मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची खेळगटासंबंधित सविस्तर माहिती घेतली. आता या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची शिशुगट या वर्गासंबंधित माहिती घेणार आहोत.
शाळेतील बाई तसेच मित्र-मैत्रिणी आपल्याच भाषेत आपल्याशी बोलतात, या गोष्टीचा आनंद होऊन मुलं त्यांच्याशी हळूहळू संवाद साधू लागतात. यात त्यांची झपाट्याने प्रगती होते. कित्येकदा मुलांनी एकमेकांशी मारलेल्या गप्पा आपल्याला ऐकत राहाव्याशा वाटतात आणि गप्पा ऐकताना मजा तर येतेच आणि आनंद देखील वाटतो. मुलं आपल्या बाईंशी पण आपलेपणाने गप्पा करतात. हे संवाद अधिकाधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मुलांचा शब्दसंग्रह वाढणे गरजेचे असते.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील भाषा शिक्षण
मुलांनी जास्तीत जास्त बोलावे म्हणून खेळगटाप्रमाणे तर उपक्रम घेतले जातातच, शिवाय त्यात अधिक भरही घातली जाते. असे समाविष्ट उपक्रम खालील प्रमाणे मांडता येतील :
- बडबडगीते
- बालगीते
- गप्पागोष्टी
- बालगोष्टी
- चित्र वाचन
- विविध चित्रांचे तक्ते : फळे, फुले, भाज्या, पक्षी, प्राणी, वाहने इत्यादी
- अक्षर वाचन बाराखडी आणि मुळाक्षरे तक्ता
- भाषा लेखन
आता आपण यातील उपक्रमाबद्दल काही मुद्दे पाहुयात –
1. मुलांना स्वतःची आणि शाळेची माहिती सांगायला शिकवावे.
2. मुलांना ठराविक दोन-तीन गोष्टी वारंवार सांगाव्यात. काही कालावधीनंतर मुलांना त्या गोष्टी सांगण्यास प्रवृत्त करावे. यातून बरेचदा मुलं स्वतःच्या मनाने गोष्टी तयार करून सांगतात.
3. मुलांना भाषा लेखन शिकविण्याची सुरुवात शिशुगटात करावी. पण एकदम अक्षर लेखन न शिकवता मुलांना उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरक्या रेषा, अर्ध गोल, पूर्ण गोल हे आकार काढण्यास शिकवावे. दोन रेषा आखून त्या रेषांमधे हे आकार काढायला सांगावे. मुलांना हे आकार काढायला जमले की, अक्षरे काढणे सोपे जाते. मुलांना हे जमायला लागले की, त्यांना मुळाक्षरे काढायला सांगावे. असे करताना गटवार अक्षरे काढण्यास सांगावे. उदाहरणार्थ,
ग – म – भ – न
व – ब – क – ळ
प – ष – फ – ण
अशा रितीने शिशुगटात मौखिक आणि लिखित भाषा शिक्षण घेतले जाते.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटासाठी हस्तव्यवसाय
शिशुगटात मुलांची कल्पनाशक्ती आणि विचार करण्याची वाढत असलेली क्षमता यांची सांगड त्यांच्या मेंदूत घातली जाते आणि यातूनच मुलांचे भाषा शिक्षण समृद्ध होण्यास सुरुवात होते.
पुढील लेखात आपण बालगटातील भाषा शिक्षण या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
क्रमश:


