चंद्रशेखर माधव
साधारण 25 वर्षांपूर्वीची घटना आहे…. मी महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षाला शिकत होतो. आम्हाला समाजशास्त्र विषयाला शिकवणारे एक प्राध्यापक होते. आम्हाला त्यांचा आदर होता आणि त्यांच्याशी खूप जवळीकही होती. सरांमुळेच आम्हाला ट्रेकिंगची गोडी लागली. सुरुवातीला छोटे-छोटे एक-दोन ट्रेक केल्यानंतर सरांनी आम्हाला हरिश्चंद्रगडला दोन रात्र, तीन दिवसांचा ट्रेक करण्याबद्दल सुचवलं. आम्ही लगेच तयार झालो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा एक वर्ष मागे असलेले दहा ते पंधरा मुलं-मुली असा एक गट येणार होता.
आम्ही तीन मित्र – मी, रमेश, सोहन – आणि सरांच्या परिचयातील एक 30 ते 32 वयाची स्त्री, असे आम्ही चार जण जरा मोठे होतो.
त्याकाळी धरण बांधलेले नव्हतं. त्यामुळे खुबी फाटा मार्गे टोलार खिंड चढून हरिश्चंद्रगडाकडे रवाना होण्याची वाट सुरू होती. दुपारच्या सुमारास पुण्याहून बसने निघालो. खुबी फाट्याला उतरून चालत खिरेश्वर गावात पोहोचलो. हे अंतर सुमारे पाच ते सहा किलोमीटर असावं. खिरेश्वर गावातील मंदिरातच मुक्काम केला आणि सकाळी लवकर उठूनच टोलार खिंड चढायला सुरुवात केली.
संध्याकाळ होता होता आम्ही गडावर ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. त्या रात्री आम्ही तिथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लेण्याच्या मागच्या बाजूला एक, साधारणपणे पन्नास फूट उंच, कातळ आहे. या कातळावर जाऊन रॅपलिंग करणे, असा एक उपक्रम ठरला होता.
हेही वाचा – Mauli : बंद पडलेली गाडी अन् आईचा आशीर्वाद
सरांनी येताना दोर वगैरे सर्व लागणार साहित्य आणलं होतं. आम्ही सकाळी सकाळीच त्या कड्याच्या वर गेलो. रोप वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित लावल्या. दुपारपर्यंत एक एक करत आम्ही सगळ्यांनी दोन-तीन वेळा रॅपलिंग केलं. सर्व उपक्रम झाल्यानंतर दोर सोडवून आणण्याकरता आमचे सर कड्यावर गेले आणि आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी परतण्यास सांगितले.
हे सर्व होत असताना, सरांच्या परिचित असलेली ती स्त्री आमच्याबरोबर खालीच उभी होती. सरांनी दोराचे लटकणारे टोक जोरात खाली ओढलं… दोर ओढता क्षणीच 50 फूट उंच काड्यावर सरांनी जो दर गुंडाळून ठेवला होता त्या दोराचं भेंडोळ एका दगडासकट अचानक खालच्या दिशेने आलं. दगड खाली येताना बघून आम्ही दोन मित्र दोन दिशेला पळालो. पण ती स्त्री मात्र स्तब्ध होऊन तेथेच दगडाकडे पाहात उभी राहिली.
क्षणार्धात प्रसंगावधान राखून तिने आपला हात डोक्याशी धरला. पण तो दगड तिच्या हातावर पडलाच आणि हाताला सुमारे चार इंच लांब अशी मोठी जखम झाली. आम्ही गांगरून गेलो. पटकन त्यांना आम्ही खाली मुक्कामाच्या ठिकाणी आणले. हाका मारून सरांना खाली बोलावलं. सरही लगेच आले. जाताना आम्ही प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन गेलो होतो. लगेच तिथेच प्रथमोपचार करून बँडेज वगैरे बांधून रक्त थांबवण्यात सर यशस्वी झालो. पण फार वेळ थांबून चालणार नव्हतं. कारण जखम इतकी मोठी होती की, त्याला टाके घालण्याशिवाय पर्याय नव्हता. सरांनी लगेच मला आणि इतर दोघांना सूचना केल्या की, यांना घेऊन तुम्ही टोलारखंड उतरून गावात जा. सोहनला सांगितलं की, त्यांना घेऊन पुण्याकडे रवाना हो. आम्हा दोघांना, मी आणि रमेश, त्यांना खिंडीपर्यंत सोडून परत माघारी यायला बजावलं. तेव्हा दुपारचा एक वाजला होता.
हेही वाचा – वहिनीची माया
सर एका दगडावर बसलेले होते. निघताना आम्हाला म्हणाले, “कितीही वाजले तरी परत इथेच यायचं. तुम्ही याल तोपर्यंत मी इथेच बसलेला आहे.”
आम्ही निघालो. मजल दरमजल करीत करीत त्या दोघांना खिंडीपर्यंत पोचवलं आणि त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन माघारी परतलो. जाताना आम्ही ब्रेडचे दोन-तीन स्लाईस आणि चटणी एवढेच घाईघाईत बरोबर नेलेलं होतं. टोलार खिंडीपाशीच थांबून खाण्याचं तिथेच संपवलं. आमच्याजवळ पाणी सुद्धा नव्हतं. तसेच कोरडा झालेला घसा आणि तहानलेला जीव घेऊन आम्ही माघारी परतलो. अजूनही आम्हाला अंदाजे आठ ते दहा किलोमीटर परतीच्या मार्गावर यायचं होतं.
हळूहळू संध्याकाळच्या वेळी सुमारे साडेपाच पावणेसहा वाजता आम्हाला मुक्कामाचे ठिकाण दिसू लागलं. जसं मुक्कामाचं ठिकाण दिसलं, तसं लांबून बघितलं तर, सर त्याच दगडावर, त्याच ठिकाणी, त्याच अवस्थेत बसलेले दिसले.
आम्ही आश्चर्याने थक्क एकमेकांकडे पाहिलं. इतका वेळ सलग ते तिथेच बसले असतील असं नाही, पण शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी त्या मधल्या वेळेतला बराचसा वेळ त्या दगडावर बसून आमची वाट पाहण्यात घालवला होता, हे कळून येत होतं. हे पाहून आमचा सरांविषयीचा आदर अजून वाढला.
माणूस शब्दाला पक्का होता… आता त्यांची भेट होत नाही. पण या घटनेमुळे सर कायमचे आमच्या लक्षात राहिले आहेत.