Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeअवांतर...अन् रीगल मंदार पाटील आमच्या घरी आला

…अन् रीगल मंदार पाटील आमच्या घरी आला

मंदार अनंत पाटील

एकेदिवशी रात्री बाबांनी कामावरून येताना अचानक माझ्याकरिता एक पांढरे आणि तपकिरी ठीपके असलेले अतिशय सुंदर आणि गुटगुटीत गावठी पिल्लू आणले. माझा आनंद गगनात मावेना… माझ्यासाठी फार अनपेक्षितच होते. एक-दोन महिन्यांचे गोंडस असे ते पिल्लू होते. मी लगेचच माझ्याकडे जमविलेले सामान वापरून त्या पिल्लाकरिता गादी आणि इतर गोष्टी नीट मांडून ठेवल्या. ते पिल्लू आई आणि भावंडापासून वेगळे झाल्यामुळे तसेच, नवीन वातावरण असल्याने भांबावून गेले होते. पण मायेने जवळ केल्यावर ते थोड्याच वेळात छान रुळले. खाऊ-पिऊ झाल्यानंतर मात्र त्याला आई आणि भावंडाची आठवण येऊ लागली… ते जे रडायला लागले ते निस्तरताना आमच्या नाकीनऊ आले.

कशीबशी एक रात्र काढली आणि पिल्लूपण दमून झोपून गेले. सकाळी सहा वाजता त्याच्या अंगात नवीनच उत्साह संचारला आणि जे दिसेल ते चावायला सरुवात केली. कदाचित दात शिवशिवत असावेत; पण आम्हाला काहीच कल्पना नसल्यामुळे परत एकदा आमची तारांबळ उडाली. कसाबसा एक दिवस गेल्यावर परत एकदा रात्री त्याने पुन्हा रडायला सुरुवात केली आणि रात्र जागवली. असे अजून एक-दोन दिवस गेल्यावर मग सगळ्यांनी विचार करून निर्णय घेतला की, पिल्लाची हेळसांड होण्यापेक्षा त्याला आई आणि भावंडांकडे परत द्यायचे… आणि अशा रीतिने कुत्रा पाळायचा पहिला अनुभव स्मरणीय ठरला.

नंतर काही महिने तरी मी कुत्रा हवा, असा हट्ट केला नाही, पण कालांतराने परत एकदा मनाने उचल खाल्ली… पण या वेळेस कुत्रा संगोपनाची पूर्ण माहिती आणि बारकावे माहीत झाल्याशिवाय परत कुत्रा आणायचा नाही, हे मनाला समजाविले. अनेक पुस्तके चाळल्यावर विजय भट लिखित संरक्षकसोबती नावाचे पुस्तक जवाहर बुक डेपोमध्ये सापडले. अतिशय सखोल आणि उपयुक्त माहिती त्यात उपलब्ध होती आणि माझ्या कुत्रा संगोपन ज्ञानात मोठी भर पडली.

पुस्तकाची अनेक पारायणे झाली आणि विविध जाती तसेच त्यांचे गुणधर्म माहीत झाले. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉबरमन जातीच्या कुत्र्याचा फोटो होता. का कुणास ठाऊक पण तो इतका मनावर ठसला की, याच जातीचा कुत्रा पाळायचा हेच ठरविले. मग सुरू झाला अधिकाधिक माहिती मिळवण्याचा सपाटा… त्या काळात इंटरनेट किंवा गूगलसारखी सर्च इंजिन नसल्यामुळे लोकल लायब्ररीमध्ये जाऊन या विषयावरची पुस्तके पालथी घातली. माझा हा ध्यास बघून वडील बोलून दाखवित की, इतकी रुची अभ्यासात दाखवली असती तर, नक्कीच उत्तम गुणांनी पास झाला असतास! पण काय करू आवडीचा विषय आणि ध्यास घेतला होता.

