आठशेहून जास्त पाने असलेली विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ कादंबरी हातात घेतल्यावर वाचायला भरपूर वेळ लागणार, असे वाटते; पण वाचायला सुरुवात केल्यावर जाणवत नाही. वाचताना मनाला खूप त्रास होतो, वेदना होतात.
पानिपतचे युद्ध मराठ्यांच्या इतिहासातले सगळ्यात गाजलेले युद्ध. या युद्धामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले. हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते तर, सत्ता इंग्रजांच्या हातात गेली नसती, असे अभ्यासकांचे मत आहे. पानिपत म्हटले की, ‘दोन मोत्ये गळाली, सत्तावीस मोहरा हरवल्या आणि खुर्दा किती गेला गणतीच नाही’ हे वाक्य आठवते किंवा ‘पानिपत पानिपत तुमची आमची गेली पत’ हे आठवते. पण ही कादंबरी वाचल्यावर आपण विचार करू लागतो. इतिहासकारांनी संशोधन करून पानिपत का घडले आणि मराठे का हरले, याची कारणे नमूद करून ठेवली आहेत.
मराठ्यांच्या इतिहासातले हे महत्त्वाचे युद्ध असल्याने त्यावर लेखनही मुबलक झाले आहे. लेखकाने या युद्धाची पार्श्वभूमी कादंबरीच्या सुरुवातीला सांगितली आहे. त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. ऐतिहासिक तथ्य जाणून घेऊन त्यांना रंजकतेने सुसंगत सादर करण्याचे काम जिकीरीचे आहे. त्याचबरोबर त्या काळची मराठी भाषा, अब्दाली, नजीब वगैरेंची अफगाणी स्वादाची भाषा, राजपुताना, जाट लोकांची भाषा बारकाईने अभ्यासून पात्रांचे संवाद लिहिले आहेत.
इतिहासात जराशीही चूक होऊ न देण्याची जबाबदारी आहे; अन्यथा टीकेला सामोरे जावे लागते. इतिहासकारांत मतेमतांतरे असतातच. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंतचा भूगोलही लक्षात घ्यायला लागला. तसेच रूढी, परंपरा, कर्मकांड, श्रद्धा, देवस्थाने, पुराणे वगैरेंचा लोकांवर असलेला पगडा समजून घ्यायला लागला. कादंबरीच्या शेवटी टिपणे दिली आहेत आणि नकाशे आहेत. लेखकाने कादंबरीच्या माध्यमातून इतिहास समजून सांगितला आहे. मुखपृष्ठावर एका हातात तलवार आणि एका हातात भाला घेतलेले सदाशिवराव भाऊ आहेत. घोड्यावर बसून ते लढाई करत आहेत. चित्र इतके जिवंत आहे की, घोड्याचा वेग, भाऊंचा जोश आपल्यापर्यंत पोहोचतो.
पानिपत ही दुखरी नस असल्यामुळे या विषयावर कादंबरी लिहिण्याचे काम कठीण होते. तरीही लेखकाने हे आव्हान समर्थपणे पेललेले आहे. असे लेखन करण्यासाठी लेखक जन्मावा लागतो, त्याच्या मेंदूत लेखकाची चिप असावी लागते.
1758 सालात मराठी सत्ता यशाच्या शिखरावर होती. दिल्लीत मराठ्यांनी नामधारी बादशाह बसवला होता. मराठ्यांनी अहमदिया करार केलेला होता. कादंबरीची सुरुवात होते, ती ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणणाऱ्या दत्ताजी शिंदे यांच्या नजीबबरोबर झालेल्या लढाईने. नजीब शरण आल्यामुळे त्याला मानसपुत्र मानून मल्हारराव त्याला पाठीशी घालतात. पुढे हाच नजीब उलटतो, अब्दालीला हिंदुस्थानात बोलावून घेतो आणि बुराडी घाटावरच्या युद्धात दत्ताजींची निर्घृण हत्या करतो. हे वर्णन वाचताना डोळ्यात पाणी येते, त्याचबरोबर दत्ताजींच्या शौर्याची कमाल वाटते. नजीब सर्व मुसलमानांना धर्माच्या नावाखाली एकत्र करतो. अब्दाली आणि नजीब दोघांचे सैन्य एकत्र येते. नजीब सर्वात धूर्त, पाताळयंत्री आणि महत्वाकांक्षी होता.
