Saturday, September 6, 2025

banner 468x60

Homeललितआईवडिलांचे ऋण...

आईवडिलांचे ऋण…

सतीश बर्वे

नीळकंठ टॉवरच्या क्लब हाऊसमधला योगासनाच्या क्लासेसचा वर्षपूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मोठमोठे उद्योजक आणि खासगी तसेच सरकारी आस्थापनातील उच्चपदस्थांनी भरलेल्या या टॉवरमध्ये योगासने शिकायला कोणी येईल, यावर कौस्तुभचा विश्वास नव्हता. पण मी त्याच्या वडिलांना म्हणजे अण्णांना यासाठी तयार केले आणि वर्षभरातच इतिहास घडला. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारिरीक तंदुरुस्तीसाठी योगासनांचे महत्त्व पटवून देण्यात अण्णा यशस्वी झाले आणि बघता बघता कोकणातून आलेल्या अण्णांचं नाव आमच्या टॉवरमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. एकही पैसा खर्च न करता आणि कुठेही लांब न जाता मिळणारं योगासनांचे शास्त्रशुद्ध शिक्षण इथल्या लोकांना पसंत पडलं.

कार्यक्रम संपल्यावर मी घरी जायला निघालो होतो, इतक्यात कौस्तुभची हाक कानावर आली, “काका…, रात्री जेवण झाल्यावर थोडावेळ गार्डनमध्ये याल का? थोडं बोलायचं आहे…”

“ठीक आहे,” असं म्हणून मी घरी गेलो. साधारण दोन वर्षांपूर्वी माझं आणि कौस्तुभचं झालेलं बोलणं मला आठवलं. माई आणि अण्णांचा एकुलता एक मुलगा होता कौस्तुभ. पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार. शालांत परीक्षेत जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पुढे मुंबई आयआयटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय कंपनीतील मुंबई ब्रँच ऑफिसमध्ये उच्चपदस्थ. इथे आमच्या टॉवरमध्ये पाच खोल्यांचा प्रशस्त फ्लॅट. कोकणात एकटे रहाणाऱ्या माई आणि अण्णांना मुंबईला आणण्यासंबंधी मी त्याला सुचवलं होतं. पण ते मला कठीण जाईल, असं कौस्तुभने उत्तर दिलं होतं.

नक्की काय कठीण होतं त्यात, हे मला समजत नव्हतं. त्यादिवशी मी विषय ताणला नाही तरी तो विषय माझ्या डोक्यातून जात नव्हता. शेवटी मनाचा हिय्या करून दोन आठवड्यांनी मी कौस्तुभबरोबर यावर सविस्तर बोललो.

हेही वाचा – कलियुगातील सावित्री

“आईवडीलांना सांभाळणं कुठल्याच मुलाला कठीण नसतं. उलट, त्यांची सेवा करण्याची संधी ही परमेश्वराने दिलेला प्रसाद समजून त्या संधीचं सोनं करायचं असतं. अरे, ज्यांनी तुझ्या जन्मापासून तू आयुष्यात स्थिरावेस्तोवर जीवाचे रान करून तुला सगळं दिलं, ही सुद्धा त्यांच्या दृष्टीने सोपी गोष्ट निश्चितच नसणार. पण कठीण आहे म्हणून त्यांनी ती कधी अर्धवट सोडून नाही दिली. उलट, दोघांनीही वैयक्तिक सुखांवर पाणी सोडत तुला सगळं मिळवून दिलं असणार! आईवडिलांचे पांग फेडण्याची संधी देवाने आयती दिली आहे. त्यांना मुंबईमध्ये घेऊन ये. मोठं घर आहे तुझं… त्यांची वेगळी खोली होईल… तुझ्या डोळ्यांसमोर रहातील ते. थोडे दिवस काय काय करू, असं होईल; पण अण्णा नक्की मार्ग काढतील यातून…”

हो नाही हो नाही करता, एक दिवस कौस्तुभ माई आणि अण्णांना घेऊन मुंबईला आला. पुढच्या दोन आठवड्यांतच योगायोगाने अण्णांना योगासने शिकवण्यासाठी काही सभासदांनी विचारलं. पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून अण्णांनी आमच्या क्लब हाऊसमध्ये योगासने शिकायला सुरुवात केली आणि वर्षभरातच शिकणाऱ्यांची संख्या शंभरच्या पुढे गेली.

