मानसी देशपांडे
आज अशा एका विषयावर लिहित आहे तो विषय म्हणजे विलंबाने होणारी मुला, मुलींचे विवाह. तसं पाहायला गेलं तर, विवाह हा सोळा संस्कारापैकी एक महत्वाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा संस्कार आहे. पण हल्ली याचं रुपांतर इव्हेंटमध्ये झाले आहे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटलं आहे, “विवाह हा अत्यंत वैयक्तिक सोहळा… आणि त्याहीपेक्षा जास्त तो संस्कार आहे. सोहळा डोळे दीपवण्यासाठी बारशापासून बाराव्यापर्यंत समारंभ आणि आपत्ती साजऱ्या करायच्या, ते दौलतीचं आणि प्रेमाचं दांभिक प्रदर्शन करण्यासाठी…” ही झाली विवाहाची सोपी व्याख्या. आता मूळ मुद्दा बघू…
विवाहाचं योग्य वय नेमकं काय, हेच हल्ली समजत नाही. आपण लग्न का करतो? तर आयुष्याच्या एका नाजूक वळणावर तुम्हाला जोडीदाराची गरज असते आणि ही गरज एकालाच नसते तर दोघांनाही असते. मुलं, मुली हे हल्ली सक्षम झाले, स्वतःच्या पायावर उभे राहिले… पण शिक्षण पूर्ण करता करता आणि नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावर होईस्तोवर लग्नाचं योग्य वय निसटून जातं.
मला इथे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, जेव्हा वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवले जाते, तेव्हा पहिली नजर पडते ती अपेक्षांच्या रकान्यात. अनेकदा अवाजवी अपेक्षा ठेवल्यामुळे विवाहाला विलंब होतो. व.पु. म्हणतात, “एकत्र राहायला अक्षता लागत नाही तर, understanding लागतं…” तुम्ही संसारात पडणार आहात म्हणजे फक्त एकानेच समंजसपणा दाखवायचा का? लग्नविधीतील होमाचा धूर हा दोघांच्याही डोळ्यात जातो, पण मुलांच्या अपेक्षा पाहिल्या तर तिथे लिहिलेले असते, “मुलगी अनुरूप हवी…” अनुरूप म्हणजे कशी हो? उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचं वय 30च्या वर आहे आणि सगळी परिस्थिती देखील चांगली आहे, पण बायोडेटामध्ये फक्त अनुरूप लिहिलं असेल तर, कोणी संपर्क साधावा? कारण, काही उदाहरणं मी अशी देखील पाहिली आहेत की, फक्त क्षुल्लक कारणावरून घटस्फोट झालेल्या मुलीच्या आई वडिलांनी फोन केला तर, उत्तरं अशी मिळतात की, आम्हाला अशी मुलगी नको. जोडीदाराची साथ ही तिला देखील हवी असतेच ना!! पण घटस्फोट झालेली नको, वयातील अंतर फक्त 0 ते 4 वर्ष हवं, त्याचं पॅकेज अमुक अमुक एवढं हवं, या अपेक्षांमुळे खरं तर वय वाढत जातं आणि परिणामी नंतर तडजोड करावीच लागते.
हेही वाचा – Kavi Grace : ‘ती गेली तेव्हा…’च्या निमित्ताने
मी म्हणते, वयातील अंतरामुळे देखील नकार का दिले जातात? पण अंतर जर थोडं जास्त असेल म्हणजे 5 ते 7 वर्षांपर्यंत, तर तो मुलगा देखील प्रगल्भ असतो. कारण, दोघेही जर एकाच वयाचे किंवा दोघांत दोन वर्षांचं अंतर असेल तर, तेवढी समज नसते. तो हुडपणा म्हणा किंवा निर्णय घाईत घेणं हे प्रमाण जास्त असते. आपण बघतो, आपल्या आई वडिलांच्या वयात देखील इतके कमी अंतर होते का? पण तरीही संसार होतातच! कारण, एकत्र राहायला अक्षता लागत नाही तर understanding लागतं… हे त्याचं उत्तर.
एका गोष्टीचा विचार करायला हवा. ज्या मुलांचे किंवा मुलींचे आई वडील म्हणतात, आमच्या काहीच अपेक्षा नाही तरी, लग्न जमत नाही. याचं उत्तर आपण शोधतो का? कुठलातरी एक मुद्दा असा असेलच ज्यामुळे ठरत आलेली बोलणी फिसकटतात. काही वेळा दिवस मागून घेऊन देखील होकार किंवा नकार कळवले जात नाहीत, फोन उचलले जात नाहीत. तुम्ही मुलांचे आई, वडील आहात, त्यामुळे वेळेत सर्व गोष्टी व्हाव्यात ही तळमळ तुम्हाला असणं स्वाभाविक आहे. शेवटी, आपल्या डोळ्यासमोर मुलांचं सर्व व्यवस्थित होणं हीच आई-वडिलांची इच्छा असते ना!
