कामिनी व्यवहारे
कुठे प्रवासाला जायचं असेल तर, रस्त्यात खाण्यासाठी म्हणून अनेकदा ब्रेड-बटर किंवा सँडविचचा बेत आखला जातो. पण या ब्रेडपासून आणखी एक स्वादिष्ट पदार्थ तयार केला जातो, तो म्हणजे सर्वांचे मनपसंत असे ब्रेड रोल्स. झटपट होणारा हा पदार्थ संध्याकाळच्या चटपटीत नाश्त्यासाठी किंवा शाळेतून आलेल्या मुलांच्या नाश्त्यासाठी बनवता येतो.
तयारीसाठी कालावधी – 15 ते 20 मिनिटे
तळणासाठी कालावधी – 15 ते 20 मिनिटे
एकूण कालावधी – 30 ते 40 मिनिटे
साहित्य
- उकडलेले बटाटे – 6
- कांदा – 1 मोठा (बारीक चिरून)
- धणे पावडर – अर्धा चमचा
- जिरे पावडर – अर्धा चमचा
- लाल तिखट – पाव चमचा
- हळद – पाव चमचा
- हिरव्या मिरच्या – 5 ते 6
- आले – 1 इंच
- लसूण – 6 ते 7 पाकळ्या
- कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली)
- लिंबाचा रस – 1 चमचा
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- ब्रेड स्लाइस – 15 ते 16
- तेल – तळण्यासाठी
हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?
कृती
- प्रथम आले, मिरच्या आणि लसूण जाडसर वाटून घ्यावे.
- उकडलेले बटाटे कुस्करून त्यामध्ये हे वाटण घालावे.
- नंतर हळद, मीठ, साखर, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट घालून नीट मिक्स करून छोटे छोटे लांबट गोळे करून ठेवावेत.
- ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात आणि नंतर एक एक स्लाइस पाण्यात बुडवाव्यात आणि दाबून त्यातील पाणी काढून टाकावे.
- मग या भिजवलेल्या स्लाइसमध्ये आपण केलेल्या बटाट्याचा एक गोळा ठेवून ब्रेडची दोन टोके जोडून, हाताने दाबून रोल तयार करावा.
- सगळे रोल केल्यावर कढईमध्ये तेल गरम करायल ठेवावे.
- नंतर हे रोल गरम तेलात सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
- सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करावेत.
हेही वाचा – Recipe : राजेळी केळ्यांचे उंबर अन् कढी गोळे
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


