शैलेश विजया सोमनाथ महाजन
एकीचे बळ हे विविध स्वरूपातील गोष्टीरूपाने आपल्याला लहानपणापासून सांगितले गेलेले असते. म्हणजेच काय तर एकीचा फायदा आपल्याला कळत असतो. पण ही एकी कशा स्वरूपात असावी, हे आपल्याला मोठे झाल्यावर विविध संघटनांच्या कार्यामुळे, वेळोवेळी लक्षात येते.
संघटना हा शब्द उच्चारला की, आदर, दरारा, आपलेपणा, आपुलकी, भीती… आपण एकटे नाही, आपल्याबरोबर कोणीतरी आहे… आपल्या पावलाबरोबर पाऊल टाकणारे कोणीतरी आहे… साथीला साथ आहे… किंवा समोरचा एकटा नाही तर त्याच्याबरोबर त्याची संघटना आहे… अशा विविध भावना सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असतात.
सर्वसाधारणपणे बहुतांश प्राणी हे एकत्रित म्हणजेच समूहाने राहतात. म्हणजे, त्यांची आपापसात कुठेतरी सांगड असतेच. मनुष्य हा सुद्धा समूहप्रिय आहे. तो नेहमी गटागटाने किंवा समूह करून राहतो. सम आचार-विचार, राहणीमान असलेली लोकं एकत्र राहणं पसंत करतात. त्यामुळे मानवाच्या मनामध्ये सांघिक भावना ही दडलेली असतेच. काही कारणांनी आपण, आपल्याला वैयक्तिकदृष्ट्या स्वतंत्र समजतो आणि इतरांपासून तुटतो. काही कारणांनी आपली सांगड आपल्या समूहाशी तुटते. तसेच काही वेळा परिस्थितीने नवीन समूह स्थापन होऊन, त्यांच्याशी संघभावनेने, व्यावहारिक दृष्टिकोनातून एकत्र राहावे लागते.
आपण संघभावनेने एकत्रित राहून आपल्या जगण्याच्या नैसर्गिक वा मानवी मूलभूत गरजा भागवत असतो. या गरजा सामजिक, वैयक्तिक, मानसिक का असोनात! या गरजा भागवण्यासाठी आपली वैयक्तिक कार्यशक्ती कमी पडली, तर आपल्यातली सांघिक भावना जागृत होते. जसे आजारी पडलो की, डॉक्टरची आठवण होते. तसाच हा काहीसा प्रकार आहे.
हेही वाचा – Technology Vs Manpower : तंत्रज्ञानाचा भस्मासुर
मानवतेच्या दृष्टिकोनातून असलेल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी समविचाराने, संघभावनेने एकत्र आलेल्या लोकांच्या या समूहाला आपण ‘संघटना’ म्हणू शकतो.
आपल्या या संघटनेने दुसऱ्याच्या मूलभूत गरजांचा पण मान राखला पाहिजे, त्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे. आपल्या संघटनेमुळे, दुसऱ्यांचे हक्क डावलले जाणार नाहीत याकडे दक्षतेने पाहिले पाहिजे.
अनेकदा चांगल्या उद्दिष्टाने स्थापन झालेली एखादी संघटना नंतर आपल्या मूळ उद्दिष्टांना विसरून दबावतंत्र अवलंबते. वेगळ्याच दिशेने जाते. वेळ प्रसंगी हीच संघटना दादागिरी किंवा गुंडगिरीच्या वळणावर जाऊन ठेपते, असा अनुभव आपल्याला बऱ्याच वेळेला येतो. म्हणजेच कोणतेही संघटन, संघटनेने वेळोवेळी चिंतन शिबिर आयोजित करून, आपले संघटन योग्य दिशेने चालले आहे का? आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत ना? याचे चिंतन करणे अत्यंत आवश्यक ठरते.
आपण लावलेल्या संघटनेच्या रोपट्याचे रूपांतर महावृक्षात होण्यासाठी, संघटनेचे आधारस्तंभ मजबूत विचारसरणीचे हवेत. परिपक्व पाहिजेत. तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी वेळोवेळी योग्य चिंतन शिबिरात तसेच विविध अभ्यासवर्गात जाणे आवश्यक आहे. कुठे तरी ट्रेनिंग आवश्यक आहे. नाहीतर आपण लावलेल्या संघटनेच्या रोपट्याचे रुपांतर विषवृक्षात होण्यास वेळ लागणार नाही. एक सडका आंबा आंब्याची अख्खी पेटी नासवतो, या म्हणीप्रमाणे एक सडका सदस्य, कार्यकर्ता अख्खी संघटना, पक्ष नासवू शकतो. श्रेष्ठींनी यावर सतत लक्ष देणे आवश्यक आहे. तिथे नियम हे कडकच पाहिजेत. ताबडतोब उपाययोजना झालीच पाहिजे.
हेही वाचा – Technology Vs Manpower : तंत्रज्ञान वापराबाबत स्वनियमनाची गरज
मुख्य म्हणजे संघटनेत, समर्पणाची भावना हवी. एकमेकांबद्दल आग्रही भूमिका नसून, आदर हवा. संघटनेत एकमेकांबद्दल भीती नसून भरोसा हवा. नियम, सूचना नसून स्वयंशिस्त हवी. संघटनेकडून कोणाचेही शोषण न होता पोषण झाले पाहिजे.
आपापसात नुसताच संपर्क नसून संबंध हवा. एक परिवार म्हणून भावना पाहिजे. संघटनेतील सर्वजण नुसतेच व्यग्र नसून त्यांना शिस्त हवी. खोटेपणा नसून मोठेपणा हवा. वैयक्तिक अभिलाषा नसून संघटना वाढीची इच्छा हवी. संघटनेला मुख्य म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाण हवी. संघटनेची एक नीतिमत्ता पाहिजे. एक कार्यप्रणाली पाहिजे आणि त्याचे अनुकरण झाले पाहिजे.
संघटन कसे करावे? याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री प्रभू रामचंद्र यांचे देता येईल. खल प्रवृत्तीविरुद्ध उभे राहिले, तेव्हा त्यांच्याबरोबर ना राज्य होते, ना सेना होती, ना सेनापती! सर्व उभे करावे लागले. अगदी सर्वच. हे आपणास माहीतच आहे. मग तसाच अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी राम आचरणातच आणायला हवा.
असेच एक उत्तम उदाहरण म्हणजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे देता येईल. मावळ्यांना गोळा करून त्यांनी त्यांच्यात स्वराज्याचा स्फुल्लिंग चेतवला आणि एक देदिप्यमान इतिहास घडवला.
ज्यांचा संबंध संघटक, संघटना, समाजकारण, राजकारण, नेतेपणा, पुढारीपणा याबाबत आहे, त्याने प्रत्येकाने छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे….. तसेच श्री प्रभू रामचंद्र यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
मोबाइल – 9322755462