यशःश्री जोशी
साहित्य
- बाजरी – 1 वाटी
- तांदूळ – अर्धी वाटी
- पिवळी मूगडाळ – अर्धी वाटी
- मीठ – चवीनुसार
- जिरं – अर्धा टीस्पून
- मोहरी – अर्धा टीस्पून
- किसलेलं सुकं खोबरं – 3 टेबलस्पून
- हळद – पाऊण टीस्पून
- टोमॅटो – 1 मोठा
- फ्लॉवरचे तुरे – अर्धा वाटी
- गाजर – अर्धी वाटी
- मटार – अर्धी वाटी
- बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
- कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या बारीक चिरून – एक टेबलस्पून
- गोडा मसाला – पाऊण टेबलस्पून
- तेल – 2 टेबलस्पून
पुरवठा संख्या – 3 ते 4 व्यक्तींसाठी
तयारीसाठी लागणार वेळ
- डाळ, तांदूळ भिजवायला – 1 तास
- बाजरी भिजवायला – 6 ते 8 तास
- बाजरी वाळवून त्याचा भरडा काढायला – 3 तास
- पाककृती करण्यासाठी – अर्धा तास
कृती
- प्रथम बाजरी स्वच्छ धुवून 6 ते 8 तास भिजवून ठेवा.
- 6 ते 8 तासांनी सगळे पाणी निथळून जाईल अशी उपसून थोड्यावेळाने एखाद्या सुती कापडावर वाळविण्यासाठी पसरवून ठेवा.
- बाजरी वाळली की, मिक्सरवर पल्स मोडवर थोडा थोडावेळ फिरवून घ्या की बाजरीचा भरडा तयार होईल.
- दुसरीकडे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे तासाभरासाठी भिजवून ठेवा.
- तासाभराने भिजवलेली डाळ आणि तांदूळ उपसून त्यातले पाणी निथळायला ठेवा.
- आता सगळ्या भाज्या निवडून, धुवून, चिरून घ्या.
- मिक्सरच्या छोट्या भांड्यात जिरं, कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या आणि सुकं खोबरं हे सगळं पाणी न घालता वाटून घ्या.
- आता कुकरमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, त्यात हळद, चिरलेला टोमॅटो घाला.
- टोमॅटो थोडा मऊ झाला की, मग त्यात गाजराचे तुकडे, मटार आणि फ्लॉवरचे तुरे घालून छान मिक्स करून घ्या.
- मग त्यात धुवून, निथळून घेतलेली डाळ, तांदूळ आणि शेवटी बाजरीचा भरडा घालून सगळं छान ढवळून घ्या. मग त्यात डाळ, तांदूळ आणि बाजरी यांच्या एकूण प्रमाणाच्या अडीच पट गरम पाणी घाला.
- पाणी घालून झाले की, मग तिखट, गोडा मसाला, मिक्सरमधून फिरवून घेतलेलं जिरं खोबऱ्याचं वाटण, थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ घालून परत एकदा मिक्स करा.
- मग कुकरचे झाकण लावून मोठ्या गॅसवर एक शिट्टी करून मग गॅस बारीक करून साधारणपणे 10 मिनिटे ठेवावा. नंतर पुन्हा गॅस मोठा करून एक शिट्टी करावी. बाजरी शिजायला तुलनेत थोडा जास्त वेळ लागतो.
- वाफ जिरली की, कुकरचे झाकण उघडून खिचडी व्यवस्थित झाली आहे का, बघावे.
- मग वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तूप घालून खायला घ्यावी. सोबत पापड आणि लोणचं असेल तर भोगीचा परफेक्ट मेन्यू तयार झाला.
टिप्स
- बाजरीची खिचडी करताना बाजरी किमान 6 तास भिजवून ठेवणे आवश्यक आहे.
- या खिचडीवर लसणाची फोडणी खूप छान लागते. आवडत असेल तर 20-25 लसूण पाकळ्या सोलून ठेचून घ्या. एका छोट्या कढईत जरा जास्त तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की लगेच त्यात लसूण पाकळ्या घाला. त्या थोड्या लालसर झाल्या की, गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट घालावे. साजूक तुपाऐवजी ही फोडणी बाजरीच्या खिचडीवर घालावी.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


