या लेखाची सुरुवात आपण आत्तापर्यंतच्या सर्व लेखांतून घेतलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेऊन करुयात. पहिल्या दोन लेखांत आपण पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता का आहे आणि शालेय प्रवेशाची तयारी कशी करावी, हे जाणून घेतले. पुढील चार लेखांतून आपण शाळा प्रवेशोत्तर पालकांच्या विविध जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन घेतले. तद्नंतरच्या सात लेखांमधे आपण प्रवेशोत्तर शाळेच्या जबाबदाऱ्या याविषयी टप्प्याटप्प्याने सखोल माहिती आणि मार्गदर्शन घेतले. या विषयांतर्गत विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी, माहितीपत्रक, शाळेतील तसेच मुलांची स्वच्छता, मुलांची सुरक्षितता आणि शाळा व वर्ग सजावट या मुद्द्यांवर सविस्तर विवेचन केले.
आता या लेखात आपण बालशाळेतील अभ्यासक्रमाची रूपरेषा समजावून घेणार आहोत.
अभ्यासक्रमाची रूपरेषा
मुलं जेव्हा पहिल्यांदा शाळेत येतात, तेव्हा ती अडीच ते साडेतीन वर्षे किंवा साडेतीन ते चार वर्षे या वयोगटातील असतात. साहजिकच, त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा अनौपचारिक पद्धतीने करावा लागतो. म्हणजेच, मुलांना शिक्षण देत असताना पुढील माध्यमांचा अवलंब करावा लागतो :
- वेगवेगळे खेळ
- विविध व्यवसाय
- नानाविध उपक्रम
- अनेक प्रकारची शैक्षणिक साधने
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : मुलांची सुरक्षितता
पूर्व-प्राथमिक शाळेत मुलं खेळगट, शिशुगट आणि बालगट या वर्गांमध्ये शिक्षण घेत असतात. सर्वसाधारणपणे बालशाळेतील अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश केला जातो.
- मुक्त व्यवसाय
- हस्त व्यवसाय
- संगीत
- भाषा
- गणित
- विज्ञान
- खेळ
महत्त्वाचे म्हणजे तीनही वर्गांसाठी अभ्यासक्रमाचे विषय सारखेच असतात, मात्र त्यातील उपविषय वयोगटानुसार वेगवेगळे असतात.
या अभ्यासक्रमाचे एक वैशिष्ट्य असे की, यातील विषय एकमेकांत मिसळलेले असतात. हस्त व्यवसाय आणि संगीत या विषयांमधून भाषा आणि गणिताचे शिक्षण होते. भाषा आणि गणितातून विज्ञानाचे शिक्षण होते. बालशाळेत विज्ञान काय शिकवणार? पण विज्ञानाची तोंडओळख होते. विविध खेळांमधून तर सर्वच विषयांची तोंडओळख होते.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा आणि वर्ग सजावट
मुलांना अशा शिक्षण पद्धतीचे पुढील फायदे मिळतात :
- मुलं शाळेत लवकर रमतात.
- मुलांना शाळेची गोडी लागण्यास साहाय्य मिळते.
- मुलांच्या वागणुकीत हळूहळू सकारात्मक बदल होतात. मुलांच्या वागणुकीत होणारा हा बदल म्हणजेच त्यांचे शिक्षण होय.
थोडक्यात, शिक्षणास पूरक असलेल्या समाविष्ट विषयांच्या अशा विशिष्ट अभ्यासक्रमातून मुलांचे शिक्षण नकळत सुरू होते. या पुढील लेखांतून आपण अभ्यासक्रमातील विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत.
क्रमश:


