आराधना जोशी
इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असताना अनेक दिग्गज मंडळींना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. त्यातलंच एक नाव म्हणजे खगोलभौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. 20 मे 2025 रोजी या शास्त्रज्ञ, लेखकाच्या निधनाची बातमी ऐकली आणि त्यांच्याशी साधलेल्या संवादाची घटना डोळ्यांसमोर उभी राहिली.
1999 साली अल्फा मराठी (आताचे झी मराठी) हे मराठीतले पहिले खासगी चॅनल सुरू झाले होते. निवडणुकांची धामधूम नुकतीच आटोपली होती आणि त्यामुळे बातम्यांसाठी आता इतर विषयांवर लक्ष द्यायला सुरुवात झाली. त्यातच मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलात डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची बातमी आली. कार्यक्रम खरंतर विज्ञानाशी निगडीत होता. त्यामुळे तो कव्हर करायला आपल्याला संधी मिळेल, याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मात्र, आमचे टीम लीडर नितीन वैद्य सरांनी मला तो कार्यक्रम कव्हर करण्याची आणि जमलंच तर डॉ. नारळीकर सरांची छोटी मुलाखत घेऊन येण्याची असाइन्मेंट दिली.
त्या संपूर्ण वर्षामध्ये धूमकेतूंचे नमुने गोळा करण्यासाठी स्टारडस्ट अंतराळयानाचे प्रक्षेपण, सौर मंडळाबाहेरील ग्रहांचा शोध आणि हबल स्पेस टेलिस्कोपला सेवा देण्यासाठी हबल सर्व्हिसिंग मिशन 3ए या घटनांचा समावेश होता. त्यावरच डॉ. नारळीकरांना प्रश्न विचारायचे असा विचार मी नितीन सरांसमोर मांडला आणि त्यांनीही तत्काळ त्याला होकार दिला.
मुळातच पत्रकार हा अनेकदा “Jack of all trades, master of none” या प्रकारात मोडणारा असतो. त्यामुळे हा प्रसंग आपण निभावून नेऊ, हा विश्वास वाटत होता. नारळीकर सरांना विद्यापीठात भेटले तेव्हा कार्यक्रम सुरू व्हायला जवळपास पाऊण तास बाकी होता. मात्र, सर पुण्याहून या लेक्चरसाठी वेळेआधीच पोहोचले होते. तोपर्यंत सरांच्या वक्तशीरपणाचे काही किस्से कानावर पडले होते. तोच वक्तशीरपणा त्या दिवशीही दिसला. खरंतर, सरांचा तिथला वावर हा इतका सहज आणि समोरच्याला आपलंसं करून घेणारा होता.
हलकं स्मितहास्य, चेहऱ्यावर झळकणारी हुशारी आणि विद्वत्तेचं तेज, पण तरीही अत्यंत साधी राहणी हे गुण नारळीकर यांना बघताक्षणी जाणवले आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या शास्त्रज्ञाची आपण काय मुलाखत घेणार? असा विचार मनात आला. मात्र तरीही, धीर एकवटून मुलाखतीबद्दल त्यांना विचारलं आणि कोणतेही आढेवेढे न घेता ते लगेच मुलाखतीसाठी तयार झाले. ऑफिसमधून निघण्याआधी जे प्रश्न विचारण्याची तयारी केली, ते सगळे विचारून झाले. नारळीकर यांनीही साध्या, सोप्या भाषेत त्यांची उत्तरे दिली. खरं सांगायचं तर, या मुलाखतीमध्ये सरांनी जी उत्तरं दिली त्यामुळे खगोलशास्त्र वाटतं तितकं अवघड नाही, असा विचार मनात पटकन चमकून गेला. मात्र, विषय सोपा करून विशद करण्याची नारळीकर यांची ती हातोटी होती, हेही लक्षात आलं.
