स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स –
- भाजीसाठी कोथिंबीर आवश्यक असते. पण उन्हाळ्यात पाहिजे तेव्हा ती मिळतेच असे नाही. त्यासाठी जेव्हा स्वस्त मिळेल तेव्हा जास्त प्रमाणात घ्यावी आणि निवडून ठेवावी. नंतर चिरून थोडे गोडेतेल लावून वाळवावी आणि डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरावी. जेव्हा भाजीत टाकायची असेल तेव्हा वाटीत पाणी घेऊन त्यात हवी तेवढी घ्यावी. पाच मिनिटे पाण्यात ठेवावी आणि धुऊन भाजीत टाकावी. याप्रमाणे कढीलिंबसुद्धा वाळविता येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : कढीपत्त्याची चटणी, कोकम सार…
- सकाळी भाजी-आमटी (स्वयंपाक) करताना रोजच्या अंदाजाने थोडी जास्त फोडणी करून ठेवावी म्हणजे पदार्थात घालताना दर वेळी पातेले तापवून फोडणी करण्याचा त्रास होत नाही आणि झटपट फोडणीभात वगैरे गोष्टी कराव्या लागल्या तर करता येतात. थोड्या प्रमाणातसुद्धा म्हणजे थोडासाच भात फोडणी घालून द्यायचाय मुलांना डब्यात, अशा वेळी तयार फोडणी वापरून भातात कालवून गरम तव्यावर ताटलीत घालून ठेवल्यास छान भात तयार होतो.
- एखादे वेळी दही आदल्या दिवशी लावायचे विसरले जाते, अशा वेळी सकाळी दुधाला विरजण लावावे आणि ते भांडे दुसऱ्या डब्यात ठेवून झाकण लावून तो डबा उन्हात ठेवावा, दोन-अडीच तासांत जेवणाच्या वेळेपर्यंत दही तयार होते. वृद्ध आणि आजाऱ्यांना हे दही पथ्थ्यकर आहे. कारण ते आंबट होत नाही. नंतर फ्रीजमध्ये ठेवावे म्हणजे थंड राहील आणि घट्टपणा येईल.
हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस…
- राहिलेले जास्तीचे लोणी फ्रीजमध्ये ठेवू नका, त्यालाही वास येतो. त्याकरिता लोणी बटरपेपरमध्ये गुंडाळून पॉलिथिन बॅगमध्ये ठेवावे आणि ही पिशवी बर्फाच्या कप्प्यात म्हणजेच फ्रीझरमध्ये ठेवावी. हे लोणी दोन महिने चांगल्या स्थितीत राहते. पाहिजे तेव्हा बाहेर काढून कढवता येते. लोणी कढवताना सुरुवातीपासून उलथण्याने कढईच्या तळाला खरडत रहावे. बेरी अजिबात खाली चिकटत नाही. तूप गाळल्यावर बेरीत पिठीसाखर मिसळून पोळीबरोबर चांगली लागते.


