Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeललितप्रोजेक्ट व्हायवा

प्रोजेक्ट व्हायवा

चंद्रशेखर माधव

मी मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंटच्या (MCM) शेवटच्या वर्षाला होतो त्यावेळची घटना. आमचं कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी रोडवर होतं. कॉलेजमध्ये सुरेश नावाचा माझा, फारसा जवळचा नसला तरी, एक मित्र होता.

माझा मित्र दीपक आणि मी, आम्ही दोघांनी प्रोजेक्टकरिता अनुक्रमे सेल्स आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असे विषय निवडले होते.

एमसीएमच्या कोर्सला जाण्याआधी ग्रॅज्युएशनला असताना मी कॉम्प्युटरचा डिप्लोमा केलेला असल्यामुळे मला प्रोग्रॅमिंगची चांगल्यापैकी सवय होती. शिवाय, माझ्या घरी कॉम्प्युटर होता, त्यामुळे माझी प्रॅक्टिसही भरपूर होत असे. सुरेश आमचा मित्र असल्यामुळे वेळोवेळी प्रोजेक्टच्या संदर्भात विचारांची तसेच कागदपत्रांची देवघेव होत असे.

दुसऱ्या वर्षाच्या शेवटी शेवटी जसं प्रोजेक्ट सबमिशनचा दिवस जवळ येऊ लागला, तसं आम्हा सर्वांचीच गडबड वाढली. दरम्यानच्या काळात सुरेशने माझ्याकडून माझा प्रोजेक्ट ड्राफ्ट मागून घेतला. फ्लो डायग्राम, ईआरडीसाठी त्याला माझा प्रोजेक्ट बघायचा होता. मी त्याला माझ्या प्रोजेक्टचा ड्राफ्ट दिला. लगेच दुसऱ्या दिवशी त्याने मला तो परत आणून दिला.

व्हायवाचा दिवस आला. एक एक जण आता जात होता. कुणी 10 मिनिटे कुणी 15 मिनिटे… अशा प्रकारे प्रश्नांना तोंड देऊन बाहेर येत होता, वेगवेगळे भाव चेहऱ्यावर घेऊन. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आमचीही मनस्थिती क्षणाक्षणाला बदलत होती. सुरेश आता गेला, थोड्याच वेळात बाहेरही आला. आल्या आल्या म्हणाला “छान झाली व्हायवा. चांगले आहेत दोन्ही सर… फार काही विचारलं नाही.”

हे ऐकून आम्हीही समाधानी झालो. अजून काहीजण आत जाऊन आल्यावर माझा नंबर आला. आत गेलो, दोन परीक्षक समोर बसले होते. ठरल्याप्रमाणे प्रोजेक्टबद्दल सांगायला सुरवात केली. प्रोजेक्ट मी स्वतः केलेला असल्यामुळे काहीही अडचण आली नाही.

सर्व वृत्तांत सांगून झाल्यावर समोर बसलेल्या परीक्षकांकडे पाहत उभा राहिलो. एक दोन प्रश्न आले, त्याची समर्पक उत्तरे दिली. त्यानंतर मात्र ते परीक्षक पाच ते दहा मिनिटे त्यांच्या जवळील कागदपत्रे धुंडाळत राहिले. हे सर्व पाहून, आता इथून पुढे अजून अवघड प्रश्न आपल्या दिशेने येणार, असा अंदाज मी बांधला.

थोड्या वेळाने त्यांनी गठ्ठ्यातील एक प्रोजेक्ट काढला. माझ्या प्रोजेक्ट शेजारी ठेवला आणि म्हणाले “तुझा आणि दुसऱ्या एका विद्यार्थ्याचा प्रोजेक्ट एकदम आयडेंटीकल आहे. तू कॉपी केली आहेस.”

माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षणाने सावरून मी त्यांना म्हणालो “हा माझा प्रोजेक्ट आहे. सर्व प्रोग्रॅम्स मी स्वतः लिहिले आहेत. तुम्ही कोणतेही पान उघडून प्रोग्रॅमचे नाव सांगा, मी तुम्हाला तो प्रोग्रॅम बोर्डवर लिहून दाखवतो.”

हे ऐकून परीक्षक परत प्रोजेक्टची पाने उलटू लागले. एक-दोन मिनिटांत त्यांनी मला एका प्रोग्रॅमचे नाव सांगितले. सर्व प्रोग्रॅम्स मी स्वतः लिहिलेले आल्याने मला प्रोजेक्टची सर्व संरचना संपूर्णपणे लक्षात होती.

क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब मी लिहायला सुरवात केली. साधारण 10 ते 15 ओळी लिहिल्यावर ते म्हणाले “बास… थांब आणि जा आता.”  मी विषण्ण मनाने बाहेर पडलो.

अंतिम निकाल लागेपर्यंतचे दिवस, म्हणजे सुमारे दोन महिने, अत्यंत तणावात गेले. नापास होण्यापेक्षा, आपल्यावर कॉपी केल्याचा ठपका बसेल, याचीच मला जास्त धास्ती वाटत होती. साधा सरळ जगणारा माणूस होणाऱ्या नुकसानापेक्षा बदनामीला जास्त घाबरतो.

कालांतराने निकाल लागल्यावर कळलं, सुरेश प्रोजेक्टमधे फेल झाला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!