हेही वाचा – Bookshelf : सुख आणि आनंद यातला फरक दर्शविणारी ‘ययाती’ कादंबरी
यापुढे मोहिमेची तयारी सुरू होते. रघुनाथरावांनी अटकेपार झेंडे लावलेले असले तरी, त्यातून मराठी दौलतीवर कर्जाचे डोंगर उभे राहिले होते. त्यामुळे त्यांना मोहिमेवर न पाठवता शिस्तप्रिय, मुत्सद्दी सदाशिवराव भाऊंना पाठवायचा निर्णय घेतला. सतरा वर्षांच्या कोवळ्या विश्वासरावांना केवळ गोपिकाबाईंच्या हट्टापायी मोहिमेवर पाठवले. घरगुती कलह, वादविवाद, राजकारण या अडचणींतून मार्ग काढावा लागला.
भाऊंनी मुत्सद्देगिरीने, कुशलतेने सैन्याची जमवाजमव केली. अब्दालीशी नव्या युद्धपद्धतीने लढावे लागेल हे जाणून इब्राहीमखान गारदी लष्करात सामील करून घेतला. त्याला फ्रेंच पद्धतीच्या तोफा चालवता येत होत्या. त्याने दिलेला शब्द पाळला. शेवटपर्यंत साथ दिली. अयोध्येच्या सिराजुदौलाने मात्र मराठ्यांची साथ सोडली.
त्याकाळी लष्कराच्या बरोबर इतर लोकही देवदर्शनासाठी, यात्रेसाठी जात असत. भाऊंच्या बरोबर असे बरेच लोक जायला निघतात. त्यांना नकार देता येणे शक्य नव्हते, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या असत्या. परंतु कर्जात बुडालेली मराठी सत्ता मोहिमेवर निघाल्यावर सैनिकांबरोबर इतक्या लोकांचा खर्च कसा चालवणार? हा बिकट प्रश्न असतो. इतक्या लोकांच्यामुळे चाल मंदावते. सूरजमलने सल्ला दिला होता की, या सर्व लोकांना त्याच्याकडेच्या किल्ल्यात ठेवावे, पण भाऊंनी त्याचा सल्ला मानला नाही किंवा ते मानू शकले नाहीत.
अब्दालीने मराठ्यांची रसद तोडली, त्यांची अन्नान्न दशा झाली. जनावरे मरू लागली. पुण्यात श्रीमंत पेशव्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे इतरांचे फावले. गोपिकाबाई, सखाराम बापू वगैरे मंडळी आधीपासूनच भाऊंच्या विरोधात होती. भाऊंनी कुंजापूर जिंकल्यामुळे अन्नधान्याची आणि पैसा अडक्याची सोय झाली. कुतुबशाहाला मारून दत्ताजीच्या वधाचा जनकोजींनी सूड घेतला. पण यामुळे अब्दालीने आक्रमण करायचे ठरवले. यमुना पार करण्याचे अशक्यप्राय वाटणारे काम केले. मराठ्यांचे सैन्य पानिपतला आल्यावर इथली बहुसंख्य प्रजा मुसलमान आहे, हे लक्षात आल्यावर भाऊंनी स्थानिकांना बोलावून त्यांचे नुकसान न करण्याचे वचन दिले. ही महत्त्वपूर्ण खेळी होती. एकदा भाऊ पार्वतीबाईंना म्हणतात, पानिपतची आमची ही मोहीम काही औरच आहे. मराठी मातीच्या सर्वोच्च सद्गुणांचा आणि दुर्दैवी दुर्गुणांचा हा सुंदर मिलाफ आहे.
सदाशिवराव भाऊ बोरूबहाद्दर नव्हते, तर सोळाव्या वर्षांपासून युद्ध करत होते. मराठ्यांच्या स्त्रिया आधीपासूनच त्यांच्याबरोबर मोहिमांवर जात होत्या, असे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत, जे या कादंबरीत मांडलेल्या मतांविरुद्ध आहेत.
