पराग गोडबोले
भाग – 2
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने 1977-78 साली नव्यानेच सॅनिटरी पॅड्स भारतात आणले होते आणि त्याच्या विपणनाची म्हणजे मार्केटिंगची जबाबदारी तिथं नुकत्याच रुजू झालेल्या ‘इंद्रा नूयी’ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे सर्व सहकारी पुरूष होते. अमेरिकेत स्थिर झालेलं हे उत्पादन भारतात आणून स्त्रियांना त्याचं महत्त्व पटवून द्यायचं, हे खूप कठीण काम होतं. पण त्यांनी अत्यंत जबाबदारीने हे आव्हान पेललं आणि हे उत्पादन भारतात रुजवलं, वाढवलं आणि लोकप्रिय केलं. ‘My life in full’ या आत्मचरित्रात त्यांनी त्यावेळची परिस्थिती चपखल शब्दांत मांडली आहे.
एक लक्षात येतंय की, हल्ली या उत्पादनांच्या जाहिराती खूप थेट झाल्यात. काही तर अतिशय किळसवाण्या आणि अतिरंजित! स्त्रीचं आरोग्य, तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती खूप नाजूक असते या दिवसांत आणि याच वेळी तिला पाण्यात भिजताना, उड्या मारताना दाखवून काय साध्य करायचं असतं या जाहिरातदारांना, हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण या, वास्तवाचा विपर्यास करणाऱ्या जाहिरातींवर काहीतरी अंकुश हवाच, अशी अपेक्षा अवाजवी नसावी.
प्रत्येक चंदेरी ढगाला काळी किनार असतेच, हा सृष्टीचा नियम आहे आणि तो इथे सुद्धा लागू होतोच. आज हजारो, लाखो स्त्रिया ही आधुनिक पद्धत अवलंबताना दिसतात आणि त्यातूनच तयार झालाय, या वापरून झालेल्या पॅड्सच्या विल्हेवाटीचा अक्राळविक्राळ राक्षस. आपल्या देशात एकूणच कचऱ्याच्या विल्हेवाटीची उग्र समस्या आणि त्यात या पॅड्सची भर.
विल्हेवाटीची कुठलीही शास्त्रीय पद्धत न अवलंबता, वापरले गेलेले हे पॅड्स, मग कधी flush केले जातात, तर कधी कागदात बांधून उकिरड्यावर फेकले जातात. दोन्ही पद्धती अतिशय अशास्त्रीय. पहिल्या पद्धतीत इमारतीच्या drainage lines तुंबतात आणि हे सगळं साफ करताना सफाई कर्मचारी मेटाकुटीला येतात. त्यांच्या आरोग्याशी जो खेळ होतो तो तर अतिशय चिंताजनक. उकिरडयावर फेकलेले पॅड्स कुत्र्यांच्या तावडीत सापडतात आणि मग दृष्टीला पडणारं दृश्य अत्यंत बीभत्स असतं. बाईपणाची अब्रू चव्हाट्यावर आणणारं.
हेही वाचा – Indra Nooyi Book : सॅनिटरी पॅड, एक प्रवास….
चांगलं काहीतरी घडत असताना, ही काळी किनार तशी सूज्ञ माणसाला विचार करायला लावणारी. बऱ्याच पर्यावरणवाद्यांनी यावर आवाज उठवायला आता सुरुवात केलीये आणि त्यातूनही चांगले बदल घडतायत. Tampons, menstrual cups या सारखे पुन्हा वापरण्याजोगे प्रकार आता हळूहळू मूळ धरू लागले आहेत, पण याबाबत खूप जनजागृतीची आवश्यकता आहे समाजात!
हल्ली काही ठिकाणी हे पॅड्स आणि diapers टाकताना कागदात गुंडाळून वर लाल शाईच्या पेनाने वर्तुळ आखून वेगळे ठेवले जातात, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांना याची पूर्वकल्पना यावी आणि हे हाताळताना योग्य काळजी त्यांना घेता यावी. अगदी आदर्श पद्धत, सगळ्यांनीच अंगीकारावी आणि तिचा प्रचार तसेच प्रसार करावा अशी! असंही ऐकलं आहे की, बऱ्याच ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृहात वेगळ्या पेट्या ठेवलेल्या असतात आणि त्यात जमा झालेल्या पॅड्सची नंतर शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. ही पण एक योग्य अशी प्रक्रिया, महिलांना आश्वस्त करणारी.
अलीकडेच एके ठिकाणी वाचलं की, पुन्हा वापरता येण्यासारख्या कापडाच्या घड्या नव्या स्वरूपात परत एकदा झिरपत आहेत. इथे एक वर्तुळ पूर्ण होतंय. बदल हे घडत असतातच आणि टाकाऊ म्हणून त्याज्य ठरवलेल्या जुन्या पर्यावरणपूरक पद्धती जेव्हा पुन्हा अंगिकारल्या जाव्याश्या वाटू लागतात, तेव्हा तो निसर्गाच्या जवळ जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो.
हेही वाचा – Homeopathy : शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग
जेवढे आपण विकसित होऊ तेवढी जास्त हानी आपण निसर्गाची करतो, हे गृहीतक आणि दुष्टचक्र थांबायला हवंच कुठेतरी आणि एक सामाजिक जाणीव म्हणून आपल्या सगळ्यांचा हातभार यात लागायलाच हवा. सणउत्सवाच्या उत्साहात रममाण होताना, आनंद देताना आणि घेताना आपण सगळेच पर्यावरणाचा विचार करूनच यात सहभागी होऊया, ही माफक अपेक्षा, माझी आणि अर्थातच समाजमनाची.
एका खूप नाजूक विषयावर मनापासून व्यक्त झालोय कारण ही काळाची गरज आहे आणि हे समजून घेण्यासाठी एक समाज म्हणून आपण प्रगल्भतेची एक उंची नक्कीच गाठली आहे, याची खात्री आहे मला. तुमचे अभिप्राय आणि प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत.
समाप्त