प्रदीप केळुस्कर
भाग – 2
केशवरावांच्या मृत्यूपत्रावरून मोहन संतप्त झाल्यावर आईने पाच वर्षांपूर्वीची घटना सांगायला सुरुवात केली… केशवराव सतत विवंचनेत असत. आपल्या दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची त्यांना काळजी वाटे. या दोन मुलातील मोठा मोहन अभ्यासात हुशार. पहिल्यापासून एक-दोन नंबराने पास होत गेला. त्याचे कौतुक वाटे. आपल्या या परिस्थितीत पाचवीपासूनच त्याला कणकवलीतील एस.एम. हायस्कूलमध्ये घातले. त्याच्या वर्गात कणकवलीतील डॉक्टर्स, प्रोफेसर्सची मुले होती. सातवी स्कॉलरशीपमध्ये तो जिल्ह्यात पाचवा आला. त्याचे फोटो सर्व पेपरमध्ये छापून आले. त्याच्या शिक्षकांनी पण त्याच्या अभ्यासात लक्ष घातले. दहावीत तो जिल्ह्यात तिसरा आला. त्याची आवड म्हणून तो कॉमर्सकडे गेला. बारावीत पुन्हा चांगले मार्क्स मिळाले. त्याच्या मामाने त्याला मुंबईस नेले. तेथे तो बी.कॉम. झाला सी.ए. झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. त्याची प्रगती होतच राहिली. मामांच्या मुलीशी आशाशी त्याने लग्न केले. सासर्याने त्याला अंधेरी भागात मोठा ब्लॉक दिला.
मोहनचा एकच मुलगा त्यांच्यासारखाच हुशार, शिवाय चांगली शाळा, क्लास यामुळे तो शिकत गेला. मोहनच्या घरात सुबत्ता. मोहनने पुण्यातही घर घेतल्याचे ऐकले. हल्ली मोहन काही सांगत नाही. पण त्याच्या मित्रांकडून कळले. त्याच्या बायकोने आशाने आपल्यापासून तोडलच त्याला! दोन वर्षांतून केव्हातरी गणपतीत येतो. येतो तोही तिसर्या दिवशी… तिसर्या दिवशी येऊन गणपतीच्या पूजेला बसतो आणि दोघजण जातात कणकवलीत लॉजवर! परत पाचव्या दिवशी गणपती पोहोचवायला येतो आणि गाडीत बसून मग कणकवली आणि मग मुंबई. वर्षातून चुकून कधी फोन केला तर… तो आपल्यापासून लांबच गेला आहे.
पण धाकटा वसंता तसा हुशार होता, पण बारावीनंतर आपण त्याला पुढे पाठवलं नाही. त्यालाही तशी अभ्यासाची आवड नव्हतीच. म्हटले, आपल्या सोबत म्हातारपणी कोणीतरी हवं. तो पण प्रामाणिकपणे शेतीत, बागायतीत लक्ष घालतो. कष्टाची कामं करतो. शिवाय घरचे देव, सण वगैरे त्याच्या बायकोलाच करावे लागतात. त्याची बायकोपण गुणी. आम्हा दोघांचे ती मान खाली घालून करते. तिच्या माहेरीपण तशी गरीबीच. वसंताचा मुलगापण आहे लाघवी. आम्हाला दोघांना त्याने लळाच लावला.
गेली दहा-पंधरा वर्षे आंब्याचे पिक व्यवस्थित येत नाही, शिवाय माकडे फार वाढली आहेत. खूप नासधूस करतात. गाईच्या दुधाला आता मागणी नाही. शहरात दुधाच्या पिशव्या येतात. एकंदरीत वसंताला यापुढे घरखर्च भागविणे कठीण. आपली थोडीशी बागाईत, थोडी शेती यात जर दोन मुलांसाठी दोन भाग केले तर वसंताला काय राहणार? त्याने आयुष्यभर बागायतीत, शेतीत कष्ट केले त्याला काय मिळणार? मोठ्या मोहनने कधीच मातीत हात घातले नाहीत. आपल्या मागे आपली थोडी जमीन वसंताकडे राहील, हे पाहणे योग्य. तो जमीन विकायचा नाही, पण या शहरातल्या मुलाचा काय भरवसा? तो बायकोच्या नादाला लागून जमीन विकेल आणि शहरात बसेल. कणकवलीत जाऊन नाडकर्णी वकिलांचा सल्ला घ्यावा, असा विचार करुन केशवराव नाडकर्णी वकिलांच्या ऑफिसात गेले. वकिलांना सांगून त्यांनी मृत्युपत्र करून घेतले आणि गावातील जमीन वसंताच्या नावे केली.
सुमतीबाईंनी आपल्या नवर्याने असा का निर्णय घेतला हे सांगितले. आणि या निर्णयामागे वसंता किंवा त्याची बायको नलिनी यांचा काहीही संबंध नसून आपण त्यांना काहीच सांगितले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आशा खवळली…
हेही वाचा – मृत्यूपत्र
“काहीच सांगू नका, याला माहीत नाही, त्याला माहीत नाही. तुम्ही सर्वांनी आमच्या विरुद्ध कट रचलाय कट! हा इथे भावासमोर बसून रडतोय आणि ती आतमध्ये चहा करणारी एक नंबरची लबाड बाई आहे. तरी बरं, भिकारी म्हणून आवाज कमी नाहीतर कुणाला ऐकली नसती…” नलिनीच्या दिशेने तोंड करत आशा बडबडत होती.
