Saturday, August 2, 2025

banner 468x60

Homeअवांतररीगल... मागे उरलीय आठवणींची शिदोरी

रीगल… मागे उरलीय आठवणींची शिदोरी

मंदार अनंत पाटील

पिल्लू विकत घेऊन आम्ही सरळ टॅक्सी करून घरी येत होतो. आईने सहजच विचारले की, याचे नाव काय ठेवणार आहेस? नेमकी आमची टॅक्सी त्यावेळेस रीगल थिएटरवरून जात होती आणि माझ्या तोंडातून ‘रीगल’ नाव बाहेर पडले. पिल्लानेही मला लगेच प्रतिसाद दिला आणि आमचा ‘रीगल मंदार पाटील’ आमच्या घरी आला.

पहिल्या दिवशी मी रीगलला घेऊन किचनमध्येच झोपलो. थोड्या कुरूबुरीनंतर तो पण माझ्या कुशीत येऊन जो पहुडला तो थेट सकाळीच उठला. मग सुरू झाला एक नि:स्वार्थी, अतिशय प्रेमळ आणि विलक्षण लाघवी सहवास… जणू काही माझी सावलीच बनून राहिला माझा रीगल… त्याच्या त्या करामती, सारखे माझ्याभोवतीच घुटमळणे, माझ्यावर सतत लक्ष ठेवून असणे आणि अगदी जेवताना देखील माझ्या बाजूला बसून जेवणे इतके अंगवळणी पडले की, जरा देखील मी कामानिमित बाहेर गेलो तर याचा जीव कासावीस होत असे आणि जरा पाच मिनिटे नजरेआड होऊन परत आलो की जणू युगानंतर भेटल्याचा आनंद त्याच्या तोंडावर दिसे.

रीगल दिसायला अतिशय रुबाबदार होता. तपकिरी रंग, बळकट शरीर आणि घारे डोळे जिवाचा ठाव घेत. भले भले त्याला दबकून असत. आवाज पण खूप बुलंद होता. अतिशय तल्लख बुद्धीचा असल्याने ट्रेनरची कधी गरजच भासली नाही. आईला तर नातेवाईक बोलत की, ‘हा तर तुझा नातूच आहे.’ मनोजचा मित्र परिवार नेहेमी टिंगल करीत की, पैसे कमी पडले म्हणून त्याची शेपटी आणली नाहीत का? रीगलमुळे माझा मित्रपरिवार देखील वाढला होता.

सगळ्यात छान आठवणींपैकी एक आठवण म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत रोज त्याला सायकलवर बसवून जुहू बीचला घेऊन जात असे आणि आम्ही वाळूत मस्ती करत असू. तो इमारतीमध्ये देखील लोकप्रिय होता. माझी बालपणीची मैत्रीण वैशाली फातरफोडचा पण तो तितकाच लाडका होता. तिच्याकडेच मांसाहार खायला शिकला होता.

रीगल तसा शांत स्वभावाचा होता; पण आमच्या परिवारातील सदस्यांना तो खूप जपत असे. एकदाच त्याने माझ्या वडिलांचे मित्र, जे ट्रेनर होते, त्यांना कडकडून चावला होता. तो प्रसंग आमच्या कायमच लक्षात राहीला.

बघता बघता माझा रीगल दीड वर्षांचा झाला. तसा तो प्रकृतीने धडधाकट होता. रेग्युलर व्यायाम आणि योग्य आहार असल्यामुळे कधी मेडिकल इमर्जन्सी नाही आली. पण एक दिवशी अचानक त्याचे पोट मोठे भासू लागले म्हणून नेहेमीच्या वेटकडे (वेटरिनॅरिअन – Veterinarian) तपासायला नेले. वेटने औषधे लिहून दिली आणी दोन दिवसांनी परत तपासायला बोलाविले. नेहेमी तल्लख असणारा रीगल आता एक-दोन दिवसांत थोडा मंदावला होता. पण तरीही माझ्याच बाजूला राहात होता. दोन दिवस त्याने खाणे-पिणे एकदमच कमी केले होते आणि माझी घालमेल वाढायला लागली. वेटबरोबर बोलून वडिलांनी त्याला परळच्या एनिमल इस्पितळात चेकअपला नेले. तिथे तपासल्यावर कळले की, रीगलला जेनेटिक दोषामुळे जलोदराचा कॅन्सर झाला आहे आणि काहीही खाल्लेले रक्ताऐवजी पाण्यात रुपांतरित होत आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण १९९३ साली त्यावर काहीच इलाज नव्हता.

वेटच्या मतानुसार एकदा ऑपरेशन करून पाणी काढले गेले, पण परत काही दिवसांत तीच स्थिती उद्भवली. माझा रीगल धीराने या सगळ्या उपचारांना तोंड देत होता, पण शरीर साथ देत नाही, अशी परिस्थिती झाली होती. रीगलचे हाल बघवत नवहते. मी तर अगदीच हवालदिल झालो होतो आणि शेवटी मनावर दगड ठेवून वडील आणि वेटच्या मतानुसार रीगलला दयामरण दिले गेले.

21 फेब्रुवारी 1991ला जन्मलेला माझा अतिशय जीवलग मित्र फक्त दीड वर्ष जगला; पण जाताना मला अतिशय गोड आणि आयुष्यभर पुरतील अशा खूप आठवणींची शिदोरी देऊन गेला. आज देखील जवळ जवळ 33 वर्षांनी त्याची ह्रदयस्पर्शी आठवण लिहिताना डोळे अजूनही डबडबले आहेत आणि हुंदका दाबून ठेवायचा प्रयत्न करतो आहे.

(क्रमश:)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!