डॉ. प्रज्ञावंत देवळेकर
आपल्याकडं अनेकदा लोक अशी चर्चा करतात की ‘डॉक्टर’ म्हणजे जणू एक वेगळीच स्पिशिज आहे… ते कधी आजारी पडतच नाही किंवा औषधोपचार म्हणजे पेशंटवर प्रयोगच वगैरे वगैरे.. पूर्वी लोकं खिळा टोचला तरी मरायचे आणि डास चावला तरीही! पण अनेकांच्या अथक प्रयत्नातून, वैद्यकशास्राच्या प्रगतीमुळं मानव समूह तुलनेत कितीतरी अधिक सुरक्षित झालाय. आज अशाच एका धाडसी डॉक्टरची गोष्ट सांगतो…
ऐंशीच्या दशकात अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या वेटिंगरूममध्ये पोटदुखीचे पेशंट मोठ्या प्रमाणात असायचे. जठराला अल्सररूपी जखम झालेली असायची, त्यामुळं काही खाल्लं तरी पोट दुखायचं आणि उपाशी राहिलं तरी पोट दुखायचं. वेदनाशामक (Painkillers) तरी किती खायचे? डॉक्टर मंडळींनी या अल्सरचं नामकरण ‘स्ट्रेस अल्सर’ असं केलं होतं!
मानसिक ताणतणाव, कुपथ्य आणि जागरण म्हणजे या आजाराला निमंत्रण… थंड दूध, पित्तशामक औषधं आणि मोजका आहार हा त्यावर उपाय…! सगळं करूनही लोकं पुन्हा पुन्हा पोटदुखीमुळं दवाखाने गाठत होती.
एका छोटेखानी रुग्णालयातल्या एक तरुण डॉक्टरच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी वळवळत होतं, ”ताणतणाव तर असेलच, पण तळाशी काहीतरी जिवंतही नक्कीच असेल!” आपल्या एका पॅथॅालॅाजिस्ट मित्राच्या मदतीनं पठ्ठ्यानं अशा रुग्णांच्या जठराच्या पेशी जमा करून तपासल्या आणि युरेकाऽऽऽ तिथं त्याला चक्क सर्पिलाकृती जिवाणू दिसले!!
हेही वाचा – …यह तो अलगही ‘केमिकल लोच्या’
“छ्याऽऽ जठरातल्या आम्लामुळं जीवाणू पोटात जिवंतच राहू शकत नाही…” सगळ्यांनी हसत हसत त्याचं म्हणणं सपशेल नाकारलं.
“मान्य आहे आम्ल प्रचंड कटूये, पण हे बारके शत्रू मात्र त्यात राहू शकतात!” तो आपल्या मांडणीवर ठाम होता… “अल्सर तणावांमुळं नाही तर, संसर्गामुळं होतात,” त्यानं आत्मविश्वासानं जाहीर केलं.
त्याच्या या धाडसी विधानामुळं वैद्यकजगतात हशा पिकला… “जीवाणू या ॲसिडमध्ये जिवंत रहातील का? मित्रा, तू विज्ञानात नाही परीकथांमध्ये रमतोयेस…” असं म्हणत सीनिअर्सनी त्याची प्रचंड खिल्ली उडवली.
त्याची निरीक्षणं बाद करण्यात आली… म्हणणं फेटाळण्यात आलं… संशोधन पत्रिकेला केराची टोपली दाखवण्यात आली…
एक आठवडा नैराश्यात गेला… मग गड्यानं उंदरावर प्रयोग केले, पण जिवाणू त्यांच्या पोटात जिवंत रहात नव्हते. महिनाभर डुकरावर प्रयोग केले, पण तिथंही तेच…! त्यानं आपल्या नोंदी ठेवलेल्या वहीकडं बघितलं आणि जीवाणूनं भरलेला प्याला तोंडाला लावला!!
हे बघून पलीकडच्या खोलीतून कुणीतरी किंचाळलं, ”एऽऽ, काय करतोयेसऽऽऽ?”
“विज्ञान…” आख्खा प्याला रिचवत तो उद्गारला!
दोन-चार दिवस काहीच झालं नाही, पाचव्या दिवशी मात्र आशेचा किरण दिसला… त्याला मळमळू लागलं, थकवा जाणवू लागला आणि मुख्य म्हणजे त्याचं पोटंही दुखायला लागलं! उलट्यांमुळं गडी अक्षरश: गलितगात्र झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसत होता…!
त्यानं आपल्या जठराची बायोप्सी केली आणि सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसावं? तेच सर्पिलाकृती जीवाणू…!!!
प्रतिजैवकं (Antibiotics) घेऊन तो बरा झाला, पण यावेळी तो काही बोलला नाही तर, यावर थेट एक पुस्तकच लिहिलं… संशोधकांना त्याची दखल घ्यावी लागली! विविध प्रयोग झाले, रुग्णांच्या तपासण्या झाल्या, निदान झालं आणि साध्या प्रतिजैवकांच्या उपचारानं ते बरेही झाले… भारंभार पथ्ये, थंड दूध, अँटासिड्सऐवजी अशा औषधांच्या वापरानं लाखो लोक पोटदुखीतून मुक्त झाले.
हेही वाचा – मन ‘आता’वर टिकून राहणं गरजेचं!
भावाला यासाठी ‘नोबेल’ जाहीर झालं… त्याचं नाव डॉक्टर बॅरी मार्शल… आणि ते सर्पिलाकृती जीवाणू म्हणजे एच. पायलोरी…
नोबेल घेऊन घरी परतल्यावर एका पत्रकारानं बॅरीला प्रश्न विचारला, “कसं वाटतंय?” “जग बदलावं म्हणून आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमचा ईगो आणि काही लाख जीवाणू गिळावे लागत असतील तर, कसं वाटेल?” मंद स्मित करत बॅरी पुटपुटला!