“गावचे लोक तुम्ही सगळे आळशी, काम करायला नको. मग तुमचं भागणार कसं? बापाला मुलाची एवढी काळजी वाटते तर, त्याला मजुरीच्या कामाला पाठवायचं. आंब्याचे एवढे लाखो रुपये येतात, त्याचे करता काय? आम्हाला फक्त दोन पेट्या पाठवतात. बाकी सर्व तुम्ही खाता ना? मी एकेकाला सोडणार नाही. आई कसली ही तर कैकयी. रामाला विसरली!” आशाची बडबड सुरूच होती.
ही तणतण ऐकून वसंता रडू लागला आणि आतमध्ये त्याची बायको नलिनी हुंदके देऊ लागली. शंतनू आई शेजारी बसून हे सर्व ऐकत होता. सुमतीबाई मोहनला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. पण मोहन आणि आशाने आरोपावर आरोप सुरू केले. हे ऐकून कंटाळलेली बहीण यशोदा बाहेर येऊन मोहनला बोलू लागली.
‘‘तुका फक्त हक्क व्हयो, जमिनीत वाटो व्हयो पण कसले जबाबदारे उचलतस ते सांग? एवढो मोठो ऑफिसर तू आणि श्रीमंताचो जावय कधी आईक यॅक लुगडा तरी पाठवलसं? बापाशीक कधी लेंगो पाठवलंस, या भावाशीक काय व्हया नको इचारलस? आणि तुझी एकुलती एक बहीण मरे मी माझ्या लग्नानंतर कधी माका बघुक इलस? बहिणीक साडी कधी धाडलसं? नाय ना? पण ह्यो वसंता दोन-तीन महिन्यांनी बहिणीकडे येता. माझी चौकशी करता, सुट्टी पडली की माझ्या चेडवाक आजोळाक घेवन जाता. माका दरवर्षी दोन साडये घेवन येता. हेका भावस म्हणतत. तुका कसली जबाबदारी नको. फक्त प्रॉपर्टीवर नाव व्हया. ही तुझी बायल आशा सासर्याक कधी बघुक इल्ली? तू एवढो बापूस शिक तर बघुक तरी इलस? आता बापूस मेलो तर, हक्कासाठी भांडतस. बाबांनी केला ता बरा केल्यानी. ह्या वसंतान आणि नलिनीन तेंका बघल्यानी आणि म्हातार्या आईक पण तोच बघतलो.’’
तिचे हे बोलणे ऐकून मोहनराव चिडून बोलू लागला, “यशोदे, तुझा तोंड फोडीन पुढे बोल्लस तर. तू लग्न करून दिलेली मुलगी, या प्रॉपर्टीबद्दल बोलू नकोस.”
“वा रे! एक लक्षात ठेव माझोपण ह्या प्रॉपर्टीत हक्क आसा. आता प्रॉपर्टीत मुलांसारखे मुलींचोपण हक्क असतत.”
तेवढ्यात आशा नवर्याला म्हणाली – चला हो, इथे बोलण्यात काही अर्थ नाही. कायदेशीर हिसकाच दाखवला पाहिजे यांना.
आशा आत जाऊन कपड्याची बॅग घेऊन आली. वसंता रडत रडत म्हणाला – “दादा, जाऊ नको आज बाबांचा तेरावा घातला, तेंका काय वाटात? तू आणि मी उद्या तहसिलदारांकडे जाऊया. मी लिहून देतंय ह्यो माझो मोठो भावस आसा ह्या प्रॉपर्टीत हेचो पण अर्धो हक्क आसा…”
हेही वाचा – एका संपाची कहाणी
आशा कडाडली, “आम्हाला कोणाची भीक नको. आम्ही हक्काने येऊ या घरात. चला हो. आमचे मोठे मोठे वकील ओळखीचे आहेत. आता येऊ ते हक्काने येऊ…”
मोहन आणि आशा बॅग घेऊन बाहेर पडली. रस्त्यापलीकडे त्यांची गाडी उभी होती. त्यात बॅग ठेवून गाडीने निघून गेली. आत बसलेली वसंताची बायको आणि मुलगा शंतनू आता बाहेर आले.
‘‘काय ह्या? रागानं चलते झाले. सकाळी बापाचा तेराव्या आणि दुपारी भांडण करुन गेले…’’ नलिनी रडत रडत म्हणाली. यशोदा येऊन तिच्या शेजारी बसली. सासूबाई सुद्धा तिथेच खुर्चीवर बसलेली. त्यांच्याही डोळ्यात पाणी होते. वसंता स्फुंदून स्फुंदून रडत होता. यशोदा वसंताला म्हणाली, “वसंता भिया नको, ही बहीन तुझ्या पाठी आसा. आपण दोघांनी मिळून या मोहनाक आणि त्याच्या बायकोक धडो शिकवया.”
क्रमश: