Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeललितनिरोप समारंभ… फक्त खुर्चीलाच मान!

निरोप समारंभ… फक्त खुर्चीलाच मान!

दीपक तांबोळी

भाग – 1

“फक्त सात दिवस….”

समोरच्या कॅलेंडरकडे पहात मकरंद पुटपुटला. आजकाल असेच तो दिवस मोजत होता. याची सुरुवात खरंतर मागच्या वर्षीच झाली होती. पण त्यावेळी तो महिने मोजत होता. आता मात्र एप्रिल सुरू झाल्यापासून त्याने दिवस मोजायला सुरुवात केली होती. साहजिकच होतं… बरोबर सात दिवसांनी म्हणजे 30 एप्रिलला तो रिटायर होणार होता. मागच्या डिसेंबरमध्ये त्याचा एक सहकारी रिटायर झाला, तेव्हा एक मोठा निरोप समारंभ झाला होता. हारतुरे, गिफ्ट्स, खाणंपिणं, ती स्तुतीपर भाषणं यांची नुसती रेलचेल होती. खरंतर, त्याचा सहकारी रागीट आणि तुसड्या स्वभावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये थोडासाही प्रिय नव्हता. पण निरोप समारंभाची जनरीत पाळणं महत्त्वाचं होतं. शिवाय मोठ्या साहेबांची ऑर्डर! त्यामुळे इच्छा नसली तरी निरोप समारंभाचा कार्यक्रम करणं आवश्यक झालं.

मकरंद तर त्याच्याच नाही तर, इतरही डिपार्टमेंटमध्ये लोकप्रिय होता. त्यामुळे आपला निरोप समारंभ यापेक्षाही दणकेबाज होणार अशी त्याला खात्री होती. 30 एप्रिलच्या आधी सर्व कर्मचारी, सहकारी, अधिकारीवर्गाला तो एका चांगल्या हॉटेलात तो जंगी पार्टी देणार होता. त्याने हॉटेलही पाहून ठेवलं होतं. विश्वासातल्या काही लोकांशी चर्चाही करून ठेवली होती. या कार्यक्रमासाठी नागपूरहून आपल्या कुटुंबीयांना बोलावून तो त्यांची सगळ्यांशी ओळख करुन देणार होता.

निरोप समारंभाच्या सत्काराला उत्तर देताना आपण काय भाषण द्यायचं, याचीही त्याने मनातल्यामनात कित्येकदा उजळणी केली होती. किती किती स्वप्नं बघितली होती. पण मार्चमध्ये कोरोना भारतात दाखल झाला. भारतात तो फारसा संक्रमित होणार नाही, असं वाटत असतानाच त्याने वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली. मग लॉकडाऊन जाहीर झालं. संचारबंदीचे नियम कडक झाले. सगळ्या कार्यक्रमांवर बंदी आली. सोशल डिस्टन्सिंग आलं. पाचपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली. पहिला लॉकडाऊन संपून सगळे व्यवहार सुरळीत होतील, मग आपल्या कार्यक्रमाला अडचण येणार नाही, अशी आशा त्याला वाटू लागली. पण हाय रे दैवा! कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच गेली. हा हा म्हणता कोरोना सगळ्या देशात पसरला. सोलापूरही त्याला अपवाद ठरलं नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, आता आपला निरोप समारंभ होणं शक्य नाही.

काय विडंबना होती बघा… भ्रष्ट, काम न करणाऱ्या, हाताखालच्या कर्मचाऱ्यांचा छळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचे सेंड ऑफचे कार्यक्रम झोकात पार पडले होते आणि याच्यासारखा प्रामाणिक, कष्टाळू, लोकप्रिय अधिकारी निरोप समारंभाविनाच निवृत्त होणार होता. खूप मोठी रुखरुख त्याच्या मनाला लागून राहिली होती. पण इलाज नव्हता.

हेही वाचा – सुरेखाच्या दुसर्‍या लग्नाची गोष्ट!

0000

“सर, आत येऊ?”

त्याची तंद्री भंगली. त्याने दाराकडे पाहिलं. ऑफिस सुपरिटेंडंट देवळे आत येण्याची परवानगी मागत होते

“या… या, देवळे”

देवळे टेबलपाशी आले. एक फाइल त्याच्या पुढ्यात ठेवून म्हणाले, “साहेब, सही हवी होती…”

“काय आहे हे?”

“आपला ठेकेदार पोपटाणीने काम पूर्ण केलं. त्याच्या बिलांवर सही हवी होती.”

त्याने डोळ्यांवर चष्मा चढवला. टेबलवरचं पेन उचलून समोरच्या कागदपत्रांवर क्षणभर नजर टाकली. सही करण्यासाठी हात उचलला… तसे देवळे घाईघाईने म्हणाले,

“थांबा साहेब… एकदा नीट वाचून घ्या. ठेकेदाराने खरंच काम पूर्ण केलंय की, नाही ते इंजिनीअरला विचारून पाहा…”

तो थबकला. त्याला स्वतःवरच आश्चर्य वाटलं. नेहमी व्यवस्थित वाचून, समजून, उमजूनच कोणत्याही कागदपत्रांवर सही करणारे आपण सध्या काही न बघताच सह्या का करतोय? त्याने मोबाइल उचलून साइट इंजिनीअरला फोन लावला-

“सूर्यवंशी या पोपटाणीचं काम पूर्ण झालं का?”

“नाही सर, अजून वीस-पंचवीस टक्के काम बाकी आहे. फिनिशिंग तर सगळंच बाकी आहे…”

“मग, तुम्ही तुमच्या सह्या करून फाइल कशी पाठवलीत?”

“सर, मोठ्या साहेबांचा फोन होता. तुम्ही 30 तारखेला रिटायर होणार आहात. तुमच्यानंतर जे साहेब येतील ते कदाचित लवकर बिल पास करणार नाहीत, म्हणून तुम्ही जाण्याच्या आत साहेबांना ते बिल तुमच्याकडून पास करून घ्यायचं होतं…”

“अस्सं होय!”

सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला.

“ठीक आहे. मी येतो उद्या साइटवर काम बघायला… मग बघू बिलाचं!”

“हो साहेब…”

फोन कट करून त्याने देवळेंकडे कृतज्ञेने पाहिलं. सही न करता फाइल बंद करून परत देवळेंकडे देत तो म्हणाला,

“थँक यू, देवळे!” देवळे हसले.

“साहेब, रिटायरमेंट जवळ आली की, माणसाचं मन थाऱ्यावर राहात नाही. त्याचं कामात लक्ष लागत नाही. अशावेळी नको त्या कागदपत्रांवर अजाणता सही केली जाते, याचे अनुभव आहेत आम्हाला… पाच वर्षांपूर्वी मेटकर साहेबांनी अशीच न बघता सही केली होती. फार मोठं व्हिजिलन्सचं प्रकरण झालं होतं. दोन वर्षं मेटकर साहेबांना सेटलमेंटचा एक रुपयासुद्धा मिळाला नाही आणि त्यांचं पेन्शनही सुरू झालं नाही. दोन वर्षांनी ते मिळालं आणि पंधरा दिवसांतच मेटकर साहेब अटॅकने गेले!”

“बापरे! त्यावेळी तुम्ही नव्हता का?”

“मी नेमका सुटीवर होतो. ज्युनियर क्लर्कने त्यांची सही घेतली होती…” तो शांत बसला. देवळेंनी त्याला मोठ्या संकटातून वाचवलं होतं.

0000

दुसऱ्या दिवशी मोठ्या साहेबांनी त्याला बोलावून घेतलं.

“कापडे, तुम्ही त्या पोपटाणीचं बिल ॲप्रूव्ह नाही केलं?”

“साहेब, काम तर पूर्ण होऊ द्या… अजून बरंच काम बाकी आहे.”

“साइट इंजिनीअर सूर्यवंशींनी तर सही केलीय… मग तुम्हाला घाबरायचं काय कारण?”

“साहेब, फायनल ॲथॉरिटी तर मी आहे. चार-पाच दिवसांत पोपटाणीला काम पूर्ण करायला सांगा. मग करतो सही!”

साहेबांनी नाराजीने त्याच्याकडे पाहिलं.

“कापडे, तुमच्या अशा आडमुठेपणामुळेच तुम्ही मागे राहिलात. नाहीतर, कुठल्या कुठे पोहचला असता…”

त्या ‘कुठल्या कुठे’चा अर्थ त्याच्या लक्षात न येण्याइतका तो मूर्ख नव्हता. पण अशा ‘कुठल्या कुठे’ पोहोचणाऱ्यांचे कधीकधी हाल अतिशय वाईट होतात, हेही तो जाणून होता. साहेबांशी वाद घालण्याचा त्याचा मूड नव्हता. तो चूप राहिला.

हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!

0000

दोन दिवस निघून गेले. रविवारी सुटी असतानाही तो ऑफिसमध्ये येऊन बसला. सरकारी बंगल्यामध्ये त्याला करमत नव्हतं. घरच्या आठवणींनी तो कासावीस होत होता. ऑफिसमध्ये दोन-चार फाइल हातावेगळ्या केल्यावर त्याला काम करायची इच्छा होईना. त्याचं काम तसं परफेक्ट होतं. कोणतंही काम झटपट मार्गी लावण्यासाठी तो जीवाचं रान करायचा. म्हणूनच तो सगळ्यांमध्ये लोकप्रिय होता. खरंतर मोठ्या साहेबांच्या जागी त्यालाच संधी मिळाली होती, पण त्याने प्रमोशन नाकारलं. प्रमोशन झालं म्हणजे जबाबदाऱ्या वाढणार… रिस्क वाढणार… पैसा मिळाला असता… पण पैशाची त्याने कधीच पर्वा केली नव्हती. मिळणाऱ्या पगारात तो समाधानी होता. अशीही त्याला कशाची कमतरता नव्हती. मुलामुलीचं लग्न होऊन गेलं होतं. मुलगा चांगल्या नोकरीत होता. बँकेत नोकरी करणारी त्याची बायको व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन नातवंडात रमली होती. तो सुखी आणि समाधानी होता. भ्रष्टाचार करून अतिरिक्त पैसा कमावण्याची त्याला हौस नव्हती. तो स्वतःही दोन नंबरचं खात नव्हता आणि कुणाला खाऊ देत नव्हता. म्हणूनच, अनेक अधिकारी आणि कर्मचारीही त्याच्यावर नाराज होते.

त्याने टेबलवरची बेल वाजवली. शिपाई आत आला… “बोला साहेब”

“सुनील, एक लेमन टी बनव. तुझ्यासाठी दुधाचा चहा बनवून घे.”

शिपाई खूश झाला. दुसरे अधिकारी कधीही शिपायाला चहा पाजत नाहीत, हे त्याला माहीत होतं. त्याने लेमन टी बनवून कप टेबलवर ठेवला आणि स्वतःचा कप घेऊन बाहेर जाऊ लागला.

“अरे, कुठे निघालास? बस इथेच!”

“नको साहेब. तुम्ही गेल्यावर नवीन साहेबासमोर असा चहा पित बसलो तर हाकलून देतील मला. नको, ती सवयच नको…”

“बरं बरं. कमीत कमी उभा तर राहाशील?”

शिपाई उभा राहिला… “साहेब, देवळे बाबूजी सांगत होते, तुमचा सेंड ऑफ होणार नाही, म्हणे!”

शिपायाने नको तो विषय काढला होता. त्याच्या मनावर एक मोठा ओरखडा उमटला.

“या कोरोनामुळे काय करता येणार आहे? मी तुम्हा सर्वांना जेवण देणार होतो. तो बेतही कॅन्सल करावा लागतोय बघ…”

“चांगल्या माणसांचं नशीबही कसं वाईट असतंय बघा. मागल्या वर्षी ते सिंग साहेब रिटायर झाले. लय बेक्कार माणूस…” बोलता बोलता त्याने तोंडाकडे अंगठा आणि मग नाकावर बोट दाबलं, “पण सेंड ऑफ लय झकास झाला…”

तो काही बोलला नाही, पण त्याच्या मनाला ती गोष्ट लागून राहिली.