यावेळी नशिबाने साथ दिली नाही. शालेय जीवनात आणि अभ्यासात विशेष प्रगती नसल्यामुळे दोन वर्षं वाया गेली आणि घरच्यांचा रोष पदरी पडला. त्यामुळे कुत्रा पाळण्याच्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी दोन वर्षं वाट बघावी लागणार होती. पण श्वानप्रेम काही स्वस्थ बसून देत नसल्यामुळे ओळखीमधील लोकांकडे जाऊन त्यांच्या श्वानांशी खेळत असे. त्यामध्ये बिल्डिंगमधला राजा कुत्रा असो किंवा श्री. बापट यांच्या मुलाने मित्राचा आणलेला जर्मन शेफर्ड जातीचा प्रिन्स असो… पहिल्यांदा वाटणारी भीती हळूहळू कमी होत गेली आणी आपुलकी वाढतच गेली.

इयता 9वी आणि 10वी करत असताना अभ्यासाकडे नीट लक्ष देऊन हळूहळू आईकडून कबूल करून घेतले की, दहावीनंतरच्या तीन महिन्यांच्या सुट्टीत नक्की कुत्रा पाळायचा. त्यादरम्यान एक शाळकरी मैत्रीण योगिता साठेकडे जातिवंत जर्मन शेफर्डची जोडी होती आणि तिच्याकडून देखील बरीच माहिती मिळत गेली. साधारण 1992च्या एप्रिलमध्ये 10वीची फायनल परीक्षा पार पडली आणि त्याच दिवशी तडक क्रॉफर्ड मार्केट गाठले; कारण आधीच चौकशी केली असता, तिथे जातिवंत कुत्रे-मांजरे विक्रीला असतात, असे कळले होते. त्या वयात अनैतिक ब्रीडर किंवा पपी मिल यासंदर्भात कुठलीही जागरुकता किंवा माहिती उपलब्ध नसल्यामुळे तिथे जाऊनच कुत्रा आणायचा असेच ठरले होते. सहजच फेरफटका मारत असताना 10 नंबरच्या गाळ्याबाहेरच मला तपकिरी रंगाची, डॉबरमन जातीची दोन लहान पिल्ले पिंजऱ्यात खेळताना दिसली आणि त्यामधील एकाला बघून तर ठाम निश्चयच केला की, हाच आपला सखा सोबती!

साधारण चौकशी करून लगेच घरी परतलो आणि आईला सगळी माहिती दिली. आईने पण केलेल्या वाद्यानुसार दुसऱ्याच दिवशी कामावर सुट्टी घेऊन माझ्याबरोबर पिल्लू घ्यायला आली. तिथे पोहोचलो, पण कालची पिल्लं काही दिसेनात. थोडी धाकधूक लागून राहिली की, हे पिल्लूदेखील कोणीतरी नेले की काय? पण दुकानाच्या आतून भुंकणे ऐकू आले आणि जीव भांड्यात पडला. मग व्यवहाराचे बोलणे झाले आणि आईने किमतीमध्ये थो़डी घासाघीस करून दोन हजार रुपयांना पिल्लू विकत घेतले. येताना आम्ही सरळ टॅक्सी करून येत असताना आईने सहजच विचारले की, याचे नाव काय ठेवणार आहेस? नेमकी आमची टॅक्सी त्यावेळेस रीगल थिएटरवरून जात होती आणि माझ्या तोंडातून ‘रीगल’ नाव बाहेर पडले. पिल्लानेही मला लगेच प्रतिसाद दिला आणि आमचा ‘रीगल मंदार पाटील’ आमच्या घरी आला. घरी आणल्यावर तर कितीतरी वेळ हे खरेच वाटत नव्हते की मी परत कुत्रा आणला आहे!

पहिल्याच दिवशी रीगलला जास्तच जेवण दिले गेले आणि त्याने देखील ताव मारून खाल्ले. मग मोठे पोट घेऊन घरभर नाचत होता. पण या वेळेला मागील चुका होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली गेली. अनुभवातून आलेले शहाणपण होते ते!

(क्रमश:)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!