चॅनलसाठी लहानशी मुलाखत घेऊन झाल्यावर नारळीकर सरांनी चॅनलबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. मुळात त्यावेळी दूरदर्शनच्या मराठी चॅनलव्यतिरिक्त अल्फा मराठीमुळे नारळीकर यांच्या मनात अनेक प्रश्न होते. मला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत; पण तरी माझ्या उत्तरांनी काही प्रमाणात तरी त्यांच्या शंकांचं निरसन झालं असावं. नंतर गाडी अर्थातच माझ्या वैयक्तिक चौकशीकडे वळली आणि साहित्याची अभ्यासक म्हणून असलेल्या पार्श्वभूमीवर अर्थातच नारळीकर यांच्याशी त्यांच्या मराठीतल्या विज्ञान कथासंग्रहांबद्दल नकळत गप्पा सुरू झाल्या.
वैज्ञानिक कथांचा हा जॉनर नारळीकर सरांनी मराठीत रुजवला, असं ठामपणे म्हणता येईल. तोपर्यंत मराठीत ज्या विज्ञान कथा आल्या होत्या, त्या परकीय भाषेतल्या कथांचा स्वैर अनुवाद अशा प्रकारच्या होत्या. म्हणूनच, नारळीकर सरांच्या कथा वेगळ्या ठरल्या, वाचकांना आवडल्या. या कथांमध्येही नारळीकर आवर्जून शक्य तिथे मराठीच शब्द वापरायचे. त्याबद्दल त्यांना विचारले असता मंद हसत ते म्हणाले, “अगं, मराठीत शब्द असताना दुसऱ्या भाषेतले शब्द का वापरायचे, हे मला आजपर्यंत कळलं नाही.”
त्यानंतर नारळीकर यांच्याशी पुन्हा एकदा भेट झाली, ती जवळपास 25 वर्षांनी! ICSE बोर्डाच्या इयत्ता दहावीला असलेल्या मराठी विषयातील ‘उजव्या सोंडेचा गणपती’ या कथेद्वारे. या बोर्डाचे मराठी विषयाचे क्लासेस मी घेत असल्याने दरवर्षी जयंत नारळीकर यांची ही कथा शिकवण्याची संधी मला मिळायची. त्यातही एक मेख होती, कथा मोठी आणि विज्ञानाशी संबंधित असल्याने बोर्डाने त्यातला वैज्ञानिक भाग – जो कथेचा गाभा होता – पूर्णतः गाळावा अशा सूचना शाळांना दिल्या होत्या. त्यामुळे शाळेतही अनेकदा ही कथा optionला टाका असाच प्रकार असायचा. पण मी मात्र क्लासमध्ये ही संपूर्ण कथा शिकवायचे. त्यातल्या गाळायला सांगितलेल्या भागासकट! तो भाग अधिकाधिक सोप्या भाषेत मुलांना कसा शिकवता येईल, याचा प्रत्येक वर्षी मी विचार करायचे. नारळीकर सर जर या कथेविषयी बोलले तर, त्यातील मोबियस पट्टीची (उलट्याचे सुलटे किंवा सुलट्याचे उलटे करणारी पट्टी निश्चितपणे एक गणिती सिद्धान्त मांडते) कल्पना ते कसे समजावून सांगतील, याचा कायम मनात विचार असायचा. त्यामुळे क्लासेसमध्ये जेव्हा मी ही कथा शिकवायचे, तेव्हा विद्यार्थ्यांना या मोबियस पट्टीबद्दल वाटणारं कुतूहल आणि त्या अनुषंगाने त्यांना पडणारे प्रश्न, यांचं थोडंफार निरसन मी करू शकले. ही कथा अतिशय आवडली असं विद्यार्थी नंतर आवर्जून सांगायचे आणि परीक्षेसाठी हा धडा नक्की तयार करणार, ऑप्शनला टाकणार नाही, असंही जेव्हा म्हणायचे तेव्हा नारळीकर सरांच्या कथांची जादू समजून यायची.
विज्ञान कथांसह कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. त्यांची ‘वामन परत न आला’ ही कादंबरी वाचकांना विशेष भावली. विज्ञान कथा ते कादंबरी अशा सिद्धहस्त व्यासंगी डॉ. जयंत नारळीकर यांची 2021मध्ये नाशिक येथे झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. त्यांच्या रुपाने पहिल्यांदाच विज्ञान लेखकाला साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. आता त्यांच्या निधनाने मराठी विज्ञान साहित्यामधील ‘वामन’ पोरका झाला, असे म्हणावे लागेल.