शोभा भडके
भाग – 18
“ए बाय… पोरी, झालं माझं जेवण… लई मदत केलीस बघ तू!” साठच्या आसपास वय असलेली आजी आरुच्या जवळ येत म्हणाली.
“आजी तुमचं जेवण पोटभर झालं ना? मग झालं तर… आणि हे बघा जवळ जवळ सगळी भाजी विकली. आता ही थोडीशी राहिली, ती मी घेते. आता तुम्ही घरी जा आणि आराम करा,” आरु त्या टोपलीतली भाजी एका पिशवीत भरत म्हणाली.
“खरंच गं पोरी, लई गुणाची हायास बगं. सुखी रहा… तुला लई चांगला नवरा मिळू दी…” ती आजी आरूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
“आजी नवरा तर मिळालाय, पण… चांगला आहे की नाही, ते नाही माहीत…” ती समोरून येणाऱ्या शिवकडे पाहात चाचरत म्हणाली. कारण, तो रागाने पाहतच त्यांच्या दिशेने येताना तिला दिसत होता. “आजी मी येते… जा तुम्ही आता घरी…” घाईतच ती त्यांना म्हणाली. नंतर शिवकडे न जाता ती घाईतच गाडीकडे गेली.
शिवने ती गेली त्या दिशेला पाहात नकारार्थी मान हलवली… आणि तसाच चालत त्या आजीजवळ आला.
“आगं बाई, ही पोरगी तर भाज्या हिथंच इसरून गेली की!” त्या आजी टोपलीतल्या भाज्या पाहून स्वतःशीच बडबडत, जरासं हसत म्हणाल्या.
“आजी… तुम्ही एवढ्या उन्हात का या भाज्या विकत होतात?” आजीला त्यांच्या मागून आवाज आला, तसं त्यांनी मागे वळून बघितलं… “आगं बाई! मघाशी ती पोर पण असंच म्हणाली बघ पोरा… अन् काय करू बाबा पोटापाण्यासाठी करावं लागतं काम. लहानगी नात हाय माझी, तिच्यासाठी करते वणवण…” आजी म्हणाल्या.
मघाशी आरुने पण येऊन असंच विचारलं होतं आणि तेव्हा तिलाही आजीने हेच सांगितलं होतं… आणि भूक लागली, असं पण म्हणाल्या होत्या. म्हणूनच तिने त्यांना जेवण करायला लावलं आणि स्वतः त्यांच्या भाज्या विकत बसली…
हेही वाचा – आरू मुसमुसत उभी होती अन् शिव…
शिवने विचारल्यावर, आजीने आरूबद्दल सांगितलं. त्यांचं बोलण ऐकून त्याला आरूचा अभिमानच वाटला… आणि स्वतःचा राग देखील आला! अशा निर्मळ आणि स्वच्छ… नेहमी सगळ्यांना मदत करणाऱ्या अशा मुलीला त्याच्यामुळे त्रास झाला होता. पण त्याला त्यावेळी जे सुचलं, तेच त्याने केलं! त्याला फक्त, बहिणीला सुखी पहायचं होत आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता… त्याने सुस्कारा सोडत मनातले विचार झटकले आणि तो तिथून जायला निघाला.
“आरं पोरा थांब की! कुठं निघालास? तुझ्यासोबत होती का ती? असंल तर या भाज्या घेऊन जा… इथंच इसरून गेली बघ ती!” त्याच्या हातात भाज्यांची पिशवी देत आजी म्हणाली.
“अं… हो… हां… हे कशाला?” आजी पिशवी द्यायला लागली तर, तो गोंधळून गेला… आजपर्यंत कधी त्याच्या आईने देखील असं बाजारात जाऊन भाज्या आणल्या नव्हत्या. नोकर-माणसे होती त्यासाठी… आणि आज हातात भाज्यांची पिशवी होती. अजून तर लग्नही झालं नव्हतं, तर हातात भाज्यांची पिशवी आली होती! अजून काय काय करावं लागणार होतं, हे तर येणारी वेळच ठरवणार होती.
