डॉ. अस्मिता हवालदार
रणांगण वाचायला घेतली तेव्हा प्रथम अर्पण पत्रिका पाहिली ‘_ मादमायसेल रोला यांस.’ ही कोण? प्रश्नच पडला. मी जेव्हा ही कादंबरी वाचली त्यावेळी गुगलून उकल करण्याची सोय नव्हती.
विश्राम बेडकर यांची ‘रणांगण’ कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड समजली जाते. यावर इतक्या समीक्षा आहेत की, समीक्षांचे संकलन पुस्तक रूपाने होऊ शकेल. प्रतिक्रिया सर्व प्रकारच्या आहेत… ॲसिडिक न्यूट्रल अल्कलाइन! अत्यंत टुकार ते मराठीत यानंतर असे कादंबरी लेखन झालेच नाही इथपर्यंत… मी दोन्ही मतांशी सहमत नाही!
पहिले महायुद्ध संपलेले असते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभे असते, तेव्हा हे कथानक घडते. त्यावेळी विमान प्रवास फारसा नसल्याने बोटीनेच प्रवास केला जात असे. अशाच एका युरोपहून शांघायला जाणाऱ्या बोटीवर ही कथा घडते. चक्रधर विध्वंस युरोपात दोन वर्षे राहून भारतात यायला निघालेला असतो… हा नायक. हॅर्टा नावाची यहुदी तरुणी जर्मनीतून हद्दपार झाल्याने आईबरोबर बोटीवर असते. ती शांघायला जाणार असते… ही नायिका. नायक आणि नायिका दोघेही पहिल्या असफल प्रेमामुळे व्यथित झालेले असतात. चक्रधरचे पूर्ण स्त्रीजातीबद्दल मत वाईट बनलेले आहे, त्याची प्रेयसी दुसऱ्याशी विवाह करते म्हणून आणि युरोपात त्याने पाहिलेल्या नायकिणींच्या अड्ड्यामुळे सुद्धा! तिथे असलेले स्त्रीत्वाचे प्रदर्शन विकृत वाटून त्याचा वाटाड्या वैषम्याने म्हणतो, “मीही एक स्त्रीच्या, आईच्या पोटी जन्माला आलो आहे, हे खरे वाटत नाही.”
चक्रधर हॅर्टाला भेटतो त्यावेळी कुठलीही भावनिक गुंतवणूक होणार नाही, याची खात्री असते. केवळ मनोरंजन हाच उद्देश. तिला जर्मनीतून हद्दपार केल्याने तिच्याकडे पैसा अडका, दागिने काहीही नसते. प्रियकराने दिलेली अंगठी पण पोलीस काढून घेतात आणि एक तकलादू अंगठी देतात. असे अनेक यहुदी बोटीवर आहेत. तिचे सामान मिळत नसल्याने ती दोन दिवस तेच कपडे घालून वावरते आहे, हे कळल्यावर चक्रधर तिला रुमाल देतो जो ती नाकारते. नंतर तिचे सामान मिळाल्यावर ती ताजीतवानी होऊन सुंदर ड्रेस घालून येते आणि चक्रधरला (त्याला ती ‘बॉब ‘म्हणत असते) विचारते, “मी कशी दिसते?” तो म्हणतो, “माणसात आल्यासारखी!”
हेही वाचा – सॉमरसेट मॉम अन् शंकर पाटलांचा ‘पाऊस’!
या उत्तरामुळे इतरांना त्याने तिचा अपमान केला असे वाटते, पण ती म्हणते, “हेच उत्तर हवं होतं. आम्ही स्वतःला किड्यांपेक्षा क्षुद्र समजत होतो, आता माणूस झालो.” केवळ अकरा दिवसांत घडणाऱ्या या कथेत लुई, लुईची आई, मार्था, शिंदे, मन्नान, हॅर्टाची आई अशी काही पात्रे येतात. त्यांना फारसे रंगवलेले नाही तरी, ती डोळ्यांसमोर उभी राहतात.
‘रणांगण’ हे नाव सार्थ वाटते. पहिले महारणांगण संपले, पण वैयक्तिक पातळीवर सुरूच राहिले. अनौरस संतती, कोणाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, प्रियजन गेले, संपत्ती गेली… अशा अनेक पातळीवर सुरू असलेले रणांगण. दुसरे रणांगण येऊ घातले होते. “ही युद्धेसुद्धा पूर्व नियोजित व्यापाराचा भाग असतात,” असे लेखक म्हणतो. शस्त्रे तयार केली तर विकली गेली पाहिजेत त्यासाठी युद्ध हवे. जर्मनीला आपला देश मानणाऱ्या यहुद्यांना जर्मनी नागरिक मानत नाही. यहुद्यांनी राष्ट्रनिष्ठा कुठे ठेवावी? हे रणांगण. जगण्याचे रणांगण. ‘ज्यांना स्वतःचा देश नाही, भाषा नाही असे यहुदी येशू ख्रिस्तापासून आइनस्टाइनपर्यंत आहेत,’ असे लेखक लिहितो.
