माधुरी साने
रोवळी ही एक पारंपरिक मराठी रेसिपी आहे. दिवाळीचा फराळ बाहेरून तयार खरेदी करण्याचा कल वाढत असला तरी, आजही अनेक घरांमध्ये दिवाळीचा फराळ तयार केला जातो. रोवळी ही देखील त्यातीलच एक गोड पदार्थ आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ही बनविली जाते. थोडाशा साहित्यातून ही स्वादिष्ट मिठाई दिवाळीचा आनंद द्विगुणीत करते. ही रोवळी चवीला खूप छान लागते.
साहित्य
- तांदळाचा जाडा रवा – एक वाटी
- खोवलेला ओला नारळ – अर्धी वाटी
- किसलेली गावठी काकडी – एक वाटी
- किसलेला गूळ – एक वाटी
- तूप – अर्धी वाटी
- वेलची पूड – एक लहान चमचा
- गरम पाणी – 2 वाट्या
एकूण कालावधी – पाऊण तास
हेही वाचा – Recipe : ढोबळी मिरचीचे पंचामृत
कृती
- मंद आचेवर एका भांड्यात तूप पातळ करून घेणे.
- नंतर त्यात तांदळाचा रवा घालून तो छान लालसर भाजून घेणे.
- त्यानंतर त्यात खोवलेला ओला नारळ आणि किसलेली काकडी घालून छान परतून घेणे.
- मग त्यात गूळ घालावा आणि शिऱ्यास घेतो त्याप्रमाणे गरम पाणी घालून छान मऊसर शिरा करून घेणे. नंतर त्यात वेलचीची पूड घालणे.
- त्याला चांगली वाफ आणावी आणि गॅस बंद करावा.
- एका पसरट भांड्यात तूप लावून त्यात हे मिश्रण गार झाल्यावर ओतावे.
- हे भांडे तव्यावर किंवा ओव्हन असल्यास त्यात केक प्रमाणे वरून आणि खालून लाल भाजून घ्यावे, त्याकरिता थोडे तूप मिश्रणावर घालावे.
- दोन्ही बाजूंनी लालसर झाल्यानंतर ते गॅसवरून किंवा ओव्हनमधून काढावे आणि गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.
हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?
टीप
- मिश्रण तूप लावलेल्या भांड्यात ओतावे किंवा आवडत असल्यास केळीच्या पानाला तूप लावून त्यात ओतावे. केळीच्या पानामुळे रोवळीला एक वेगळा स्वाद येतो.
- दिवाळीत गोमाता पूजन करत असताना अनेक ठिकाणी ही रोवळी प्रथम गाईला खायला देतात.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