“हो… ठीक आहे आजी. आजी, उद्या तुमच्या नातीला घेऊन या पत्त्यावर या… तुम्हाला असं उन्हात काम करावं लागणार नाही…” एक कार्ड त्या आजीच्या हातात देऊन तो निघून गेला.
“देव तुमचं भलं करो…” त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात आजी, वर बघून, हात जोडत म्हणाली. या दोघांना भेटून त्या आजीला आनंद झाला होता… आणि तो आनंद त्यांच्या डोळ्यांतून देखील बाहेर पडत होता. कदाचित, आता त्यांच्या त्रासाचे दिवस संपणार होते…
आरू गाडीजवळ येऊन खाली बघत उभी होती… सोबत ओढणी बोटाला गुंडळणं सुरूच होतं. मघाशी शिवने रागात तिच्याकडे पाहिलं होतं, त्यामुळे ती खूप घाबरली होती… तिला माहीत होतं तिने काहीच चुकीचं केलं नाही… पण आत्तापर्यंत त्याच्या सहवासात तिच्यासोबत जे काही घडलं होतं, त्यामुळे तिला जास्तच भीती वाटत होती. आता तो काय करेल? ओरडेल का? की घरी आई आणि भाऊकडे तक्रार करेल? याची चिंता लागली होती तिला! त्यात ती त्या शॉपमधूनही न सांगता बाहेर आली होती…
“हे घे,” तो तिच्या सामोर पिशवी धरत म्हणाला.
“का… काय…?” ती अजूनही खालीच पाहात होती. त्याच्याकडे पाहण्याची हिम्मत होत नव्हती…
तो पुढे काहीच म्हणाला नाही. त्याने शांतपणे गाडीचं डोअर ओपन केलं आणि हातातली पिशवी आत ठेऊन दिली.
पण इकडे आरू खाली पाहात असल्यामुळे फक्त गाडीचं डोअर ओपन होत असल्याचा आवाज आला…. ते मागचं की, पुढचं हे कळल नाही! तिला वाटल आता तो रागात आपल्याला इथेच सोडून जातो की काय!
“काय… काय करताय? हे बघा मी… मी काही मुद्दामून नाही केलं… मला ते… ते कपडे नाही आवडले! ते काय घागरे होते का? …आणि… आणि तसंही लग्नात साडी नेसतात, घागरा नाही… मला नाही आवडत… आणि… आणि किती महाग होते? तेवढ्या पैशात तर… आमच्या गावातल्या सगळ्या पोरींचे कपडे आले असते! एवढे महाग असतात का कुठे? एवढं लुटायचं का?” शिवने तिला पुढे काहीच बोलू दिलं नाही… तिच्या तोंडावर हात ठेवला.
रस्त्यावर उभे आहोत, याचं भान पुन्हा एकदा त्या दोघांना नव्हतं… त्याने असं तोंडावर हात ठेवल्याने आरूचे डोळे मोठे झाले होते… तिच्या ऋदयाची धडधड वाढली होती… तिचा ऊर खाली वर होत होता… पुन्हा एकदा भीतीने तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता…
त्या उलट, शिव तिच्या बोलण्याने वैतागला होता आणि अजून जास्तच रागात तिच्याकडे पाहात होता…
“किती बोलतेस? तोंड दुखत नाही का तुझं? एक तर काहीच बोलत नाहीस… नाहीतर नुसती बोलत सुटतेस! आता जर एक शब्दही तोंडातून काढला ना, मग बघ! चुपचाप गाडीत बसायचं… काय? ” तो रागातच जरासं ओरडून म्हणाला.
