Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeललितऋजू व्यक्तिमत्व

ऋजू व्यक्तिमत्व

आराधना जोशी

28 मे 1996… माझी TYBA च्या परीक्षेची तयारी सुरू होती. अवघ्या दोन दिवसांवर पहिला पेपर येऊन ठेपला होता… आणि त्याच दिवशी केंद्र सरकारवरील अविश्वास दर्शक प्रस्तावावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी संसदेत उत्तर देत होते. परीक्षेचा ताण असूनही केवळ अटलजींच्या संयमित, कणखर भाषणामुळे तो संपूर्ण दिवस अभ्यास सोडून टीव्हीसमोर बसून होते. अटलजींच्या भाषणाची जादू तेव्हा पहिल्यांदा कळली आणि त्याबरोबरच राजकारणी असेही असू शकतात, हे समजलं. त्याच काळात पत्रकार होण्याचे विचार पक्के होत गेले. वृत्तपत्रांचं वाचन अधिक गंभीरतेने सुरू झालं. राजकारण, समाजकारण आणि संबंधित विषयांबाबत काही मते बनत होती, काही पूर्वग्रह दूर होत गेले.

त्यानंतर 1998 साली वाजपेयी सरकार केंद्रात सत्तेत आलं. पोखरण येथे झालेली दुसरी अणुचाचणी (अमेरिकेला अंधारात ठेवून), पाकिस्तानसोबत संबंध सुधारावेत म्हणून पुढे केलेला मैत्रीचा हात, लाहोर बस यात्रा, कारगिल विजय, डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार बनवणे आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळातील काही उल्लेखनीय घटना.

9 जुलै 2000… ई टीव्ही मराठी सुरू झाले. त्या दिवशी सकाळी 9 वाजता पॉलिटिकल रिपोर्टर म्हणून मी मुंबई विमानतळावर होते… पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी त्या दिवशी मुंबईत येणार होते. ते कव्हर करण्यासाठी माझी ड्यूटी लागली होती. त्या दिवशी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानांना हाकेच्या अंतरावरून बघण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. एका ऋजू, कवी मनाच्या पंतप्रधानांसोबत आपण काही मिनिटं का होईना, पण संवाद साधला यावर कितीतरी वेळ विश्वासच बसत नव्हता.

ऑक्टोबर 2000मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात गुडघे बदल शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचेही कव्हरेज करण्याची संधी मला मिळाली. संपूर्ण ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलला छावणीचे स्वरूप आले होते. पण याचा फटका सामान्य रुग्णांना बसणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली होती. रोज सकाळी 11 आणि संध्याकाळी 5 वाजता वाजपेयी यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येत असे. त्यावेळी प्रमोद महाजन आवर्जून उपस्थित असतं. शेवटच्या दिवशी अटलजींनी स्वतः व्हीलचेअरवर बसून पत्रकारांशी संवाद साधला होता.

राजकारणातल्या एका सुसंस्कृत, कवी मनाच्या पण प्रसंगी कणखर भूमिका घेणाऱ्या अटलजींनी जवळून बघण्याची संधी मला माझ्या व्यवसायाने दिली. हे प्रसंग आणि अटलजींसारखी व्यक्ती विसरता येणं कठीण आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!