शैलेश विजया सोमनाथ महाजन
फार पूर्वीपासून सोशल मीडिया वापरला जात होता! पण त्याची साधने वेगवेगळी होती. चांगल्या पद्धतीले समाजाने कसे जगले पाहिजे? किंवा समाजप्रबोधन हे सोशल मीडियाचे प्रमुख अंग. पूर्वी आपला सोशल मीडिया कसा होता, हे समजून घेऊयात!
जगातील सोशल मीडियाचे सर्वात प्रथम, उत्तम उदाहरण म्हणजे आपले, महर्षी ऋषी नारद मुनी. त्यांचा तिन्ही लोकी संचार! माहितीचे भांडार म्हणजे महर्षी नारद मुनी आणि विविध माहिती सगळ्यांना पोहोचविण्याचे कार्य ते करीत असत.
हां, आता कधी कधी नको ती माहिती, नको त्या ठिकाणी देऊन, महर्षी नारद मुनी त्या काळी वेगळीच परिस्थिती निर्माण करत असत, ही बाब वेगळी. गंमत म्हणजे, आता सुद्धा सोशल मीडियावरून कळत-नकळत असेच काहीसे आपण करीत असतोच की!
नंतरच्या काळात सोशल मrडियाचे स्वरूप बदलत गेले. आपले पहाटेचे वासुदेव, कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी तसेच यात येतो तो भारुड, पोवाडे हा प्रकार, गावोगावी जाऊन नाटक करणारे कलाकार, डोंबारी, नंदीबैल घेऊन येणारे, बहुरूपी, त्यानंतर आले दवंडी पिटणारे, मग आले पथनाट्य करणारे, लावणी कार्यक्रमात बतावणी करणारे, कोकणातील खेळे… हे अनेक ‘सोशल मीडिया’ पूर्वी होते. हे सर्वजण समाजाभिमुखच होते, समाजप्रबोधन करत होते. यांची सगळ्यांची कार्य करण्याची पद्धती वेगळी होती. पण या सर्वां त्या काळातील एक प्रकारे ‘सोशल मीडिया’च म्हणता येईल. पण तांत्रिकदृष्ट्या त्यांना काही मर्यादा होत्या. किती गावे फिरणार? किती प्रवास करणार? त्या काळी प्रवासाची साधने पण मर्यादित होती. तसेच यांच्या क्रिया आणि समाजाच्या प्रतिक्रिया याला मर्यादा होत्या. प्रत्यक्ष समोरासमोर, फेस टू फेस, असा हा काहीसा सोशल मीडियाचा प्रकार होता. याचे उदाहरण म्हणजे जर एखाद्या मंदिरात कीर्तन असेल, तर प्रत्यक्ष कीर्तनकारांसमोर बसलेला समूहच कीर्तन ऐकू शकायचा. अशा प्रकारच्या खूप मर्यादा होत्या. त्या काळी जे होते ते योग्य होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
हेही वाचा – Technology Vs Manpower : तंत्रज्ञानाचा भस्मासुर
बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचे स्वरूप बदलत गेले. लाऊड स्पीकर आला… रेडिओ आला… नंतर TV आला, विविध चॅनल्स आले… आणि सोशल मीडियाचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले. तरी या सर्व मीडियाला मर्यादा होत्याच. हा सर्व प्रकार एकतर्फी होता. जे प्रक्षेपित होईल, तेवढेच. त्यावर ताबडतोब प्रतिक्रिया देणे किंवा आपले मत व्यक्त करणे इथे शक्य नव्हते. त्यामुळे येथेही जी माहिती पोहोचलवली जात होती, ती दिशाभूल करणारी नसावी, याची प्रामुख्याने काळजी घेतली जायची. तथापि, काहीवेळेस या एकतर्फी सोशल मीडियाने चुकीची मते मांडून समाजाचे ब्रेनवॉश करण्याचे कामही केले आहे. याचे प्रत्यय दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीत पाहायला मिळाला.
त्यानंतर सोशल मीडिया बाबत क्रांती घडली. स्मार्ट फोन आणि त्यातील ॲप आले. आजपर्यंत कधी झाला नव्हता इतका सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. त्याने जग बदलून गेले आहे. जवळ जवळ सर्वचजण सोशल किंवा अतिसोशल झाला आहे म्हणाना! या सोशल मीडियाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकजण दोन्ही बाजूंनी आपली मते मांडू शकतो. यात कोणी एकच काहीतरी आपल्या बाजूने प्रक्षेपित करेल आणि बाकी सर्वजण ते फक्त ऐकून घेतील किंवा बघतील असे राहिलेले नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक जण यावर ताबडतोब प्रतिक्रिया देऊ शकतो. यामुळे जग जवळ आले. या नवीन स्मार्ट मोबाइल आणि त्यातील ॲपमुळे सर्वांना समाजभिमुख होण्याचे समान हक्क प्राप्त झाले आहेत.
पण याची दुसरी काळी बाजूही आहे. या सोशल मीडियाचा वापर करताना अतिरेकही होत असल्याचे दिसते. या सोशल मीडियाच्या मायाजालात अबालवृद्ध गुरफटले गेले आहेत. दिवस दिवस याचा वापर करत असल्याने ते बिनकामी होत चालले आहेत. या सोशल मीडियाचे व्यसन समाजाला लागले आहे आणि समाज पोखरला जात आहे. याचा वापर जसा चांगला आहे तसेच वाईटही होत आहे. या नवीन सोशल मीडियाचे परिणाम- दुष्परिणाम आपण सर्वजण पहात आहोत, भोगत आहोत. या नवीन सोशल मीडियाबाबत लिहावे तितके थोडेच आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर, ‘माकडाच्या हातात कोलीत’ असेचे काहीसे म्हणता येईल.
हेही वाचा – Technology Vs Manpower : तंत्रज्ञान वापराबाबत स्वनियमनाची गरज
सोशल मीडिया समजून घेताना आपण त्याचा वापर योग्य रीतीने आणि योग्य वेळी केला पाहिजे. सोशल मीडियावर प्रत्येकवेळी व्यक्त होणं गरजेचं आहे का? त्याचा अतिरेकी वापर केलाच पाहिजे का? समाजावर आणि आपल्यावर त्याचा काय बरा-वाईट परिणाम होत आहे? हे जाणून घेतले पाहिजे. सोशल मीडियाचा मूळ उद्देश समाजप्रबोधन हा आहे. सोशल मीडिया समजून घेताना याकडेच लक्ष देणे आवश्यक आहे.
मोबाइल – 9322755462