अनिता बाळकृष्ण वैरागडे
मागील भागात मी योगबद्दल माहिती दिली होती. म्हणजे योग केल्याने आपल्या जीवनावर काय काय परिणाम होतो. योग केवळ व्यायाम नाही तर, ती एक संपूर्ण जीवनशैली आहे… योग म्हणजे शरीर, मन आणि श्वास यांचं एकत्रित आणि संतुलित कार्य… योग केल्याने मानसिक शांती मिळते, शरीर निरोगी आणि लवचिक बनते तसेच श्वासनक्रिया नियंत्रित राहते, एकाग्रता वाढते, झोप चांगली लागते. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र जोडणारा मार्ग आहे. योगमध्ये अनेक प्रकार आहेत. पण त्यातही प्राणायाम हे प्रमुख म्हणता येईल. प्राणायाम म्हणजे श्वास घेण्याची आणि सोडण्याची योग्य पद्धत.. हे केल्याने आपला श्वास मोकळा होतो आणि मन शांत राहतं…. प्राणायाम रिकाम्या पोटी करायचा असतो… शांत आणि स्वच्छ अशा जागेत ताठ बसून तो करावा. जेणेकरून प्राणायाम करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.
हेही वाचा – योग म्हणजे परिपूर्णतेची जननी
प्राणायाममध्ये काही अन्य प्रकारही आहेत.
- अनुलोम-विलोम केल्याने नाडीचे शुद्धीकरण होते, मन शांत राहते, मेंदूची कार्यक्षमता वाढते. मनावरील ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
- कपालभाती प्राणायाम केल्याने पाचनशक्ती सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते. शरीरातील विषारी वायू बाहेर सोडले जातात. त्वचाही तजेलदार होते.
- भस्त्रिका प्राणायाम केल्याने ऊर्जा वाढते. फुफ्फुसे मजबूत होते. मेंदूला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळते.
- उज्जयी प्राणायाम केल्याने थायरॉइडसारख्या मोठ्या आजारावर नियंत्रण राहते.. श्वासोच्छवासात सुधारणा होतो.. घशातून येणारा आवाज सौम्य असतो.
- भ्रामरी प्राणायाम केल्याने मन आणि डोके शांत राहते. शांत झोप न लागणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर आहे..
- ओमकार प्राणायाम केल्याने मानसिक शांती मिळते. रक्तदाब कमी होण्यास मदत होते. झोप चांगली लागते आणि मनाची एकाग्रता वाढते.
प्राणायाम हा केवळ श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा व्यायाम नाही. तर ती एक जीवन जगण्याची कला आहे. तणावमुक्त आणि रोगमुक्त होण्यास ते सहाय्यभूत ठरते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वांनी रोज वीस ते पंचवीस मिनिटे प्राणायामसाठी दिली तर, आपले आरोग्य चांगले राहील आणि मनही स्थिर राहील. आपल्याला सर्वांना योग आणि प्राणायाम करायला प्रेरणा मिळो!
हेही वाचा – आयुर्वेद अन् ऋतुचर्या