डॉ. किशोर महाबळ
सर्व शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलीला आणि मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची दखल घेऊन त्याला ती गुणवत्ता विकसित करण्याची पूर्ण संधी आणि प्रोत्साहन मिळालेच पाहिजे. विज्ञान आणि गणितात उत्तम गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच भाषा, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल असे अन्य विषय तसेच चित्रकला, गायन, वादन, नृत्य अशा कलांमध्ये गती असलेल्या विद्यार्थ्यांनाही सारखेच महत्त्व दिले गेले पाहिजे. कोणीही विद्यार्थी प्रोत्साहनापासून वंचित राहायला नको, याचे आपण महत्त्व समजून घेत आहोत. आपल्या शाळेत आपण यासाठी काय करू शकतो, याचा विचार करूयात!
दरवर्षी सर्व शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा घेतली जाते. त्यानंतर सहसा स्पर्धकांच्या चित्रांतील पारितोषिक प्राप्त चित्रेच विशेष प्रदर्शनात लावली जातात. बाकी सर्व चित्रे एकतर स्पर्धक मुलामुलींना परत केली जातात, नाहीतर शाळेत कुठेतरी गठ्ठ्यात ठेऊन दिली जातात. यामुळे स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेणाऱ्या, पण पारितोषिक मिळविण्यात अपयशी ठरलेल्या असंख्य विद्यार्थ्यांना आपले चित्रे प्रदर्शनात लावण्यासारखे नव्हते, हा निराशा करणारा अनुभव येतो! हा अनुभव दरवर्षी आपल्या देशातील शेकडो शाळांतील लक्षावधी विद्यार्थी घेत असतात. शाळांना असे करण्यात काहीही चुकीचे वाटत नाही.
कोणातरी परीक्षकाने किंवा शिक्षकाने आपल्या चित्रकलेच्या आकलनानुसार चित्रांची पारितोषिकांसाठी निवड केलेली असते, आणि ती शाळांनी अंतिम मानलेली असते. त्यात काही चूक नाही; पण ज्यांचे चित्र पारितोषिक प्राप्त ठरलेले नसते, त्या चित्रांची उपेक्षा होणे हेही योग्य नाही आणि याबद्दल शाळांतील पदाधिकाऱ्यांना किंवा शिक्षकांना कधीच खेद होत नाही. याचे कारण शाळांना आपल्या शाळेतील प्रतिभावान तसेच सुप्त प्रतिभा असलेले चित्रकार शोधण्यात काही रूची नसते. कारण उत्तम चित्रकार घडविणे हेही महत्त्वाचे आहे, हे कधी सांगितलेच जात नाही!
हेही वाचा – शिक्षकांची बौद्धिक क्षमता
चित्रकला ही एक महत्त्वाची कला आहे आणि ती कला येणाऱ्या किंवा ती कला शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, हे शाळांना अजूनही लक्षातच येत नाही. याशिवाय एका विशिष्ट स्तरापर्यंत चित्रकलेचे उत्तम शिक्षण घेण्यास सर्वच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, याचेही भान आपल्या शिक्षणव्यवस्थेत नाही. विज्ञानाच्या शिक्षणातही चित्रकलेच्या काही मूलभूत नियमांचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे असते, हेही लक्षात घेतले जात नाही. जेवढे महत्त्व विज्ञानविषयक प्रदर्शनाला दिले जाते तेवढेही महत्त्व चित्रकला प्रदर्शनाला देण्यात शाळांनाच मुळात रूची नसते! विद्यार्थ्यांनी काढलेली विज्ञानविषयक हवी तेवढी भित्तीचित्रे आणि मॉडेल्स ठेवायला प्रदर्शनात जागा दिली जाते, पण चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व चित्रांच्या प्रदर्शनासाठी मात्र शाळेत जागा नसते! कारण या चित्रकारांना आपण काहीही महत्त्व देत नाही आणि त्या सर्वांवर आपण अन्याय करतो!
खरेतर, प्रत्येक विद्यार्थ्याचे चित्र ही त्याची अभिव्यक्ति असते. त्याला एखादी घटना, विषय, दृश्य कसे भावले, जाणवले, वाटले हे आपल्या कल्पनाशक्तिनुसार तो आपल्या चित्रातून रेखाटतो, रंगवतो. याशिवाय, हे सगळे कसे असायला हवे, हेही तो आपल्या चित्रातून मांडत असतो. प्रत्येकाचे असे बघणे, समजणे, जाणणे हे वेगवेगळेच असणार! त्याला जसे दिसते किंवा असावेसे वाटते त्यानुसार तो चित्र काढतो, रंग निवडतो, चित्रात कुठे काय काय दाखवायचे, हे ठरवितो. प्रत्येक बालकाला चित्र काढायला आवडते. त्यातून त्यांची व्यक्त होणारी कल्पनाशक्ती अनेकदा थक्क करणारी असते. ही सर्व चित्रे आपापल्यापरीने उत्तमच असतात.
चित्रांतून विद्यार्थ्याच्या जीवनात काय घडते आहे, हेही व्यक्त होते, असे अनेक तज्ज्ञ चित्रकारांचे मत आहे. सर्व चित्रकारांमध्ये काही चित्रकार हे विलक्षण प्रतिभावान असतात, हे आपण मान्य करूच. पण याचा अर्थ इतरांची चित्रेही महत्त्वाची नसतात, असे का मानायचे? काही विद्यार्थी चित्रकारांची कल्पनाशक्ती, कलेबद्दलची जाण कदाचित एवढी समृद्ध नसेल पण ती सुप्तरूपात असण्याची शक्यता लक्षात घेऊन खरेतर सर्वच बालकांच्या चित्रांचे कौतुक झाले पाहिजे.
हेही वाचा – भाषिक बुद्धिमत्तेचा शोध
ज्या बालचित्रकारांची चित्रे तत्कालीन परीक्षकांनी निम्न दर्जाची ठरविली होती, असे चित्रकार आयुष्यात एक नामवंत चित्रकार म्हणून यशस्वी झाले, याची असंख्य उदाहरणे जगाच्या इतिहासात आहेत. असे असूनही आपल्या शाळा सर्व मुलामुलींच्या चित्रांचे कौतुक करण्याऐवजी फक्त पारितोषिकप्राप्त मुलामुलींच्याच चित्रांचे कौतुक करतात आणि तीच चित्रे प्रदर्शनात लावतात. शाळेतील सर्व मुलामुलींची चित्रे लावणे अशक्य आहे, असे शिक्षक म्हणतात. हे काही पूर्णत: खरे नसते. शाळांनी जर थोडा प्रयत्न केला तर, सर्व विद्यार्थ्यांची चित्रे लावणे सहज शक्य आहे. शाळेतील सभागृहात, वऱ्हांड्यात, पावसाचे दिवस सोडून शाळेच्या मैदानात सहजगत्या एखाद्या दोरीला असंख्य चित्रे लावता येऊ शकतात. समजा जागा कमी असेल तर रोज एका वर्गातील सर्व मुलामुलींची चित्रे लावता येऊ शकतात. चित्रांचे प्रदर्शन फक्त स्नेहसंमेलनाच्या वेळेसच का आयोजित करायचे? ते दर महिन्यात का आयोजिले जाऊ नये? शाळेने चित्रकला महत्त्वाची मानली आणि विद्यार्थ्यांची अगदी थोडी मदत घेतली तर असे प्रदर्शन लावणे, ही अत्यंत सोपी गोष्ट होऊ शकते. मात्र या उपक्रमाची गुणवत्ता समजण्याची योग्यता आणि असे नवे काही करण्याचे महत्त्व कळण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.