000

ठरल्याप्रमाणे मी आणि कौस्तुभ गार्डनमध्ये भेटलो. कौस्तुभनेच बोलायला सुरुवात केली.

“काका, खूप खूप धन्यवाद… दोन वर्षांपूर्वी तुम्ही इतक्या पोटतिडकीने मला समजावलं म्हणून धीर करून मी माई आणि अण्णांना मुंबईत माझ्या घरी आणलं. सुरुवातीला सोनियाला त्यांच्यासोबत रोजचे व्यवहार करताना खूप त्रास होत होता. पण मी तिला समजावून सांगितलं आणि तिने देखील माझं ऐकलं…” मधे दोन क्षण थांबून तो पुन्हा बोलू लागला, “तुम्ही म्हणालात तसंच झालं. अण्णांना योगासने शिकवायचं काम मिळालं आणि माई कोकणातील खाद्यपदार्थ बायकांना शिकवू लागली. फार पटकन दोघांनीही इथल्या वातावरणात स्वतःला जुळवून घेतलं. आज इथे आपल्या टॉवरमध्ये माई अण्णांना माझ्यापेक्षा जास्त माणसं ओळखतात आणि मान देतात.”

“कौस्तुभ, अरे मी कोणी मोठा माणूस नाही. पण लहान वयात तू तुझ्या कंपनीत मिळवलेले उच्चपद माझ्यासाठी कायम कौतुकाचा विषय होता. पण या तुझ्या वैभवात उणीव भासत होती तुझ्या माई अण्णांची! हिंमत करून आणि नेहमीच्या मर्यादा ओलांडून मी तुला त्याबाबत समजावून सांगितलं आणि तू सुद्धा शांतपणे विचार करून माझी विनंती मोठ्या मनाने अंमलात आणलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन!”

हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…

मी म्हणालो, “एक लक्षात ठेव, तू पोटात असल्यापासून तुला जन्म देण्यापर्यंतचा काळ सर्वात कठीण असतो आपल्या आईच्या आयुष्यात… पण त्या इवल्याशा जीवासाठी ती सगळं सहन करते आणि त्या जीवाला जगाच्या शाळेत प्रवेश देते. त्या दिवसापासून पुढे बरेच कठीण प्रसंग आईवडिलांच्या आयुष्यात त्या जीवाला मोठं करताना येतात. पण तो जीव आईवडिलांच्या काळजाचा तुकडा असतो. म्हणूनच, त्या प्रत्येक कठीण प्रसंगाला आईवडील मोठ्या हिमतीने तोंड देतात, त्या जीवाला मोठं करून आयुष्यात स्थिर करण्यासाठी! त्याच आईवडीलांना त्यांच्या उतारवयात सांभाळणं मुलाला कधीच कठीण नसतं. तर कठीण असतं त्यांचा त्याग विसरणं. कठीण असतं त्यांचं प्रेम विसरणं. आईवडिलांच्या सेवेसाठी मुलांच्या शब्दकोशात कठीण या शब्दाला कधीच जागा नसते. आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी एक जन्मदेखील पुरत नाही मुलांना…”

कौस्तुभ शांतपणे ऐकत होता. मी पुढे म्हणालो, “पण, तू माझं बोलणं योग्य समजून योग्य तो निर्णय घेतलास. अण्णांना योगासने शिकवण्याची संधी मिळाली. या सर्व ‘योगायोगा’च्या जुळून आलेल्या गोष्टी आहेत, हे एव्हाना तुझ्या लक्षात आलं असेलच…,” असं सांगून त्याचा निरोप घेण्यासाठी म्हणालो, “चला उशीर झालाय. मी निघतो आता…”

मी बाकावरून उठलो. माझ्या मागून कौस्तुभ देखील उठला. एकमेकांना शुभरात्री म्हणून आम्ही आपापल्या घराकडे वळलो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!