Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकशोध काव्यप्रतिभेचा!

शोध काव्यप्रतिभेचा!

डॉ. किशोर महाबळ

शाळाशाळांमध्ये दरवर्षी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होतात. पण काव्यस्पर्धा होतात का? किती शाळांना आपल्या विद्यार्थ्यांमधील काव्यप्रतिभा शोधण्यात रूची असते? शाळांना जरी या गोष्टीचे महत्त्व वाटत नसले तरीही विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. चांगली कविता करता येणे, चांगली कविता समजणे, हे भाषिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आवश्यक असते. कविता या सर्जनशीलतेचा एक समृद्ध आविष्कार असतात. ‘जे न देखे रवि, ते देखे कवी’ असे जे म्हटले जाते तेही खरेच आहे. कवी आपल्या कवितांद्वारे वाचकाला जीवनाकडे वेगळ्या अन् व्यापक दृष्टिकोनातून बघायला शिकवतात. कविता वाचकाला संवेदनशील करते, विविध भावभावनांचे दर्शन घडविते, निसर्गातील आणि जीवनातील सौंदर्य दाखविते, कृतिशील करते, विचार देते, प्रेरणा देते, संस्कार करते. कसे जगावे हे शिकवते, जीवनातील मांगल्य शोधायला तर, कधी मांगल्य म्हणजे काय हेही शिकवते. कविता वाचकाला विविध अनुभवांच्या विश्वात नेऊन आणते. कविता छंदोबद्ध असेल तर ती गाता येते. तिला नाद, लय आणि संगीताची जोड मिळाली तर, मग ती श्रोत्याला रिझवते, प्रसन्न करते आणि अंतर्मुखही करते.

कवितेमुळे संवेदनशील व्यक्तिमत्व घडविण्यात खूप मोलाची मदत होते. कविता करण्याची प्रतिभा असलेले विद्यार्थी म्हणूनच फार फार महत्त्वाचे असतात हे विद्यार्थी सहजगत्या नेमक्या आणि कमी शब्दात त्यांच्या कल्पना, भावभावना आणि विचार कवितेच्या रूपात मांडू शकतात. सूक्ष्म निरीक्षणशक्ती संवेदनशील मन आणि विलक्षण कल्पनाशक्ती या विद्यार्थ्यामध्ये असते. त्यांना यमक साधण्यासाठी सहजगत्या शब्द सुचतात. चाल लावून गाता येईल, अशी कविता लिहिता येते. कविता करीत राहणे आवडते. त्या कोणी ऐकतील की नाही, त्या कोणाला आवडतील की नाही याची त्यांना फिकीर नसते. असे प्रतिभावंत विद्यार्थी विद्यार्थीनी प्रत्येक शाळेत असतात. पण बहुतांश ठिकाणी ते दुर्लक्षिले जातात, कारण विद्यार्थ्यांमधील काव्यप्रतिभेचा शोध घ्यायला हवा, हे भाषा शिक्षकांना तसेच शाळांना महत्त्वाचेच वाटत नाही.

ही मुले-मुली खरेतर भविष्यात चांगले कवी होऊ शकतात. त्यांच्यात भविष्यातील चांगले गीतकारही असू शकतात. योग्य प्रोत्साहन मिळाले तर, सुप्त रूपातली काव्यप्रतिभा विकसित होऊ शकते. म्हणून असे ‘बाल’ कवी शोधण्याचा प्रत्येक शाळेत आवर्जून प्रयत्न केला गेला पाहिजे. बालकवी नसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये चांगली कविता वाचण्याची, समजण्याची क्षमता विकसित करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच सुप्त रूपात असलेल्या भाषिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. आपल्याला या दृष्टिने आपल्या शाळेत काय करता येईल, याचा आपण विचार करणार आहोत.

हेही वाचा – भाषिक बुद्धिमत्तेचा शोध

एका बाजूला आपल्याला नव्या पिढीतील बहिणाबाई, इंदिरा संत, शांता शेळके, विंदा करंदीकर, सुरेश भट, मंगेश पाडगावकर यांच्यासारखी काव्यप्रतिभा असलेली मुले-मुली शोधायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला अन्य विद्यार्थ्यामध्ये कवितेची आवड निर्माण करायची आहे. यासाठी आपण एक उपक्रम हाती घ्यायला हवा. यासाठी शाळेतील प्रत्येक वर्गातील मुलीमुलांना आपण आवाहन करायचे आहे. जे विद्यार्थी, विद्यार्थिनी कविता करतात त्यांनी आपली एक कविता आपल्या वर्गशिक्षकाला द्यावी, असे आपण सुचविणार आहोत तर, अन्य विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणारी एक कविता शिक्षकांना लिहून आणून द्यायची, असे सांगणार आहोत. कविता करणारे विद्यार्थी कोणते आहेत हे आपल्याला या उपक्रमातून कळेल, त्यांचे आपण कौतुक करणार आहोत. इतर विद्यार्थ्यांना या निमित्ताने, त्यांना आवडणारी कविता लिहून देता येईल.

हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!

वर्गात भाषा शिक्षकाने रोज दोन दोन विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः केलेली किंवा त्यांना आवडलेली कविता वाचण्याची संधी दिली तर, वर्गातील सर्व मुलामुलींना असंख्य चांगल्या कविता ऐकायला मिळतील. कविता सादर करण्याची संधी मिळेल. या उपक्रमाचा भाषिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी खूप फायदा होईल. हा उपक्रमही भाषा शिक्षणात अपेक्षित असाच उपक्रम आहे आणि तोही सहजगत्या भाषेच्या वर्गात राबविता येईल, असा आहे. आपल्या शाळेत सर्व वर्गातील कविता करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरेल. नव्या पिढीतील कवयित्री आणि कवींची आपण यातून दखल घेऊ शकू. चांगल्या कवितांचे वाचन करणाऱ्या नव्या पिढीतील रसिकांचीही आपण दखल घेऊ शकू.

(‘सर्वांसाठी सर्वोत्तम शिक्षण!’ पुस्तकातून साभार)
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!