माधवी जोशी माहुलकर
विदर्भामध्ये फार पूर्वीपासून उन्हाळा आणि कच्चा चिवडा असे समीकरण ठरलेले आहे. तसा हा चिवडा जेव्हा मनात येईल, तेव्हा करता येतो; परंतु उन्हाळ्यात कच्च्या कैरीचा यात वापर केल्यामुळे तो विशेष चवदार लागतो. सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे महत्त्व लक्षात घेता हा गॅस न वापरता केलेला कच्चा चिवडा सर्वांची मधल्या वेळेतील भूक भागवण्याकरिता उत्तम पर्याय ठरू शकतो. हा चिवडा खायची एक पद्धत आहे. अगदी भांड्याला लागलेले तिखटमीठ, शेवटचा पोह्यांचा उरलेला चुरा जोपर्यंत चाटून-पुसून खात नाही, तोपर्यंत ते भांडं हातातून सुटू द्यायचं नसतं. ही पद्धत सर्वांनी अनुसरायची असते. बहुतांश लोकांना कच्चा चिवडा कसा करतात ते माहीत असावे, तरीही त्याची रेसिपी देत आहे.
साहित्य
- मुरमुरे – 2 वाट्या
- पातळ पोहे – एक वाटी (थोडे भाजून)
- शेंगदाणे – मूठभर (जे असतील ते वापरावे)
- फुटाणे किंवा डाळवा (डाळे) – मूठभर
- कैरी – एक
- कांदा – एक (चिरलेला)
- हिरव्या मिरच्या – दोन ते तीन (चिरलेल्या)
- लाल तिखट – एक छोटा चमचा
- मीठ – चवीनुसार
- कोथिंबीर – मुठभर (चिरलेली)
- साखर – चवीनुसार
- कच्चे तेल – अर्धी पळी
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट लिटिल मिलेट्स कटलेट्स!
कृती
- एक वाडग्यात मुरमुरे, शेंगदाणे (न भाजलेले), भाजलेले पातळ पोहे घ्यायचे.
- त्यात एक चमचा लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, चिरलेली कैरी, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीपुरते साखर, मीठ आणि तेल घालून छान एकत्र कालवावे आणि खायला घ्यावे.
टिप्स
- या चिवड्यामध्ये आणखी काय काय टाकायचं, ते तुमच्या आवडीवर अवलंबून आहे.
- यामध्ये टोमॅटो, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव घालू शकता. कैरी फक्त उन्हाळ्यात मिळते म्हणून त्यावेळी कैरी घालतात इतर वेळेस लिंबू वापरू शकता.
हेही वाचा – Recipe : शॅलोट्सचे चटपटीत लोणचे!
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