तो ओरडल्यामुळे तिचे डोळे भरले… ते मोठे टपोरे डोळे आणि त्यात जमा झालेलं पाणी पाहून शिवला जाणीव झाली की, आपण जरा जास्तच ओरडलो. त्याला परत स्वतःचाच राग आला… तिच्या डोळ्यांत पाणी पाहून त्याच्या हृदयात कळ उठल्यासारखं झालं…
अजूनही ते तसेच उभे होते… तिच्या तोंडावर त्याचा हात आणि करूण नजरेने तिचे त्याच्याकडे पाहाणे… त्या पाण्याने डबडबल्या डोळ्यांत तो हरवला नाही तर नवलच! दोघं एकमेकांच्या खूप जवळ होते… दोघांच्याही मनात अनोळखी, पण हवीहवीशी वाटणारी अशी काहीशी भावना निर्माण झाली होती…
“सॉरी…” तो भानावर येत बाजूला झाला. ती सुद्धा बाजूला तोंड फिरवून मोठमोठ्याने श्वास घेत डोळ्यातलं पाणी उलट्या हाताने पुसू लागली…
माहीत नाही का, पण तो जवळ आला की, तिचं असंच होत होतं! जे होतंय ते समजत नव्हतं… आणि मग भावनांचा गोंधळ असा काही व्हायचा की, तिला रडायला यायचं.
“तू… तू रडतेयस?” त्यानं विचारलं.
“खरंच घरी जायचंय… माझ्याकडे आहेत साड्या, आईने घेऊन ठेवलेल्या! सगळं लवकर होत होतं म्हणून आधीच तयारी केली होती. त्यामुळे नका आत्ता काही घेऊ… तसं पण लई महाग होते ते कपडे… मला सवय नाही एवढे महाग कपडे घालायची,” त्याला पुढे काहीही न बोलू देता ती आपल्या मनातलं बोलून मोकळी झाली… आणि तो तिच्याकडे पाहात होता, मनात विचार सुरू होत – “अरे, सगळं हीच ठरवून रिकामी होतेय… मला काहीच बोलू देत नाही… पण काय करणार आलीया भोगासी असावे सादर…” त्याने सुस्कारा सोडत विषयच सोडला…
“ओके… चल घरी सोडतो तुला… पण त्याआधी काही तरी खाऊ या, भूक लागली असेल ना…” शिव.
“नाही मला भूक नाही, घरीच जायचंय,” ती हट्टाने म्हणाली.
त्यावर तो काहीच बोलला नाही, सरळ पुढे सरकून त्याने गाडीचं समोरचं दार उघडत तिला बसायला सांगितलं.
ती पण मग चुपचाप जाऊन बसली… त्याच्याकडे पाहिलं देखील नाही… आत्ता सध्या फक्त तिला त्याच्यापासून दूर जायचं होतं. दुसऱ्या बाजूने तो पण आत येऊन बसला. सीट-बेल्ट लावताना त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं तर ती मान खाली घालून बसली होती. ती मनात नेमका काय विचार करत असेल याचा त्याला अंदाज लावता येत नव्हता… त्यानेही मग शांत राहणंच पसंत केलं…
थोड्याच वेळात त्यांची गाडी तिच्या घराच्या आवारात पोहोचली. अर्थात, आत्ता ही गाडी दारापर्यंत जाणार नव्हतीच… त्याने गाडी थांबवली आणि तिच्याकडे पाहिलं…
ती ओढणीचं टोक बोटाला गुंडाळत अस्वस्थपणे कहीतरी विचार करत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणाक्षणाला बदलत होते. तिला गाडी थांबली याचं देखील भान नव्हतं.
