स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात –
- चार ते पाच बटाटे उकडून, निवल्यावर बारीक कुस्करावेत. त्यात दोन-तीन कांदे चिरून, तळून मिसळावेत. आले, लसूण, मिरची यांची बारीक पेस्ट करून त्यात मिसळावी. वरून कोथिंबीर घालावी. आवडीप्रमाणे मीठ टाकावे. हा गोळा फ्रीजमध्ये ठेवावा. याचा उपयोग अनेक प्रकारे होईल. आयत्या वेळेस पाहुणे आल्यास बटाटेवडे करता येतील. कोणतीही रस्सा भाजी दाट आणि चवदार होण्यासाठी फोडणीमध्ये थोडेसे सारण टाकल्यास आले-लसूण वाटण्याचा त्रास वाचेल. केव्हाही पटकन खुसखुशीत पराठे करता येतील. आयत्या वेळेस पाहुणे आल्यास ‘कोफ्ता करी’सुद्धा करता येईल. फक्त कोणताही जिन्नस करावयाच्या अगोदर पंधरा-वीस मिनिटे किंवा अर्धा तास फ्रीजमधून काढून बाहेर ठेवावे.
हेही वाचा – Kitchen Tips : आज साऊथ इंडियन डिशचा बेत आहे तर…
- ढोकळा करण्यापूर्वी कुकरमध्ये पाणी घालून उकळायला ठेवावे. ज्या भांड्यात ढोकळा करायचा असेल त्या भांड्याला तेलाचा हात लावून तेही त्याच कुकरमध्ये गरम करायला ठेवावे. नंतर तयार असलेल्या पिठात सोडा घालून चांगले फेसावे. फेसायला लागल्यानंतर पीठ फुगू लागते. फुगलेले असतानाच ते कुकरमध्ये गरम झालेल्या भांड्यात ओतावे. भांड्यावर झाकण आणि कुकरवर शिट्टी ठेवू नये. दहा पंधरा मिनिटांनी ढोकळा सुंदर फुलून येतो. ढोकळा जास्त प्रमाणावर करायचा असेल, तर प्रत्येक घाण्यासाठी वेगळा सोडा घालणे आवश्यक आहे. सर्व पिठात एकदम सोडा घालू नये.
- बेसन पिठाऐवजी मुगाच्या डाळीच्या पिठापासून सुरळीच्या वड्या कराव्यात. या पिठाला चिकटपणा असल्याने वड्या बिघडण्याचा शक्यता कमी आणि आहाराच्या दृष्टीनेही त्या चांगल्या. ताकाऐवजी लिंबाचा रस वापरल्यास वड्या तजेलदार आणि चकचकीत दिसतात, तसेच त्या चवीलाही उत्तम लागतात. खोबऱ्याच्या सारणाऐवजी फ्लॉवर, कोबी, गाजर यांपैकी कशाचाही कीस वाफवून त्यात मीठ, साखर, कोथिंबीर यांचे सारण घालून वड्या गुंडाळाव्यात.
हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे…
- आपल्या घरात नेहमी काही ना काहीतरी उरतेच, कधी चटणी तर कधी उसळ किंवा पावभाजीसारखी भाजी. तेव्हा इडलीचे पीठ नेहमीप्रमाणे करून घ्यावे. इडली तयार करताना इडलीपात्रात थोडे इडली पीठ घालावे. त्यावर ही भाजी किंवा उसळ किंवा चटणी घालावी. वरून इडली पीठ घालून बंद करावे आणि नेहमीप्रमाणे इडल्या कराव्यात. दोन-चार इडल्या चटणी आणि भाजी घालून करण्यासही हरकत नाही. ही ‘सरप्राइज्ड’ इडली सर्वांना आवडते. याच्याबरोबर चटणी किंवा सांबाराचीही जरुरी लागत नाही.
- उडीदवडे करताना एक वाटी उडीदडाळ, मूगडाळ आणि तांदूळ या डाळी आदल्या दिवशी किंवा रात्री भिजत टाकताना कढईत थोड्या भाजून (चांगल्या गरम करून) नंतर भिजत घालाव्यात. वडे कुरकुरीत आणि खमंग होतात. वड्यांना जास्त तेल लागत नाही आणि सोडा अजिबात घालावा लागत नाही.