हेही वाचा – इतिहासाशी जडले नाते…

0000

गुरुवार उजाडला. आज त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस. सकाळपासूनच तो भूतकाळातल्या आठवणींनी अस्वस्थ होता. या नोकरीतला पहिला दिवस त्याला आठवला. नोकरी लागल्यामुळे आई-वडिलांचे, भावा-बहिणींचे आनंदाने फुललेले चेहरे आठवले… प्रत्येक प्रमोशनवर आणि राजकारण्यांच्या अवकृपेने वारंवार झालेल्या बदल्या आठवल्या… नवीन ठिकाणावरची नवीन माणसं… त्यांच्याशी मिळतंजुळतं घेताना झालेली तारेवरची कसरत… भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हातमिळवणी न केल्यामुळे दोन-वेळा झालेलं निलंबन… मग पाठीमागे लागलेल्या चौकशा… अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या नालायक लोकांना खंडीभर पुरस्कार मिळत असताना, पात्र असूनही एकही पुरस्कार त्याला मिळाला नव्हता. बायकोच्या नोकरीमुळे तो मुलाबाळांना नोकरीच्या ठिकाणी कधीही घेऊन जाऊ शकला नव्हता आणि त्याच्या इमानदारीमुळे दुखावलेल्या अधिकाऱ्यांनी बदली होणं शक्य असतानाही कधीही त्याला नागपूरला जाऊ दिलं नव्हतं. मुलं मोठी होत असताना त्यांना पहाण्याचा आनंद त्याला त्यामुळे कधीच घेता आला नव्हता. प्रमोशन मिळण्याचा आनंदही तो कधी कुटुंबासमवेत शेअर करू शकला नव्हता…

सगळ्या आठवणींनी त्याला मधे-मधे गहिवरून येत होतं. आनंदाची एकच गोष्ट.होती की, तो आता आपल्या कुटुंबात पोहोचणार होता. पण तो आनंदही निर्भेळ नव्हता. नागपूरला गेल्यागेल्या त्याला चौदा दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार होतं. त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला नाही तरच त्याला घरी जाऊ दिलं जाणार होतं.

तो ऑफिसमध्ये पोहोचला. लॉकडाऊनमुळे कर्मचारीवर्ग एक दिवसाआड ऑफिसात येत होता. आज नेमका तो येणार नव्हता. त्यामुळे ऑफिसमध्ये तुरळक उपस्थिती होती. त्याच्या जागी आलेला अधिकारी त्याला भेटला. चार्ज देण्याघेण्याच्या पत्रावर दोघांनी सह्या केल्या. या सगळ्यात दुपार उलटून गेली. दुपारी चार वाजता पर्सनल डिपार्टमेंटचे अधिकारी त्याचा सेटलमेंटचा चेक घेऊन आले. देवळे आले होते. सुनील शिपाई उपस्थित होता. मोठ्या साहेबांनी आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी कोरोनाचं कारण सांगून यायचं टाळलं. त्याच्या केबिनमध्येच फक्त पाच जणांच्या उपस्थितीत निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला.

कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून कुणीही त्याच्या हातात हात मिळवला नाही. मास्क घातलेल्या चेहऱ्यांवर कोणतेही भाव त्याला दिसले नाहीत. ना कसले हारतुरे, ना मिठाई, ना कोणतेही गिफ्ट्स, ना ती भावविभोर करणारी भाषणं…! एकदम मिळमिळीत असा तो निरोप समारंभ होता. पंधरा मिनिटांतच तो केबिनच्या बाहेर आला. बाहेर निघताना त्याने पाहिलं. त्याच्या नावाची पाटी काढून त्याच्या जागी आलेल्या नवीन अधिकाऱ्याच्या नावाची पाटी लागली होती. सरकारी कामात इतकी तत्परता की, आपल्याला हाकलून देण्याची घाई? त्याला हसूही आलं आणि दुःखही झालं.

जड अंतःकरणाने तो ऑफिसच्या बाहेर आला. ड्रायव्हरने दार उघडता उघडता त्याला विचारलं, “कसा झाला साहेब सेंड ऑफ?”

“कसला सेंड ऑफ आणि कसलं काय? चेक घेतला आणि आलो!”

“तुमच्या सेंड ऑफची आम्ही पण वाट बघत होतो साहेब! आपला सगळा ड्रायव्हर स्टाफ तुम्हाला काहीतरी गिफ्ट घेऊन देणार होता. पण काय करणार? या कोरोनाने सगळंच बिघडवलं बघा साहेब…”

त्याने बळेच एक स्मित केलं.

