पराग गोडबोले
साठे बाई अगदी खुशीत होत्या. एकट्याच निघाल्या होत्या चारधाम यात्रेला, एका प्रसिद्ध प्रवास कंपनीसोबत… तब्बल दहा दिवसांचा प्रवास, तो ही ‘एकटा जीव सदाशिव’ प्रकारचा! नवरा आणि लेक यांच्याशिवाय, ‘एकला चालो रे’ असा मुक्त संचार, देवभूमीचा!!
त्या दोघांनाही विनवण्या करकरून थकल्यावर, छानशी सरकारी नोकरी करणाऱ्या बाईंनी ठरवलं, आता पुरे झालं, आपला मार्ग आपणच चोखाळायचा. लगोलग, चौकशी करायला एका प्रसिद्ध यात्रा कंपनीत गेल्या आणि एकाच बैठकीत प्रवासाच्या तारखा ठरवून, अर्धे पैसे भरूनही आल्या! स्वतंत्र खोलीचे जास्त पैसे होते, पण कुठे अनोळखी बाईसोबत तिची तंत्र सांभाळत एकत्र राहाणार? असा विचार करून स्वतंत्र खोलीच घेतली त्यांनी, ‘होऊ दे’ खर्च म्हणत…
दुसऱ्याच दिवशी रजेचा अर्ज टाकून, रजा मंजूरही करून घेतली आणि घरी आल्यावर, जेवताना घोषणा करून टाकली. मुलगा, त्यातूनही नवऱ्याला हा आश्चर्याचा धक्काच होता! नोकरी करत असूनही, प्रत्येक छोट्यामोठ्या निर्णयात आपला सल्ला घेणारी आणि आपल्या आज्ञेबाहेर नसणारी, आपली सुविद्य पत्नी एवढं मोठं धाडस करू शकेल… याचा विचार पण त्याच्या मनात आला नव्हता. ‘आ’ वासून बघतच राहिला तो तिच्याकडे!
“एकटी जाऊ शकशील तू? घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर, एवढाच प्रवास एकटीने करण्याची सवय आहे तुला, झापड लावलेल्या घोड्याप्रमाणे. हे असलं धाडस झेपणार आहे का तुला? नको जाऊ तू एकटी, बुकिंग रद्द कर, आपण सगळे जाऊ नंतर…” त्याचा सल्ला.
“आमच्या जेवणाखाण्याची काय सोय? रोज बाहेर जेवायचंय का आम्ही? उगीचच आपलं नवं थेर काहीतरी…” पायात पाय घालायचा आणखी एक प्रयत्न… भावनिक आवाहन.
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
शांतपणे हे सर्व ऐकून घेऊन बाई म्हणाल्या, “तुम्हाला विनवण्या करून दाताच्या कण्या झाल्या माझ्या. शेवटचा पर्याय म्हणून हा मार्ग निवडलाय मी आणि आता मी जाणार म्हणजे जाणार. ही काळ्या दगडावरची रेघ!”
“तुमच्या जेवणाखाण्याची सोय करूनच जाणार आहे मी, काळजी नसावी. एका काकूंना सांगितलाय डबा द्यायला संध्याकाळी. सकाळी ऑफिसमध्ये बघा सोय. कुक्कुली बाळं आहात का आता?” असं परखडपणे सुनावलं.
नव्या पिढीचा लेक म्हणाला, “आई मला मान्य आहे तुझा निर्णय. आमची नको काळजी करूस तू. मस्त फिरून ये!”
हे बंड बाईंनी काही सुखासुखी केलेलं नव्हतं, बरेच दिवस मन मारून जगल्यावर, उफाळून आलेला उद्वेग होता तो… बाई कमालीच्या रसिक, नाटक-सिनेमाच्या शौकीन, गाण्याच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती हवीच. वाचनाची त्यांना कमालीची आवड. एकंदरीत कलासक्त व्यक्तिमत्व! नवरा अगदी बरोब्बर विरुद्ध, कमालीचा अरसिक… आपलं काम आणि घर हाच त्याचा परिघ… ‘घरकोंबडा’ म्हणायच्या त्या नवऱ्याला.
