मी काही कुणाच घोडं मारत नाही की कुणाला हत्तीच्या पायदळी देत नाही. त्यामुळे आमच्या फॅक्टरीमध्ये मी सर्वांना आवडते.
पण हल्ली फॅक्टरीत गेले की विचित्रच अनुभव येतो.
अहोंशी बोलताना त्यांना म्हटलं,” मुलं हल्ली असं काय करतात हो? माझ्या डोळ्याला डोळा देत नाहीत. मी आल्यावर इकडे तिकडे सैरावैरा पळतात. काहीतरी फालतू काम काढून केबिन मधून नाहीसेच होतात. मी इथे असले तर त्या टोकाला निघून जातात आणि मी तिकडे असले तर चक्क वरच्या मजल्यावर पळतात. काय चाललंय काय हे?”
अहो विचारमग्न होऊन माझ्याकडे थोडावेळ बघत बसले. मग म्हणाले,” तुला खरंच माहिती नाही?’
मी अस्वस्थ झाले. असं काय घडलं होतं जे मला माहिती नाही! ” खरंच मला माहिती नाही हो. काय झालंय?”
“आपण आत आलो तेव्हा मुख्य दारापाशीच अशोक भेटला.”
“हं!”
“तो तुला Good morning म्हणाला.”
“हं!”
“हं ..काय! त्यावर तू त्याला काय म्हणालीस?”
“काय म्हणाले?” मला खरंच काही आठवत नव्हतं.
हेही वाचा – आठवणींची पेटी… आकाशफुले
मी नेहमी जबाबदारीपूर्वक वागत असते. त्यामुळे मी काही बेजबाबदारपणे बोलले असेन असं मला वाटत नव्हतं.
“कोणी जर Good morning म्हणालं तर आपण काय म्हणायचं असतं?”
हे अगदी बिगरीतले प्रश्न झाले.
“फटाफट सांगा बरं नक्की काय झालं ते. इकडे माझं BP वाढायला लागलंय. (हे कारण मला हल्ली खूप छान मिळालं आहे. नको असणारे विषय बदलायला, समोरच्याला थांबवायला मी या वाक्याचा वारंवार उपयोग करून घेत असते.)
“अगं तू त्याला म्हणालीस, माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राइब करायचं तसंच फेसबुकवरील पोस्ट लाईक करा, कमेंट करा!” .”
म्हणाले होते खरं मी असं!
हेही वाचा – काय पण एकेक आठवणी असतात!
“तुझ्या एक लक्षात आलंय का हल्ली ड्रायव्हरपासून सिक्युरिटीपर्यंत सर्वच तुझ्यापासून पळ काढत असतात. पूर्वी दूधवाला घरात दुधाच्या पिशव्या आणून द्यायचा. तुझ्याशी चार गप्पा मारून जायचा. हल्ली तो पण गेटपाशी पिशव्या देऊन जातो. ज्याला त्याला सांगतेस “फेसबुक वरच्या पोस्टला लाईक करा, कमेंट करा!”
“मग काय झालं सांगितलं तर. हल्ली सगळे सोशल मीडियावरच तर असतात. जर त्यांना समजत नसेल तर सांगायला नको?”
“पण असं? जिझिया कर लावल्यासारखं?…… सांगायचं असेल तर सांग प्रत्येकाला. परिणाम तर तुला दिसताहेतच.”
खरंच परिणाम काही चांगले दिसत नव्हते. बदल तर करायलाच हवा. आणि तो देखील स्वत:मध्येच. ….
आपल्याला कधीच दुसऱ्यांना बदलता येत नाही. स्वतः बदलावं!
काय करावं बरं??
हां! आयडिया !
आता यापुढे नवीन भरतीच्या वेळी नेमणूक पत्रातच एक clause घालायचा…” सुरेखा मॅमच्या फेसबुक वरील प्रत्येक पोस्ट लाईक करून त्यावर कमेंट करायची!
हुश्श! जीव अगदी भांड्यात पडला. ही आयडिया मला आधीच का बरं सुचली नाही?


