रश्मी परांजपे
मागील लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेच्या जबाबदाऱ्यांबाबत प्राथमिक माहिती घेतली. या आणि पुढील काही लेखांत आपण शाळेच्या जबाबदाऱ्या टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. शाळेच्या जबाबदाऱ्या म्हणजे पर्यायाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सेविका यांच्या जबाबदाऱ्या होत. विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामध्ये या जबाबदाऱ्या जाणून घेताना आपण शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नियोजित उपक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षा अशा अनेक बाबींचा विचार करणार आहोत.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश. आता आपण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी या मुद्द्यापासून सुरुवात करूयात.
शालेय वर्ष जूनमधे सुरू होते आणि प्रवेश प्रक्रिया साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. मुख्याध्यापिकेला प्रवेशाबाबतचे नियोजन एक महिना अगोदर सुरू करावे लागते. यातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
हेही वाचा – विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी
- नवीन प्रवेश देताना प्रवेश फी, वर्ग फी, सत्र फी तसेच विविध उपक्रम फी तसेच फी भरण्यासाठी विशिष्ट कालावधी या सर्व बाबी मुख्याध्यापिकेला शालेय समितीत ठरावांद्वारे मंजूर करून घ्याव्या लागतात.
- प्रवेश अर्जातील तपशील तसेच पालकांची लागणारी माहिती लक्षात घेऊन अर्जाचा मसुदा आणि अर्ज छपाई संख्या या बाबी देखील मुख्याध्यापिकेला शालेय समितीकडून मंजूर करून घ्यावा लागतात.
- प्रवेशाची पूर्वतयारी झाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची तारीख तसेच पालकांनी प्रवेशासाठी भेटण्याची वेळ निश्चित करून याबाबत सूचना शाळेच्या बाह्य-फलकावर मोठ्या अक्षरात लिहावी. सूचना सुवाच्च अक्षरात तसेच व्याकरणदृष्ट्या अचूक असावी. सूचना पुसली जाणार नाही, याची काळजी घेतानाच, पण तसे झाल्यास सूचना परत लिहिण्याची जबाबदारी एखाद्या शिक्षकेवर सोपवावी.
- शालेय प्रवेशाबाबतची सूचना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी मुख्याध्यापिकेने जाहिरात करण्याच्या विविध मार्गांचा यथायोग्य विचार करून अवलंब करावा.
- पालकांनी प्रवेशासाठी पाल्याला सोबत आणणे अनिवार्य करावे.
- प्रवेशासाठी पाल्याचा जन्मदाखला अत्यावश्यक असल्याने पालकांना जन्मदाखला आणण्यास आवर्जून सांगावे. जन्मतारखेवरून मुलाचा वर्ग – खेळगट / शिशुगट / बालगट – ठरवता येतो.
- प्रवेशासाठी एकदम जास्त पालक आल्यास त्यांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी.
- पालकांना प्रवेशाबाबत आवश्यक माहिती दिल्यावर पालकांकडून प्रवेश अर्ज भरून घेणे, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे तसेच फी भरणे या प्रक्रिया पूर्ण करण्यात येतात.
- शाळेने प्रवेश अर्ज तसेच सादर केलेल्या कागदपत्रांची नोंद करून पालकांना पोचपावती देणे तसेच फीची पावती देणे आवश्यक आहे. हे सर्व झाल्यावर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होते.
- प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात माहितीपत्रक घेण्यासाठी बोलवावे.
याबाबतचे अन्य मुद्दे आपण पुढील लेखात जाणून घेऊयात.
क्रमश:
हेही वाचा – शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाईल – 9881943593
फार छान तपशील वार माहिती सांगोपांग विचार करून मुख्याध्यापिका दायित्व याचे सुंदर विवेचन