लग्नानंतर सुरुवातीला, गाड्याबरोबर नाळयाची यात्रा या न्यायाने तो बळेबळे सोबत करायचा. एकदा नाटकात तिसऱ्या-चौथ्या रांगेत बसून, मान मागे टाकून झोपलेल्या नवऱ्याला मिळालेल्या कोपरखळ्या ऐकून, त्यांनी कानाला खडा लावला… ‘नाटक नको, पण नवरा आवर’ अशी परिस्थिति झाली होती त्यांची…
मग नंतर ही मैत्रीण शोध, तिला लग्गा लाव… असं करत त्या सोबत मिळवायच्या आणि आपली हौस पूर्ण करून घ्यायच्या. हळूहळू तेही कठीण व्हायला लागलं आणि मग त्या एकट्याच जायला लागल्या नाटकाला आणि सिनेमाला, शक्यतो गावातच. एकटी आलेली बाई म्हणजे थोडा धाडसाचा मामला होता तेव्हा… पण वक्र नजरांना छेद देत त्या पुरून उरल्या सगळ्यांना! कधीकधी लहर आली की, त्या बिनधास्त एकट्याच हॉटेलमध्ये जाऊन खाऊनही यायच्या… झाला सुरवातीला त्रास, पण आता टपरीवर उभं राहून ‘कटींग चाय’ पिणं आणि पाणीपुरीच्या गाडीवर उभं राहून पाणीपुरी हाणणं, या त्यांच्यासाठी किरकोळ गोष्टी झाल्या होत्या.
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
पण हे सगळं म्हणजे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत अशी बात होती. कुंपण ओलांडून, सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून, एकटीनं पर्यटन करायचं धाडस त्यांनी कधी केलं नव्हतं. ती वेळ आता आली होती, बऱ्याच विचारांती… कुंपणा पलीकडचं जग आता त्यांना खुणावत होतं आणि ही चौकट लांघून, नव्या आव्हानाचा वेध घ्यायला त्या आता सरसावल्या होत्या.
आपण दहा दिवस नसणार, कसं होईल त्या दोघांचं? या विचाराने बाई थोड्या कासावीस व्हायच्या खऱ्या… आपला निर्णय चूक का, बरोबर अशी द्विधा मनस्थिति व्हायची… चारधाम यात्रेचा खडतर प्रवास झेपेल का आपल्याला, या शंकेनं कधीकधी अस्वस्थ व्हायच्या त्या, पण आता निर्णय घेतलाय तो तडीस न्यायचाच या निर्धाराने पुन्हा स्वतःलाच आश्वस्त करायच्या… ही घालमेल, अगदी जायच्या दिवसापर्यंत सुरू होती त्यांची! पण ते विचार झटकून नव्या दुनियेची मुशाफिरी करायला त्या सज्ज झाल्या होत्या…
शेवटी जायचा दिवस उजाडला, सकाळी लवकरचं विमान होतं दिल्लीचं. पहाटे साडेतीनला घर सोडायला हवं होतं आणि तीच चिंता त्यांना सतावत होती. कितीही आव आणला तरी, घर ते विमानतळ हा प्रवास त्या वेळेला, एकटीला कठीण होता. त्यांची घालमेल बघून मग नवरा स्वतःहूनच म्हणाला, “मी येईन तुला सोडायला विमानतळावर. आहे तुझी काळजी मला… तू समजतेस तेवढा काही मी अलिप्त नाहीये तुझ्याबाबतीत.”
प्रश्न न विचारताच त्यांना उत्तर मिळालं होतं आणि त्यांना विमानतळावर सोडल्यावर, त्या आत जाईपर्यंत हात हलवणाऱ्या आणि नंतर security check पूर्ण होईपर्यंत बाहेर खोळंबून असणाऱ्या नवऱ्याचं, एक नवं पण आश्वस्त करणारं रूपही त्यांना यानिमित्ताने पाहायला मिळालं.
देवभूमीच्या यात्रेची त्यांच्या मते ती सुखद सुरुवात होती. देवाचा आशीर्वादच जणू!