“कसला एवढा विचार करते ही?” तिच्याकडे पाहून तो विचार करत होता…
“देवा, काय झालं होतं मला… काय काय बडबड केली मी… लग्नाची खरेदी करायला गेले होते, त्यांच्यासोबत… त्यांच्या मॉमनेच सांगितलं होतं… मी तर काहीच घेतलं नाही, सरळसरळ नाही म्हणाले… यांनी मॉमना सांगितलं तर? आणि त्यांनी आईला! बापरे… आई तर… देवा आता काय करू मी?” तिचे कधी डोळे मोठे होत होते तर, कधी भुवया जुळवून डोळे बारीक करत होती… तर घाबरून डोळे बंद करत मान ‘नाही’ अशी हलवत होती… असे भाव चेहऱ्यावर आणि मनात विचार…
खरंतर, ती खूपच क्यूट वाटत होती आणि तितकीच निरागस… तिच्या या निरागस चेहऱ्यात शिव हरवला नाही तर नवलच! पण यावेळी सावरलं त्याने स्वतःला. कारण, आज पहिल्यांदाच ते असे एकत्र होते अन् तेही दोघेच! त्याच्या जवळ येण्याने ती दोनवेळा रडली होती…
त्याने विचार बाजूला झटकले आणि तिला काही बोलायला जाणार तोच खिडकीवर टकटक झाली… तसं शिवने काच खाली घेत कोण आहे, ते पाहिलं तर, समोर राम उभा होता. तो किंचित वाकून शिवच्या बाजूला बसलेल्या आरूकडे काळजीने पाहात होता…
शिवने पटकन गाडीचं डोअर ओपन केलं, तसा राम थोडा मागे सरकला. त्या आवाजाने आरू पण भानावर आली आणि तिने बाजूला पाहिलं तर बाहेर राम उभा होता. शिव तिच्याकडे पाहात उतरण्यासाठी खुणवत होता… ती दार उघडून बाहेर यायच्या आधीच राम तिच्या साइडला आला आणि दार उघडलं…
तसं तीही बाहेर आली… पण तिने त्याच्याकडे पाहणं टाळत, “दादा, मी लई थकले बाबा… मी जाते आत…” असं म्हणून ती भरभर निघूनही गेली. तिने शिवकडे पाहणं टाळलं… शिव जरासा नाराज झाला. जाताना तिने ‘बाय’ तरी करावं, अशी साधी अपेक्षा… पण ती अजून लहान आहे आणि खरंच थकली असेल अस समजून घेत विचार झटकले…
रामने ती गेली त्या दिशेने एकदा पाहून तो शिवकडे वळला आणि त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला… तो शिवकडे रोखून पाहात होता.. त्याच्या असं रोखून पाहण्याने शिव जरासा गडबडला…. पण जरासाच! त्यानेही त्याच्या नजरेला नजर देत विचारलं,
“काय झालं? असं का पाहताय जिजाजी?”
“का रडली ती?” राम.
” काय?… कोण?” शिव त्याच्या या बोलण्यावर आधी तर गोंधळला… पण मग त्याच्या डोळ्यांसमोर आरुच्या डोळ्यांत पाणी आलं, तो प्रसंग आला… आणि त्याची नजर थोड्यावेळेसाठी हलली…
“मी काय विचारलं? माझी बहीण का रडली?” रामने पुन्हा एकदा त्याच कडक आवाजात विचारलं… आवाज थोडा वाढलाही होता. त्याच्या आवाजात आणि चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता.
हेही वाचा – दुकानाबाहेर येऊन शिवने समोर बघितलं आणि डोक्याला हातच लावला…
“ते… म्हणजे… मलाही माहीत नाही, काय झाल ते… अचानक रडायला लागली… खरंच मी काहीच नाही केलं… पण तुम्हाला कसं कळलं” जरा अडखळत, पण जे आहे ते शिवने त्याला सांगितलं.
शिवचा खरेपणा त्याच्या डोळ्यात दिसत होता… आणि रामला आरूच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे पुढे काही बोलला नाही. तिच्याशीच बोलावं लागेल, तसंही घरातील लग्नाच्या गोंधळामुळे दोघे बहीण – भाऊ निवांत एकमेकांशी बोललोच नव्हते. रामला बरेच प्रश्न पडले होते, जे आरूला विचारायचे होते आणि आज तो तिच्याशी बोलणार होता… उद्यापासून तर लग्नाच्या रीतीरिवाज सुरू होतील आणि पुन्हा वेळ मिळणारच नाही.
तो शांतपणे विचार करतच शिवच्या बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया न देता निघून जाऊ लागला… शिव त्याच्याकडेच पाहत होता…
एव्हाना शिवच्या लक्षात आले होते, राम त्याचा राग करतोय! त्याच्या डोळ्यात फक्त रागच दिसत होता… पण… पण का? त्याच्या मनात त्याच क्षणी विचार आला, त्याला कळलं तर नसेल ना मी जे केलंय ते…” आणि या विचाराने शिव अस्वस्थ झाला… त्याने केसातून हात फिरवत जाणाऱ्या रामकडे पहिलं, जो मधेच थांबला होता…
क्रमशः


