माधवी जोशी माहुलकर
नवरात्रौत्सव म्हटलं की, मला आठवतो तो लहानपणी आमच्या घराजवळील रेणुका मातेच्या मंदिरात नित्यनेमाने येणारा पोतराज! हा शब्द तमिळ भाषेतील पोत्तुराजू या शब्दाचा अपभ्रंश होऊन पोतराज म्हणून रूढ झाला. दक्षिणेत ‘सात बहिणी’ म्हणून ग्रामदेवता पूजल्या जातात; त्यांचा पोतराज हा भाऊ आहे, अशी लोकमान्यता आहे. त्याच्या हातातील सोट्याला (चाबूक) ‘कडक’ असे म्हटले जात असल्यामुळे तो गावात आला की, ‘कडकलक्ष्मी आली’, असंही त्यांना संबोधले जायचे. स्वतःच्याच पाठीवर आसूड ओढणारा पोतराज पाहिला की, तेव्हा त्याची भीती वाटत असे… जसजसे मोठी होत गेले तशी ही भीती नाहीशी होऊन त्याची जागा कुतूहलाने घेतली.
त्याच्या गळ्यात रंगबीरंगी मण्यांच्या माळा, कधी कवड्याची माळ ज्यामधे देवीचा टाक बसवलेला असे… तर कधी गळ्यात लिंबाची माळ… हिरव्या-लाल अशा मिश्र कापडांपासून बनवलेला घागरासदृश्य पेहराव ज्याला ‘आभरान’ म्हणतात… त्यावर कडुलिंबाच्या डहाळ्या बांधून त्यावर सैलसर घुंगराची माळ घातलेला… पायात मोठमोठ्या चांदीच्या वाकी घातलेला ज्यामध्ये खड्यांचे घुंगरू असलेला… कपाळावर लाल कुंकवाचा, हळदीचा मळवट भरलेला… चेहऱ्यावर दाढी नाही, परंतु मिशी असलेला… लांब केसांना मागे गाठ मारलेला किंवा त्याचा अंबाडा बांधलेला पोतराज हा देवीच्या मंदिर परिसरात तसेच गावातील गल्लोगल्लीत फिरत असे, स्वतःच्या उघड्या पाठीवर आपल्या हातातील सोट्याने (चाबकाने) फटाफट फटके मारत बेधुंद होऊन नाचत मरीआईला रोगराई घेऊन जाण्यासाठी, ईडापिडा टाळण्यासाठी गावभर, ‘दार उघड बये दार उघड’ हे एकनाथांचे भारुड गात फिरत असे.
मरीआईने आपले गाऱ्हाणे ऐकावे म्हणून कधी दाभण स्वतःच्या दंडात रुतवून घेत असे तर, कधी स्वतःच्या मनगटाला कडकडून चावून स्वतःला आत्मक्लेश करून घेत असे. पोतराजाचे हे रूप पाहून तो गावात शिरला की, लहान मुले त्याला खूप घाबरायची. त्याच्यासोबत त्याची बायको डोक्यावर देवीचे मंदिर, त्यामध्ये मोरपिसाचा झाडू असे… एका हाताने हे मंदिर सावरून घेत आणि दुसऱ्या हाताने ढोलकी वाजवत त्याच्या मागे मागे फिरताना दिसायची.
आमच्या गावात लखूजी नावाचा पोतराज यायचा. तो आपल्या अंगावर त्याच्या शेंदूर लावलेल्या सोट्याने फटके मारून घेत आणि स्वतःभोवती गिरक्या घेऊन नाचत असताना देवीची गाणी म्हणत असे… नंतर माझ्या वाचनात असे आले की, सोट्याने स्वतःला बडवून घेत नाचत पोतराज जी गाणी म्हणतात, त्याला ‘धूपात्री’ असे म्हटले जाते. तसेच, सर्वच देऊळवाले पोतराज गाणी म्हणत नाहीत. स्थानिक पोतराज मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी, ते ज्या गावी राहतात त्या गावात ‘आभरान’ घालून भिक्षा मागतात. भिक्षा मागताना ‘मरिआय लक्ष्मीआईचं मदान’ अशी हाक देतात. हे सहसा गाणी म्हणत नाहीत. पायातल्या वाक्या तसेच उजव्या किंवा डाव्या हाताच्या अंगठ्यातील छोटीशी वाकी वाजवतात. काही भक्तांनी देवीला नवस केलेला असतो. त्याचा सर्व विधी हे पोतराज करतात. तसेच, हे पोतराज ‘देवऋषी’पणाही करतात.
हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!
पोतराजांच्या गाण्यात मरिआई, लक्ष्मीआई, तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, पंढरपूरचा पांडुरंग, लेकी-सुना,मुलं-बाळं, बहीण-भावंड, तसेच राजा हरिश्चंद्र, सती चांगुणा, श्रावणबाळ, सीतेचा वनवास असे विविध विषय असतात. मरीआई, नातबाबा आणि शंकर ही त्यांची दैवते. मरीआई आणि लक्ष्मीआईची मनोभावे भक्ती ते करतात. याशिवाय तुळजापूरची आई, कोल्हापूरची अंबाबाई, रामखाड्याची आई, चतु:शृंगीची आई, माणकेश्वरची शेटीबाई हेही पोतराजांचे देव आहेत.
पण, अंधश्रद्धेत सर्व पोतराज समाज बंदिस्त झालेला आहे. अंधश्रद्धा त्यांच्या जगण्याचे साधन आहे. दररोजच्या जीवनात ते अंधश्रद्धा पाळतात. घरात साप निघाला तर देव धुतात आणि साप गेलेल्या बाजूला घरात पाणी टाकतात. एखाद्याने उंबर्यावर अगर व्यक्तीच्या पाठीवर शिंकणे अशुभ समजतात. देवाला नवस करणे, केलेला नवस फेडणे, देवाच्या नावावर कोंबडा, बकरा बळी देणे, देवीच्या नावाने रेड्याचे कारण करणे हे प्रकार त्यांच्यात प्रचलित आहेत.
स्थानिक पोतराज आणि गाणी गाणारे या दोन प्रकारच्या पोतराजांची जातपंचायत नाही. मंदिरवाले पोतराज समाजात जातपंचायतीचे अस्तित्व आहे. पंचायतीच्या प्रमुखास ‘साहेबराव’ म्हटलं जातं. साहेबरावाचा शब्द जातीत मानला जातो. शिवीगाळ करणं, चोरीमारी करणं, एखाद्यावर कुर्हाड उचलणं असली प्रकरणं पंचायतीत येतात. आषाढात देवीच्या यात्रेत पंचायत बसते. तथापि, आता पंचायतीचे प्रस्थ कमी होत चालले आहे.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
पोतराजाच्या स्त्रीवेषाचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे : प्राचीन काळी स्त्रियाच ग्रामदैवतांचे पौरोहित्य करीत असत नंतरच्या काळात ते पौरोहित्य पुरुषांकडे आले, तरी त्यांना स्त्रीवेष धारण करण्याची प्रथा स्वीकारावी लागली, असे महादेवशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे. दक्षिणेतील ग्रामदेवी पातिव्रत्यासाठी किंवा कडक कौमार्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या उपासनेत स्त्रियांचे, नपुंसक पुरुषांचे आणि स्त्रीत्वाचा आभास निर्माण करणाऱ्या पुरुषांचे प्रस्थ दिसते, असे याबाबतीत रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे. देवीशी तादात्म्य साधण्याच्या हेतूनेही हा स्त्रीवेष धारण केला असण्याची शक्यता आहे.