हॅर्टा चक्रधरला विचारते, “जर्मनी विरुद्ध इंग्लंड युद्धात मी कोणाची साथ द्यावी? हिटलरची? आणि नाही दिली तर मी देशद्रोही? इंग्लंडची द्यायची असेल तर, ते मला सैन्यात घेतील? तुझ्या हिंदुस्तानात ब्रिटिशांचे राज्य आहे. ते मला शत्रू मानतील.” हे रणांगण. आयुष्य अवघड प्रश्न समोर ठेवते. निर्णय घ्यायचा असतो. महाभारतात सुद्धा भीष्मांना असाच प्रश्न पडला होता.
चक्रधर मुंबईला उतरण्याच्या आदल्या दिवशी तिला लग्नाची मागणी घालतो. इतके त्याचे हृदयपरिवर्तन होते. ती तो शेवटचा दिवस, रात्र त्याच्याबरोबर पूर्ण जगायचे असे ठरवते. “ज्याच्याकडे काहीच नाही, ज्याला राष्ट्र नाही, समाज नाही त्याने कुणाची चाड बाळगावी,” असा प्रश्न ती विचारते. तिच्या प्रियकराचा पोलिसांच्या भीतीने ती नीट निरोप घेऊ शकत नाही, याचे शल्य असते. परंतु यावेळी ती चक्रधरबरोबर पूर्ण रात्र घालवते. ती तिचा प्रियकर कार्लला त्याच्यात पाहत असते. चक्रधराला शरीरापलिकडची स्त्री सापडते. नुकतेच सापडलेले प्रेम त्याला सोडून जायचे असते. हे रणांगण. तिला ही कथा अशीच संपेल याची जाणीव असते. पण मन्नान तिला लग्नाची मागणी घालतो, तेव्हा ती नकार देते आणि बॉबवरच्या प्रेमाला जागते.
इंग्लिश शिकायला नकार देणारा लुई शेवटी हट्ट सोडतो आणि इंग्लिश बोलू लागतो. लुईची आई मुलाचा जीव वाचवण्यासाठी शरीर विकायला तयार होते. कालपर्यंत श्रीमंत असलेले यहुदी आज कोणी दान दिलेले जुने कपडे घेण्यासाठी वाद घालतात. हेही रणांगण आहे. लुईला दत्तक घेतो म्हणणारे शिंदे मुंबईला एकटेच उतरून जातात. हॅर्टा शेवटी आत्महत्या करते. यथा काष्ठं च काष्ठं च… एक दिवस वियोग होणारच असतो. कालप्रवाहात आपापल्या मार्गाने जावेच लागते.
हेही वाचा – बोल माधवी… मनात चाललेले महाभारत!
लेखक साम्यवादाबद्दल प्रखर मते व्यक्त करतो. श्रमिकांच्या गरिबीला तेच जबाबदार आहेत, असे म्हणतो. एक पात्र यहुद्यांना देशद्रोही म्हणते. पॅलेस्टाइनमध्ये यहुद्यांना प्रवेश न करू देणारा, ‘अरब ही तुमची भूमी कधीपासून झाली?’ असा कुत्सित प्रश्न विचारतो. मुस्लिम आणि ख्रिश्चन येण्यापूर्वी ही भूमी यहुद्यांची होती, असे इतिहास सांगतो. यावर लेखक लिहितो, इतिहास बहुरूपी आहे. त्याची साक्ष कोणी काढू नये. हिंदुस्थानची भाषा, धर्म आणि नाव सुद्धा एक दिवस बदलेल का? देश कधी आपला होतो? मातृभूमी जन्माने आपली होते का? हिटलरचे तत्वज्ञान एक दिवस जगभर पसरले तर सगळे एकमेकांना मारत सुटतील का? असे प्रश्न लेखक विचारतो.
ही कादंबरी अगदी लहानशी आहे, तासाभरात वाचून होते. पण ती निवांतपणीच वाचावी. बागेत किंवा घराच्या गॅलरीत खुर्ची टाकून बसून हातात छानसा चहा घेऊन वाचावी. वाचून झाल्यावर शतपावली करून आत झिरपू द्यावी. तेव्हाच वाचून मनात होणारे रणांगण जिंकता येईल. काळाची बंधने नाकारून जे साहित्य टिकते, ते श्रेष्ठ साहित्य… या निकषावर ही कादंबरी आजच्या काळातही तेवढीच सयुक्तिक वाटत असल्याने श्रेष्ठ आहे.
या कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर. पहिल्या आवृत्तीत कव्हरवर लेखकाचे नाव लिहिलेले नव्हते. त्यांची पत्नी प्रसिद्ध लेखिका मालती बेडेकर (विभावरी शिरुरकर) एकदा चिडून त्यांना म्हणाल्या, “एकदा स्वतः लिहून बघा, मग बोला…” तेव्हा त्यांनी आव्हान स्वीकारून पत्नीला कळू न देता कादंबरी लिहून प्रसिद्ध केली आणि त्यांना आश्चर्यचकित केलं.
आता अर्पण पत्रिकेतल्या मादमॉयसल रोला कोण? मालतीबाईच तर नाहीत? तुम्हाला काय वाटतं?