बऱ्याचदा, मुलं-मुली हे सतत नकार आल्यामुळे अबोल होतात, त्यांना देखील वाटते, कोणीतरी हक्काची व्यक्ती माझ्या आयुष्यात देखील यावी. पण हे सगळं ते आई-वडिलांशी बोलू शकत नाही. फोटोवरून पसंती आली तरी, नंतर काही गोष्टी गैरसमजाच्या छायेत अडकल्या तर ठरत आलेलं लग्न मोडतं आणि त्याचं दुःख या आई-वडिलांनाही होतं. पण चेहऱ्यावर ते दुःख दाखवता येत नाही. मग व.पु. म्हणतात ते पटतं, “आपली व्यथा इतरांना न समजणे हाच पोरकेपणा…”
हेही वाचा – सुरेश भट… शब्द, स्वरांचा पारिजात
माझं म्हणणं इतकंच आहे, अपेक्षा असाव्यात पण त्या अवाजवी असू नयेत. कुठेतरी तडजोड करावी लागत असेल, पण पुढचं सर्व आयुष्य हे आनंदात जाणार असेल तर, होकार का देऊ नये? एकदा तिशी ओलांडली की, पस्तीशी देखील लगेच येते. आपला जोडीदार हा आपल्याला शोभणारा आहे की, नाही हे बघावेच; पण बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त महत्वाचं. कारण, तुमच्या अडचणीच्या काळात त्याच्या आधाराच्या एका स्पर्शाने तुम्हाला दिलासा मिळणं, म्हणजे खरे वैवाहिक सुख. त्याचा रंग कसा आहे, याहीपेक्षा त्याच्या येण्यामुळे माझ्या आयुष्यात सुखाचे रंग भरले जातील ना, हा विचार केला तर अनेक प्रश्न सुटतील…
काही वेळा मुलाच्या पगारापेक्षा मुलीचा पगार जास्त असतो, त्यामुळे देखील नकार कळवले जातात. पण, समजा मुलीचा पगार 50 हजार असेल आणि मुलाचा 40 हजार असेल तर, म्हणजेच सर्व चांगलं असताना थोड्यासाठी नकार देणं म्हणजे मूर्खपणा आहे. तसंच, अनेकदा पत्रिका जुळून देखील नकार कळवत राहणं, हे हल्ली नवीनच सुरू झालं आहे. अहो 18 गुण जरी जमले तरी यांना चालत नाही. असं म्हटलं तर लग्नाला विलंब होणारच ना!! सुवर्णमध्य कुठेतरी काढायला नको का?
बघा, तडजोड ही काही प्रमाणात करावीच लागते. योग्य वयात लग्न ठरलं तर, पुढच्या गोष्टी देखील सुकर होतात. ज्या जोडीदाराला आपण निवडणार आहोत, त्याला मनापासून निवडले तर प्रेम निर्माण होते. फोटो जरी समजा पसंत नसला तरी, अजून एखादा फोटो मागवू शकतो. कारण, काही वेळा जुन्या फोटोंमुळे व्यक्तीचा अंदाज येत नाही. यामध्ये बघण्याचा कार्यक्रम झाला तर, मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा प्रत्यक्ष बघता येतो आणि नंतर होकार किंवा नकार देणं सोपं जातं.
मुलं आणि मुली यांनी थोड्या तरी अपेक्षा मर्यादित ठेवल्या पाहिजेत. लग्न हा सोहळा आहे, इव्हेंट नाही. इथे नवीन नाती जुळतात, आयुष्यात एका नवीन व्यक्तीचे होणारे पदार्पण हे आनंद घेऊन येतं. प्रत्येक आई, वडिलांना वाटतं, आपल्या घरात देखील सनईचे सूर वाजले पाहिजेत, पण हे कधी? जेव्हा तुमच्या अवाजवी अपेक्षांना पूर्णविराम मिळेल. पदवीधर झालेली मुलगी देखील संसार करते तसंच डॉक्टर झालेली मुलगी देखील संसारच करते. फरक आपल्या दृष्टीचा असतो.
अर्थात, ही मतं माझी आहेत पण समाजातील वास्तव हेच आहे आणि त्यामुळे वय उलटून गेलं तरी लग्न जमत नाही, ही काळजी संपत नाही. म्हणून, अपेक्षा लिहिताना मुला मुलींची वयं उलटून जातील अशा अपेक्षा देऊ नयेत…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.
अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, Reasons, DelayedMarriages, मुलाच्याअटी, मुलीच्याअटी, शुभेच्छा