गाडीत बसताबसता त्याने ऑफिसकडे पाहिलं. या वास्तूशी आणि विभागाशी त्याचा संबंध आता कायमचा तुटला होता. त्याला एकदम भडभडून आलं. कोर्टात घटस्फोट झाल्यानंतर वेगवेगळ्या दिशांना जाणाऱ्या पतीपत्नीसारखी ही ताटातूट आहे, असं त्याला वाटून गेलं.

बंगल्यावर त्याचा स्वयंपाकी मुरलीने बहुतेक सामानाची बांधाबांध करून ठेवली होती. फक्त चहाची, स्वयंपाकाची भांडी उरली होती. ती तो मुरलीलाच देऊन टाकणार होता. त्याने मुरलीला चहा बनवायला सांगितलं आणि तो सोफ्यात जाऊन बसला. एक विचित्र रिक्तपणा त्याला जाणवत होता. ते सकाळी लवकर उठणं, मॉर्निंग वॉकनंतर ऑफिसला जायला तयार होणं. निघेपर्यंत डझनावारी फोन येऊन गेलेले असत. ऑफिसमध्ये क्षणभरही दुसरा विचार करायची फुरसत नसायची. ऑफिसची वेळ संध्याकाळी सहापर्यंत असली तरी, तो सात-साडेसात वाजेपर्यंत बसलेला असायचा. बंगल्यात परत आल्यानंतरही सतत फोन सुरू असायचे… ते थेट अकरापर्यंत. आता ते सगळं बंद होणार होतं.

या कामामुळे त्याला कुणी मित्र नव्हते. अशीही मैत्रीची व्याख्या सध्या बदललेली! चिकन, मटण खाणाऱ्या, तंबाखू, दारू यांची व्यसनं करणाऱ्यांची, पैसे लावून रमी खेळणाऱ्यांची अनेक जणांशी मैत्री असते. हा तर पक्का शाकाहारी, निर्व्यसनी माणूस. पत्ते कधी हातात न घेतलेला. जगाच्या दृष्टीने अरसिक, बिनकामाचा, कंटाळवाणा!

“39 वर्षांच्या इमानदारीने केलेल्या नोकरीचं हे फळ? इतका मिळमिळीत, भावनाहीन शेवट? आपल्यापेक्षा तर शिपायांचे आणि कारकून लोकांचे सेंड ऑफ चांगले होते…” मुरलीने आणलेला चहाचा घोट घेत त्याच्या मनात विचार आला. त्याने एक दीर्घ निःश्वास सोडला. नकळत त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचे थेंब पडले. मनातले विचार दूर करण्यासाठी त्याने सकाळची वर्तमानपत्रं वाचायला हातात घेतली, पण ते वाचण्यातही त्यांचं मन लागलं नाही. चहा पिऊन झाल्यावर त्याने ट्रान्सपोर्टला फोन लावला. उद्या नागपूरला सामान घेऊन जाण्यासाठी ट्रक येणार की नाही, याची खात्री करुन घेतली. तो स्वतःच्या गाडीने उद्या सकाळीच निघणार होता.

सात वाजले. तो विचार करू लागला. त्याच्या हाताखालच्या एकाही इंजीनियरने त्याची भेट घेतली नव्हती किंवा साधा फोनही केला नव्हता. इतकं सगळ्यांशी चांगलं वागूनही लोकांनी साध्या शुभेच्छा देण्याचंही सौजन्य दाखवलं नव्हतं. काय कारण असेल? कोरोनाची भीती की कुणाला पैसे खाऊ दिले नाहीत त्याचा राग? की मोठ्या साहेबांनीच त्यांना तसं करू दिलं नसेल? मोठ्या साहेबांशी त्याचं कधीच पटलं नाही, त्याचा सूड तर, त्यांनी अशा पद्धतीने घेतला नसेल ना? एक मात्र खरं की, खुर्ची आहे तोपर्यंत माणसाला मान. खुर्ची गेली की कोण कुणाला विचारतंय! सरकारी खुर्चीचा तर हाच कायदा होता!

“जाऊ द्या. आपलं नशीबच वाईट…” मनाशी पुटपुटून त्याने एक नि:श्वास सोडला.

फोन वाजला. बायको होती. सेंड ऑफ कसा झाला, विचारत होती. काय उत्तर देणार होता तो? मग मुलगा, सून दोघंही बोलले. “उद्या सकाळीच निघतोय,” असं सांगून त्याने फोन बंद केला.

क्रमश:

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!