युद्धाचे वर्णन बारकाव्यांसकट केले असल्याने डोळ्यांसमोर ते उभे राहते. वर्णन इतके थरारक आहे की, कित्येकदा वाचवत नाही. मृत्यूचे तांडव म्हणजे पानिपत! लष्कराबरोबर आलेले निरपराध बुणगे मारले गेले आणि स्त्रिया अब्दालीच्या सैनिकांनी पकडून नेल्या. इब्राहीम गारदी शत्रूच्या हाती जिवंतपणीच पडला. जनकोजी शिंदेसुद्धा! विश्वासराव मृत्युमुखी पडल्यावर भाऊ भावनाविवश झाले. त्यांच्यावर या तरूण पेशव्याची जबाबदारी होती. लेखकाने भाऊंच्या शवाचे क्रियाकर्म केले गेले, असा स्पष्ट उल्लेख केला आहे. पार्वतीबाई मात्र आयुष्यभर भाऊंची वाट पाहत राहिल्या.
अब्दाली हरत असलेली लढाई जिंकला होता. त्याचेही खूप नुकसान झाले होते. युद्ध संपल्यावर जे घडले त्याचेही वर्णन लेखकाने केले आहे. यात समशेरबहाद्दर, पार्वतीबाई, नाना फडणवीस, जनकोजी वगैरे जिवंत राहिलेल्यांचे पुढे काय झाले, हेही कथेच्या ओघात येते. पुण्यात नानासाहेबांना पानिपतची खबर उशिरा कळते, त्यानंतरचा त्यांचा शोक, वाड्यावर पसरलेली अवकळा याचेही हृदयद्रावक वर्णन आहे.
हेही वाचा – Bookshelf : ‘स्वामी’… कालजयी कादंबरी
युद्धाचा सांगोपांग विचार केलेला दिसतो. युद्ध हरण्याची कारणे सांगताना मराठ्यांची चांगली बाजू तितक्याच ठळकपणे दाखवली आहे. आठवडाभर अर्धपोटी असलेले सैनिक, जनावरे सगळेच त्वेषाने लढले… पराक्रमाची शर्थ केली. भाऊंनी नेतृत्वात कुठलीही कसर सोडली नाही. अब्दालीने बेगमांना परत पाठवण्याची तयारी केली होती. स्वतः पळून जाणार होता. मराठे युद्ध हरले तरी, त्यांनी रणांगणातून पळ काढला नाही. जे युद्ध सोडून निघून गेले त्यांच्याबद्दलही लेखकाने लिहिले आहे. त्यांची बाजू मांडली आहे आणि त्यांचा पश्चात्ताप सुद्धा!
नजीब ज्याने आपल्या महत्वाकांक्षेपायी अब्दालीला बोलवून घेऊन हे युद्ध घडवून आणले, तो युद्ध संपल्यावर म्हणतो, देशाच्या रक्षणासाठी बोंब मारूनही कोणी पुढे येणार नाही, पण धर्मरक्षणाचा आव आणला की, शहाणी जनता क्षणार्धात पागल बनते.
पानिपतमध्ये एक पिढी नष्ट झाली, असे म्हटले जाते. अपरिमित जीवितहानी झाली. लाख बांगडी फुटली. ही कादंबरी वाचल्यावर या युद्धाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपल्या सैनिकांबद्दल आदर वाटतो, अभिमान वाटतो. तसेच, माणसात इतके क्रौर्य कुठून येत असेल असेही वाटत राहते. नजीब सत्तेबद्दल म्हणतो, पातशाह म्हणजे काय? वेलबुट्टीची टोपी आणि त्यात खोवलेला बाजारातला शिरपेचच नं? तख्त म्हणजे काय? चंदनाच्या लाकडावर ठोकलेला सोन्यारुप्याचा पत्राच नं? हे सत्य असूनही याच सत्तेसाठी जगभर युद्धे होतात. माणसाचा इतिहासच युद्धांचा इतिहास आहे. अजूनही युद्धे सुरूच आहेत. इतिहासाकडून आपण कधी शिकणार?


