डॉ. किशोर महाबळ
अनेकदा शाळांमधील चित्रकलेचे शिक्षण हे निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे एवढ्यापुरतेच मर्यादित असते. त्यामुळे या प्रकारच्या चित्रकलेला प्रोत्साहन दिले की, पुरे एवढाच विचार होतो. खरेतर, चित्रकलेचे क्षेत्र खूपच व्यापक असते. वैज्ञानिक विषयांची माहिती देणारे चित्रमय तक्ते; वृक्ष, पशु-पक्ष्यांची माहिती देणारे तक्ते; भूगोलाचे नकाशे; ऐतिहासिक इमारतींची चित्रे अशी अनेक प्रकारची रेखाटने ही सुद्धा चित्रकलेचाच एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो. विविध आकाराच्या भूमितीच्या आकृत्या काढणे; वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा विविध विज्ञानविषयांशी संबंधित आकृत्या काढणे ही गोष्ट त्या विषयाच्या उत्तम अभ्यासासाठी अत्यावश्यकच असते. अशा आकृत्या अचूकरित्या काढणे हे सोपे काम नाही. या आकृत्या काढण्यासाठी खूप वेळ, एकाग्रता, अचूकता आणि ज्ञान आवश्यक असते. इयत्ता दहावीपर्यंत विज्ञान आणि भूगोल हे विषय हे सर्व विद्यार्थ्यांनी शिकणे हा अभ्यासक्रमाचा भाग असतोच. या सर्व गोष्टी लक्षात घेता चित्रकलेचे मूलभूत नियम आणि त्यानुसार रेखाटन सर्व विद्यार्थ्यांना उत्तमरित्या शिकविले गेलेच पाहिजे.
पेन्सिलचा नीट उपयोग करणे, अचूक लांबी रूंदीच्या विविध आकारातील रेषा काढणे त्या अचूक ठिकाणी एकमेकांना जोडणे, वर्तुळ, त्रिकोन, पंचकोन, षटकोन अशा विविध आकृत्या काढण्यासाठी आवश्यक त्या कोनातून अचूक रेषा काढून त्यातून प्रमाणबद्ध आकृती काढणे हे भूमिती, भौतिकशास्त्र, भूगोल यासारख्या विषयांत अत्यंत महत्त्वाचे तसेच कौशल्याचे मानले जाते. तर, जीवशास्त्रात मनुष्य आणि प्राणी यांच्या विविध अवयवांचे अत्यंत अचूकतेने रेखाटन करता येणे ही या विषयाच्या शिक्षणातील प्रथम पायरी असते. विज्ञानाच्या अन्य विषयांत हे रेखाटन वेगवेगळ्या प्रकारचे असते आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला येणे अत्यावश्यक मानले जाते.
हेही वाचा – शाळांमधील चित्रकारांचा शोध
शिक्षणातील या विशिष्ट प्रकारच्या चित्रकलेचे हे महत्त्व म्हणूनच गंभीरपणे लक्षात घेऊन या प्रकारच्या चित्रकलेचे एक विशिष्ट दर्जापर्यंतचे शिक्षण प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला व्यवस्थितपणे दिले गेलेच पाहिजे. हे कौशल्य शिकण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यात एकाग्रता, चिकाटी, सातत्य, नेमकेपणा, व्यवस्थितपणा हे गुण विकसित होऊ शकतात. या आकृत्या काढण्यासाठी लागणाऱ्या स्केल, कोनमापक यासारख्या उपकरणांचा योग्य आणि नीट उपयोग करणे हेही विद्यार्थ्यांना शिकता येइल. एखाद्या विद्यार्थ्याला निसर्गचित्र किंवा व्यक्तिचित्र नीट काढता येणार नाही, पण त्याला भूमितीच्या आकृत्या किंवा वैज्ञानिक तक्ते उत्तमरित्या काढता येऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांच्या या क्षमतेची दखल घेण्याची नितांत गरज आहे. या प्रकारची चित्रकला ही वास्तुशास्त्र आणि वैज्ञानिक विषयांच्या अभ्यासासाठी उपयुक्त असते. हे लक्षात घेऊन आपल्याला काय करता येईल, याचा विचार करायचा आहे.
आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वर नोंदविलेल्या प्रकारच्या आकृत्या उत्तमरित्या काढण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन द्यायचे आहे. भूगोलासारखा अत्यंत महत्त्वाचा विषय अनेकदा दुर्लक्षिला जातो, म्हणून भूगोलातील आकृत्यांबद्दलचा उपक्रम घेण्यापासून सुरुवात करूया. प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भूगोलाच्या पुस्तकातील ठराविक नकाशा काढण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे. हे सर्व नकाशे बघून शिक्षकाने त्यातील उत्तम नकाशा कोणता आणि का हे स्पष्ट करावे. त्यानंतर हे उत्तम नकाशे तसेच अन्य विद्यार्थ्यांनी काढलेले नकाशे वर्गातील अन्य सर्व विद्यार्थ्यांना बघायला मिळावे, यासाठी वर्गाच्या स्तरावरच ते प्रदर्शनाच्या रूपात ठेवता येतील का, याचा प्रयत्न करावा. हे शक्य नसेल तर सर्व नकाशे विद्यार्थ्यांमध्ये वर्गातच फिरविता येतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला इतरांचे नकाशे बघता येतील. शिवाय, आपण काढलेल्या नकाशात काय चुकले, एक विशिष्ट नकाशा उत्तम का ठरला याबाबत विचार करण्याची संधी मिळेल.
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या उत्तम नकाशांचे प्रदर्शन शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना बघायला मिळावे यासाठी मोठे प्रदर्शन शाळेत लावण्याची व्यवस्था केली पाहिजे. अत्यंत मेहनतीने उत्तम नकाशे काढणाऱ्या विद्यार्थ्यांचे या माध्यमातून आपण कौतुक करू शकू; शिवाय, अचूक नकाशे काढण्याचे महत्त्वही यातून विद्यार्थ्यांना आपण पटवून शकू. शैक्षणिक वर्षात स्नेहसंमेलनाचा काळ वगळता असे प्रदर्शन आयोजित करायला हवे. उत्तम नकाशे काढता येणे, हे सुद्धा उत्तम गुणवत्तेचे एक लक्षण आहे, हे आपल्याला विद्यार्थ्यांना पटवून देता येईल.
हेही वाचा – शोध शाळेतील वक्त्यांचा!
याच पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांना भूमितीच्या आकृत्या काढण्यास प्रोत्साहन द्यायचे आहे. अचूक असलेल्या विद्यार्थ्यांच्या आकृत्यांचेही असेच प्रदर्शन शाळेत आयोजिले जावे. यामुळे शास्त्रीय स्वरूपाच्या आकृत्या कशा काढायच्या, उत्तम आकृत्या कोणत्या असतात आणि या आकृत्या अचूक काढण्याचे महत्त्व आपल्याला विद्यार्थ्यांना पटवून देता येईल. यामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रकारच्या चित्रकलेचे महत्त्व कळेल आणि आपल्याला भविष्यात वास्तुशास्त्रज्ञ, वैज्ञानिक होण्यासाठी आवश्यक गुणवत्ता असलेले विद्यार्थी ही शोधता येतील.


