रश्मी परांजपे
भाग – 4
मागील तीन लेखांमध्ये आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, याविषयी बरेच निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण या विषयावरील उर्वरित मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. शालेय वार्षिक सहल आणि स्नेहसंमेलन अशा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांसंबंधी पालकांच्या जबाबदारीविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया.
शालेय वार्षिक सहल आणि मुलांचा सहभाग
शाळा दरवर्षी मुलांसाठी सहल आयोजित करत असते. सहलीचे ठिकाण आपण पाहिलंय, तेव्हा मुलाने तिथं जायची गरज नाही, असा विचार पालकांनी कधीच करू नये. तसेच, मुलं लहान आहेत म्हणून अजिबात काळजी करू नये, कारण सर्वच मुलं समवयस्क असतात, शिवाय शाळेच्या ताई आणि मावशी सहलीमधे सर्व मुलांची व्यवस्थित काळजी घेत असतात. त्यामुळे पालकांनी भीती न बाळगता मुलाला सहलीला अवश्य पाठवावे. यामुळे मुलांना इतर मुलांबरोबर सहलीचा आनंद लुटता येतो. मुलाला स्वतःची बॅग आणि इतर वस्तू सांभाळायची सवय लागायला सुरुवात होते.
सहलीबाबत शाळेने दिलेल्या सूचना पालकांनी काटेकोरपणे पाळाव्यात. तसेच मुलाला इतर मुलांबरोबर राहण्यास आणि ताई-मावशींचे ऐकण्यास सांगावे. अशा रितीने सर्वांच्या सहकार्याने सहल व्यवस्थित पार पडते. (एकदा का सहल सुखरूप परतली आणि मुलांना पालकांच्या ताब्यात दिलं की, मुख्याध्यापिका, शिक्षिका तसेच सेविका ताणमुक्त होऊन त्यांना हायसं वाटतं, हे मी अनेक वर्षे अनुभवलं आहे.)
शालेय वार्षिक स्नेहसंमेलन
सहलीप्रमाणे शाळा दरवर्षी मुलांसाठी स्नेहसंमेलन आयोजित करत असते. शाळेसाठी स्नेहसंमेलन हा कार्यक्रम एखाद्या दिमाखदार सोहळ्यासारखा असतो. या कार्यक्रमात शाळेच्या शिक्षक-शिक्षिका, सर्व कर्मचारी, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य, मुलांचे पालक आणि आमंत्रित केलेले पाहुणे उपस्थित असतात. या सर्वांसमोर मुले विविध कार्यक्रम शानदारपणे सादर करत असतात.
या कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षिकावर्ग आणि सेविकावर्ग मेहनत घेत असतात. प्रत्येक मुलाने रंगमंचावर येऊन काहीतरी सादर करावे, यासाठी शिक्षिका प्रयत्नशील असतात. या उपक्रमात पालकांकडून सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. पालकांनी मुलाला कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे तसेच आवश्यक सरावादरम्यान सदैव हजर ठेवावे.
स्नेहसंमेलनात शाळेच्या वर्षभरातील विविध उपक्रमांचा समावेश असलेला अहवाल सादर करण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम देखील असतो. अहवाल सादर करण्यासाठी शिक्षिका निरीक्षणातून काही मुलांची निवड करत असते. मुलांकडून अहवालाच्या विविध भागांचे पाठांतर करून घेतले जाते. यासाठी संबंधित पालकांचे सहाय्य घेतले जाते. पालकांनी मुलांकडून पाठांतर व्यवस्थित करून घ्यावे. सर्वांच्या सक्रिय सहभागातून मुलांनी सादर केलेले सर्व कार्यक्रम विशेष करून अहवालवाचन खरोखरच कौतुकास्पद होतात.
शाळेच्या वार्षिक सहल आणि स्नेहसंमेलन या कार्यक्रमातून मुलांमधे विविध सद्गुण तसेच चांगल्या सवयी जोपासल्या जातात आणि यामुळे मुलाचा सर्वांगीण विकास साधणे सुकर होते.
वास्तविक, शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी हा विषय व्यापक आहे. आपण एकूण चार लेखांच्या माध्यमातून पालकांच्या जबाबदारीविषयी निवडक मुद्दे जाणून घेतले. पालकांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास मुलाची शैक्षणिक प्रगती तसेच सर्वांगीण विकास निश्चित आहे.
क्रमश:
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाईल – 9881943593