सायली कान्हेरे
श्रावण सुरू झाला की, उपासतापासही सुरू होतात. नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, मग सुरुवात होते, उपवासाचे नवनवे पदार्थ शोधायला. फराळी मिसळ हा नेहमीचाच, पण हॉटेलमध्ये मिळणारा उपवासाचा पदार्थ घेऊन आले आहे. हा पदार्थ करायला एकदम सोप्पा आहे आणि खूप स्वादिष्ट आहे.
साहित्य
साबुदाणा 1 वाटी, दाण्याचे कूट अडीच वाटी, उकडलेले बटाटे, मिरच्या 2, कोकम 5-6, साखर 4 चमचे, मीठ चवीनुसार, लाल तिखट 1 चमचा, तूप 4 चमचे, जिरं 2 चमचे, कोथिंबीर (चालत असेल तर) बारीक चिरलेली मूठभर, दाणे 1/4 वाटी, बटाट्याचा चिवडा 1 वाटी, ओलं खोबरं 1/2 वाटी.
पुरवठा संख्या – दोघांसाठी
तयारी साठी लागणारा वेळ – साबुदाणा 5 तास आधी भिजवून ठेवावा.
बटाटे, दाणे दोन्ही उकडणे, खोबरं खोवून घेणे यासाठी 15 मिनिटे.
कोकम पाण्यात 15 मिनिटे भिजवून मग त्याचा कोळ काढून घेणे.
शिजवण्याचा कालावधी – खिचडीसाठी 10 मिनिटे.
आमटीसाठी 15 मिनिटे
एकूण वेळ – 25 मिनिटे.
हेही वाचा – Recipe : भाजणीचे वडे…. मंगळागौर विशेष
साबुदाण्याची खिचडी कृती
- प्रथम कढईत 2 चमचे तूप गरम करायला ठेवा, त्यात 1 चमचा जिरं घाला. जिरं तडतडलं की मिरचीचे तुकडे घाला.
- आता त्यात भिजलेला साबुदाणा घाला, मग 1/2 वाटी दाण्याचे कूट घाला, चवीप्रमाणे मीठ, साखर घालून नीट ढवळून घ्या.
- ही खिचडी बाजूला ठेवा.
आमटीची कृती
- मिक्सरमध्ये कूट कोकमाचा कोळ, मीठ, साखर, तिखट आणि त्याचबरोबर ओलं खोबरं घाला. नंतर थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये नीट फिरवून घ्या.
- आता कढईमध्ये राहिलेले तूप घ्या, तूप गरम झालं की, त्यात जिरं घाला, जिरं तडतडलं की, त्यात मिक्सरमधील मिश्रण घाला.
- मिक्सरमध्ये अजून थोडं पाणी घेऊन ते नीट ढवळून ते पाणी सुद्धा कढईमध्ये घाला.
- ही आमटी छान उकळून घ्या.
कसे सर्व्ह कराल?
- बाऊलमध्ये थोडी खिचडी घ्या, त्यावर आमटी घाला (आमटी जास्त घालावी).
- आता त्यावर शिजवून घेतलेले दाणे आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला.
- त्यावर बटाट्याचा चिवडा घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
- आणि गरमागाराम सर्व्ह करा.
टीप
- आमटीमध्ये कोकम भिजवून घालण्याऐवजी तुम्ही कोकम सरबताचा एक्सट्रॅक्ट घालू शकता. ते घातलंत तर साखर अजिबात घालायची नाही. साधारण 3 चमचे घालावे.
- आमटीची चव कमी-अधिक गोड हवी. हवे त्या प्रमाणात तिखट घालू शकता
- बटाट्याऐवजी तुम्ही बारीक चिरलेली काकडी घालू शकता.
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.