मागील लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची खेळगट या वर्गासंबंधित सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील हस्त व्यवसाय या विषयाची शिशुगट या वर्गासंबंधित जाणून घेणार आहोत.
शिशुगटातील हस्त व्यवसायात कागदकाम, ठसेकाम आणि चित्रकला या तीन प्रमुख उपक्रमांचा समावेश करण्यात येतो. शिशुगटातील मुलं थोडी मोठी असतात. यामुळे स्थुलाकडून सूक्ष्माकडे या तत्वाचा अवलंब करताना मुलांना जरा अवघड स्वरुपाचा हस्त व्यवसाय देण्यात येतो.
कागदकाम
फाडकाम
कागदकामातील फाडकामासाठी मुलांना रंगीत पतंगी कागद देतात. फाडकाम करताना अंगठा आणि पहिली दोन बोटे यांचा वापर होत असल्याने लेखनाची पूर्वतयारी सुरू होते. मुलं सुरुवातीला कागदाचे मोठे-मोठे तुकडे करतात आणि नंतर लहान-लहान तुकडे करायला शिकतात. मुलांना हाताच्या बोटांच्या स्नायूंवर नियंत्रण करणे जमू लागल्याने हा बदल होतो.
चुरगाळाकाम
मुलं चुरगाळाकाम करताना हळूहळू छोटे घट्ट चुरगाळे करू शकतात.
चिकटकाम
कागदाचे केलेले तुकडे आणि चुरगाळे एका चित्रात चिकटवायला मुलांना शिकवले जाते. सुरुवातीस भरपूर डिंक वापरून चिकटकाम करणारी मुलं शिक्षकेच्या मार्गदर्शनाने आणि सवयीने थोड्या प्रमाणात डिंक घेऊन चिकटकाम करतात.
घडीकाम
कागदावर तुटक रेषा काढल्यावर घडी घालता येऊ लागल्यावर मुलं सरावाने तुटक रेषा आखली नसताना देखील कागदाची घडी घालू शकतात. नंतर मुलांना कागदाची घडी करून पंखा बनवणे आणि रुमालाची घडी करणे इत्यादी शिकवले जाते.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटासाठी हस्तव्यवसाय
ठसेकाम
मुलांना ठसेकामासाठी रंगात थोडे पाणी घालून घट्टसर रंग तयार करून दिला जातो. एका मोठ्या चित्रात मुलांना भेंडीने, बोटाने, कापसाच्या बोळ्याने ठसे द्यायला सांगावे. ठसेकामासाठी सुरुवातीस एक रंग आणि नंतर दोन-तीन रंग वापरतात. मुलांना लाल, पिवळा आणि निळा असे मूळ रंग ठसेकामासाठी दिले जातात. मुलं हळूहळू रंगसंगती साधायला शिकतात. मुलांना रंगांची नावे सांगून परिचय करून देणे, हा विज्ञानाचा भाग अशा रितीने शिकवला जातो.
चित्रकला
चित्र काढणे
- मुलांना गोल आकारातील चित्रे म्हणजे चेंडू, सूर्य, चंद्र आणि फुले काढायला शिकवले जाते.
- तसेच मुलांना चौकोनी आकारातील चित्रे म्हणजे पाटी, बॅट इत्यादी शिकवले जाते.
- मुलांना चित्रे काढण्यास मार्गदर्शन मिळावे म्हणून चित्रांच्या आदर्श कृती समोर ठेवण्यात येतात.
हेही वाचा – बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटासाठी मुक्त व्यवसाय
चित्र रंगवणे
- मुलांना सुरुवातीला संपूर्ण गोल, चौकोन आणि त्रिकोण एका विशिष्ट पद्धतीने रंगवायला शिकवतात. असे करताना रंग रेषेबाहेर जाणार नाहीत, ही काळजी घेण्यास शिकवावे.
- नंतर चित्रात रेषा आखून दोन-चार भाग करून त्यात वेगवेगळे रंग द्यायला शिकवतात. सरावाने मुलं प्रत्येक भागात वेगळा रंग द्यायला सफाईने शिकतात.
शिशुगटातील मुलांची हस्त व्यवसायाच्या विविध उपक्रमांतून प्रगती होते आणि याची नोंद ठेवली जाते.
पुढील लेखात आपण बालगटातील हस्त व्यवसाय या विषयाबाबत जाणून घेणार आहोत.
क्रमश:


