रश्मी परांजपे
‘प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी’ या मालिकेअंतर्गत मागील लेखात आपण पालकांच्या माहितीसाठी आणि पूर्ततेसाठी विद्यार्थीसंबंधित माहितीपत्रक तयार करताना समाविष्ट करावयाचे महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण शाळेतील तसेच मुलांची स्वच्छता याविषयी माहिती घेणार आहोत.
शाळा हे विद्येचे मंदिर आहे, असे आपण मानतो. त्यामुळे शाळा मंदिराप्रमाणेच स्वच्छ असणे नितांत गरजेचे आहे. तद्वतच, शाळेतील विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांची स्वच्छतादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. आता आपण एकंदरीत स्वच्छतेसंबंधित काही मुद्दे जाणून घेऊयात.
- शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक रचनेचे तसेच चांगल्या पद्धतीने रंगवलेले असावे. शिवाय, ते नेहमीच धुवून-पुसून धूळरहित आणि स्वच्छ ठेवावे. असे प्रवेशद्वार बघितल्यावर शाळेत प्रवेश करताना सर्वांचे मन सदैव प्रसन्न राहील.
- शाळेत वर्गाबाहेरील परिसर तसेच पटांगण हे भाग नेहमीच स्वच्छ ठेवावेत.
- विशेषतः, पावसाळ्यात या परिसरात माती आणि पाणी यामुळे जमीन/फरशी निसरडी होऊन मुलं घसरून पडण्याची बरीच शक्यता असते. म्हणून, या परिसराची योग्य काळजी घेऊन हा भाग स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच, पावसाळ्यात मुलांच्या पायाला माती लागल्यास मुलांचे पाय स्वच्छ करण्यासाठी योग्य व्यवस्था करायला हवी.
- वर्गाची स्वच्छता तर, सर्वात महत्त्वाची असते, कारण मुलं वर्गात तीन तास काही ना काही उपक्रम (activities) करत असतात. शाळा भरण्यापूर्वी तसेच सुटल्यावर वर्ग रोज स्वच्छ करायलाच पाहिजे.
- मुलांनी डबा खाल्ल्यावर तर वर्ग स्वच्छ झाडून पुसून घ्यावा.
- वर्गात येताना मुलांना बूट/चप्पल काढून व्यवस्थित ओळीत ठेवण्याची सवय लावावी.
- वर्गाच्या दरवाजाजवळ पायपुसणे अवश्य ठेवावे. मुलांना वर्गात येताना पायपुसण्याला पाय पुसण्याची सवय लावावी, म्हणजे आपसूकच वर्गात स्वच्छता राहील.
- मुलांना हात पुसण्यासाठी वर्गात नॅपकिन/छोटे टॉवेल जरूर ठेवावेत.
- पायपुसणे आणि नॅपकिन वेळोवेळी धुऊन स्वच्छ ठेवावेत.
- स्वच्छतागृहाची स्वच्छता राखणे तर, सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. मुख्य म्हणजे, स्वच्छतागृहाचा दुर्गंध पसरणार नाही, ही काळजी कटाक्षाने घ्यावी. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यावर नेहमी पाणी टाकणे, या सवयीचा सर्वांनीच अवलंब करावा.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रक
मुलांच्या स्वच्छतेसंबंधित सांगायचे झाल्यास मुलांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून खालील धडे आवर्जून द्यावेत :
- डबा खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे.
- डबा खाल्ल्यावर हात स्वच्छ धुणे आणि खळखळून चूळ भरणे.
- स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुणे.
शाळेतील तसेच मुलांची स्वच्छता ही जबाबदारी सेविकांची तसेच शिक्षिकांची असते. ही जबाबदारी त्यांनी अतिशय दक्ष आणि जागरूक राहून पाळणे आवश्यक आहे. अर्थात, मुख्याध्यापिकेने स्वच्छतेसंबंधित सर्व कामांवर यथायोग्य लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.
क्रमश:
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रकातील मुद्दे
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान दिले. तसेच, लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल – 9881943593