मी पाहिलेला आमच्या गावातील पोतराज सहसा मंगळवारी किंवा शुक्रवारी गाणी वगैरे काही न म्हणता भिक्षा मागत असे, त्या बदल्यात त्याला प्रत्येक घरातून सुपातून धान्य, शिधा किंवा कधीकधी पैसे मिळत असे. संपूर्ण परिसरात फिरून झाला की, हा पोतराज कधी रेणुकेच्या मंदिरात विश्राम करताना दिसायचा; नाहीतर मारुतीच्या पारावर तो आणि त्याची बायको टेकलेले दिसायची. अंगावर फटके मारल्याने, दंडात दाभण खुपसल्याने तसेच दिवसभर नाचल्यामुळे त्याच्या शरीराची निश्चितच काहिली होत असणार, परंतु पोटाचा प्रश्न असल्याने आणि त्याच्या कमाईचा हा एकमेव मार्ग असल्याने त्याला आपल्या शरीरावरील जखमांचा विसर पडत असावा. सगळ्या समाजाचे भले होवो, पटकी, देवी असे त्या काळात होणारे रोग नष्ट व्हावेत म्हणून मरी आई, जरी आई या देव्यांना साकडे घालणारा तसेच स्वतःला आत्मक्लेश करून घेणारा पोतराज आजही कुठे दिसला की, मन अस्वस्थ होतं. आता जरी हे पोतराज शहरांत कमी दिसत असले तरी, गावखेड्यांमधून कधीतरी दृष्टीस पडलेच तर मन अस्वस्थ होतं. समाजाच्या मुख्य प्रवाहात अजूनही या लोकांची संख्या कमी आहे.
मंदिरवाले पोतराजांची भाषा तमिळमिश्रित मराठी असून महाराष्ट्रातील पोतराजांची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दहीवडे येथे पोतराजांचे मुख्य ठाणे आहे. पोतराजांमध्ये सोमवंश आणि सूर्यवंश ही दोन कुळं असून, जाधव, पवार, चव्हाण, गायकवाड, पोळके, निंबाळकर आदि आडनावाच्या कुळी आहेत. या समाजात पूर्वी लग्न पाच दिवस चालत असे. पहिला दिवसस हळदीचा, दुसरा लग्नाचा, तिसरा साड्यांचा, चौथा काकणं-बाशिंग सोडण्याचा आणि पाचवा वऱ्हाड वळविण्याचा. या पाच दिवसाचा खर्च दयाज (व्याज) देण्याची प्रथा रूढ होती. पोतराजांमध्ये आषाढी लग्न महत्त्वाचे मानले जाते. आषाढ महिन्यात पोतराजाला विशेष महत्त्व असते.
मंदिरवाले पोतराज जन्मपरंपरेने लहानापणापासून पायात घुंगरं बांधून डोक्यावर आईचे मंदिर घेतात. आयुष्यभर देवीच्या नावावर भटकंती करतात. स्थिर जीवन त्यांच्या वाट्याला येतच नाही. आषाढ महिन्यापासून भटकंतीला सुरुवात होते. अलीकडेच नवरात्रीत मी अमरावतीच्या अंबाबाई आणि एकवीरा देवीची ओटी भरण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथील जत्रेत मला हा पोतराज दिसला… ते पाहून मला आमच्या गावात येणारा लखुजी पोतराज आठवला म्हणून हा लेखनप्रपंच घडला. सर्व समाजाचे आरोग्य चांगले रहावे म्हणून जो आपल्या सर्वांगावर आसुडाचे फटके मारून देवीला साकडं घालतो, स्वत:च्या शरीराला चावून, दाभणाने खुपसून घेऊन जखमा करवून घेतो. या निर्मळ हेतूबद्दल त्या पोतराजाचे आपण लक्ष लक्ष आभार मानावे. पण त्याचबरोबर हा समाज सुशिक्षित व्हावा आणि सुखी जीवन जगण्याचा आशीर्वाद जगतजननीच्या या भक्ताला मिळावा! जेणेकरून त्याचाही भविष्यकाळ सोनेरी व्हावा आणि हा समाज मुख्य प्रवाहात येऊन त्याचीही प्रगती व्हावी, हीच त्या जगदंबेच्या चरणी प्रार्थना!


