरांनी स्वत:च प्रस्तावनेत लिहून ठेवलंय की, वेलीला कलिंगड यावे, तशी ही कादंबरी उतरली आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत हे पुस्तक नीट पाहायला, वाचायला हवं. मुखपृष्ठ पाहून मनात प्रतिमा निर्माण होते. माडगूळ या लेखकाच्या गावाजवळ लेंगरवाडी नावाची वाडी होती. त्यावरून त्यांना ही कादंबरी स्फुरली.
राजाराम सौन्दणीकर नावाचा पोरगेलासा मुलगा बनगरवाडी या लहानशा साधारण पस्तीस उंबरे असलेल्या खेड्यात मास्तरची सरकारी नोकरी करायला जातो. त्याच्या घरापासून इथे पोहोचायला चालत जावे लागते… अन्य कोठलेही साधन नव्हते. कादंबरीची सुरवात तो तांबडे फुटायच्या आधी चालत वाडीला निघाला आहे… इथपासून होते. लेखक निसर्गाचे वर्णन करतो. मुरमुटीची पाने, किडे, पक्षी, कोंबड्या, झाडे, रस्ता, धूळ आणि आकाशात होणारे रंगनाट्य, त्यातून प्रवेश करणारा सूर्य… अशा वर्णनातून लेखक आपल्याला त्या वातावरणात नेतो. आपण नकळत रंग, स्पर्श, गंध, रस, ध्वनी या पाच तन्मात्रांचा अनुभव घेतो. वाडीला पोहोचेपर्यंत दुपार झालेली असते. दमलेला हा मुलगा पारावार बसतो आणि पहिलाच माणूस जो भेटतो तो त्याला, ‘तू अंडीवाला आहेस का?’ असे विचारतो. वाडीच्या विश्वाशी त्याची ओळख व्हायला इथे सुरवात होते.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
कादंबरीत अनेक पात्र आहेत. म्हातारा कारभारी, त्याची मुलगी अंजी, शेकू, शेकूची कष्टाळू बायको, बालटया, आयबू मुलाणी, आनंदा रामोशी, काकुबा, वांगीची बाई, जगन्या, रामा बनगर या पात्रांतून लेखकाने धनगरांचे विश्व उभे केले आहे. कमी पावसाचा प्रदेश असल्यामुळे पावसाचे दुर्भिक्ष्य, दारिद्र्य ही मुख्य आव्हाने. पाऊस पडल्यावर शेती होते, सुगी येते, थोडी संपन्नता येते. मेंढ्या पाळणे असतेच. मेंढी पाळणाऱ्या समाजाची जीवन पद्धती आपल्यासाठी नवी असते. कितीतरी वेळा असेही जीवन असते, असे वाटून जाते. हा पोरगेला मास्तर गावात सर्वांचे काम करत असतो. पत्रे लिहिणे, पोस्टात टाकणे, चांदीचे रुपये खुले करून आणणे वगैरे. एकदा अशीच रुपयाची मोड चोरीला गेल्याने तो संकटात सापडतो…
तो गावकऱ्यांना प्रोत्साहन देऊन तालीम बांधतो, उद्घाटनाला पंत सरकारला बोलावतो. हा या कादंबरीचा उत्कर्ष बिंदू… यानंतर दुष्काळ पडतो. अन्नपाणी मिळेनासे होते. मेंढरे मरायला लागतात. लेखक लिहितो, ‘माणसे ‘जगायला’ बाहेर जाऊ लागली…’ हे वर्णन अक्षरशः अंगावर येते. माणसाच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू राग, लोभ, मत्सर, द्वेष, ममता, मोह, वासना, कनवाळूपणा दिसत राहतात. जगात कुठेही जा, परिस्थिती कशीही असू दे माणूस एकसारखाच असतो!
हेही वाचा – थँक यू मि. ग्लाड… क्रूरकर्म्याची हतबलता
हे लहानसे खेडं पूर्ण विश्वाचे प्रतिनिधी आहे, असे वाटते. कादंबरीत आपण इतके रंगून जातो की, त्यांची सुखदु:ख आपली वाटू लागतात. स्वत:चे मरण ओळखणारा कारभारी, बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेणारी शेकूची बायको, मेंढरांच्या पिल्लांचे आई-वडील ओळखणारा काकूबा, पैसे चोरून पुन्हा परत आणून देणारा आनंदा ही सगळी पात्र आपलीशी वाटू लागतात. माडगूळकरांची अतिशय सोपी भाषा, एकही संस्कृतप्रचुर शब्द नाही, मोठमोठी वाक्य नाहीत, तत्वज्ञान सांगण्याचा आव नाही… तरीही जगण्याचा अर्थ समजून येईल, असे लेखन! त्यांची साधी भाषा मोहक आहे. शब्दांचा चपखल वापर… तगार, गहिवर या शब्दांचा वेगळा वापर… भाषा किती समृद्ध आहे, याची जाणीव करून देतात.
या कादंबरीवरचा सिनेमा पाहिला. जसे दा विंची कोड किंवा गोन विथ द विंड कादंबऱ्या वाचल्यावर सिनेमा फिका वाटला, तसेच काहीसे झाले. दिग्दर्शकाने पूर्ण प्रयत्न केले असूनही कादंबरी वाचताना आपल्या मनात ज्या प्रतिमा तयार झालेल्या असतात, त्या पात्रांशी जे भावनिक बंध झालेले असतात तसे सिनेमात दिसत नाहीत. म्हणून बनगरवाडी कादंबरी वाचायला हवी. माझ्यासाठी अजूनपर्यंत बनगरवाडीची जागा इतर कुठल्या पुस्तकाने घेतलेली नाही!


